६४ वे राज्य कला प्रदर्शन होण्याचा मार्ग मोकळा,
६४व्या राज्य कला प्रदर्शनाचा मार्ग मोकळा
तब्बल तीन हजार ५०० विद्यार्थ्यांच्या प्रवेशिका
मुंबई, ता. ११ : सर जे. जे. कला संचालनालयाअंतर्गत येणाऱ्या राज्यातील सर्व चित्रकला, अभिकल्प आदी महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांसाठी भरविण्यात येणाऱ्या यंदाच्या ६४व्या महाराष्ट्र राज्य कला (विद्यार्थी विभाग) प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे. यासाठी अनुदानितमधील काही संस्थांनी विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेत सहभागी होण्याची भूमिका घेतली आहे, तर काही विनाअनुदानित संस्थाही यासाठी सकारात्मक भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात येते.
राज्यातील कला संचालनालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या सरकारी, अनुदानित, विनाअनुदानित कला शिक्षण देणाऱ्या संस्थांमध्ये विविध प्रकारच्या पदवी, पदविका, पदव्युत्तर इत्यादींचे कला शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कलाकृती मांडण्यासाठी हे चित्रकला प्रदर्शन राज्यात विविध ठिकाणी वर्षातून एकदाच भरविले जाते. या प्रदर्शनासाठी विविध महाविद्यालयांतील तब्बल तीन हजार ५०० हून अधिक विद्यार्थ्यांनी या राज्य चित्रकला प्रदर्शनासाठी प्रवेशिका, आपले अर्ज आणि त्यासाठीचे चित्र संचालनालयाकडे पाठविल्याची माहिती संचालनालयाने दिली आहे.
या वर्षी हे प्रदर्शन शासकीय कलावर अभिकल्प महाविद्यालय नागपूर येथे १० जानेवारी २०२५ पासून सुरू होणार आहे. त्यासाठीची तयारीही जोरात सुरू असल्याचे विभागाचे प्रमुख प्रा. विश्वनाथ साबळे यांनी दिली. या राज्यस्तरीय कला प्रदर्शनासाठी संचालनालयाच्या संकेतस्थळावर प्रवेशिका मागवल्या होत्या. त्यात डिजिटल स्वरूपातील चित्र पाहून त्यांची त्या त्या विद्यार्थ्यांच्या कलाकृतींची निवड कला प्रदर्शनासाठी केली जाणार आहे. ज्या कलाकृतींची निवड केली जाणार आहे त्यांची माहिती आणि कलाकृतींची यादीही संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार असल्याचे प्रा. साबळे यांनी सांगितले.
राज्यात वर्षातून एकदा होणाऱ्या राज्य कला प्रदर्शनावर मागील काही दिवसांत विनाअनुदानित शिक्षण संस्थांनी आपल्या काही मागण्या समोर करीत त्यावर बहिष्कार टाकण्याची भूमिका घेतली आहे. त्यावर ते अजूनही ठाम असले तरी विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन अशा प्रकारचा बहिष्कार टाकण्याऐवजी प्रशासनाला वेगळ्या पद्धतीने वेठीस धरणे उचित असल्याचे कला क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तर वर्षांतून एकदा होणाऱ्या शासकीय कला प्रदर्शनावर बहिष्कार टाकणे म्हणजे तळागाळातील, छोट्या छोट्या वाडी-वस्ती, गावखेड्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचे नुकसान करणे होय. तसेच एखाद्या दिव्यांग विद्यार्थ्याला स्पर्धेपासून दूर ठेवणे नुकसानकारी असल्याच्या प्रतिक्रियाही उमटल्या आहेत.
सात विभागांचा प्रमुख समावेश
कला संस्थेतील विद्यार्थी आणि व्यावसायिक कलाकार अशी दोन स्वतंत्र प्रदर्शने यात असतात. यात प्रामुख्याने चित्रकला व रंगकला, शिल्पकला, उपयोजित कला, कला शिक्षण व प्रशिक्षण, मूलभूत कला यासोबत कला व हस्तव्यवसायामध्ये येणाऱ्या गृहसजावट, धातूकाम, वस्त्रकाम, मातीकाम आणि दिव्यांग विद्यार्थ्यांसाठीच्या अशा एकूण सात विभागांतील विद्यार्थ्यांना सहभागी होता येते.
हजारो रुपयांची पारितोषिक
राज्य कला प्रदर्शनात विद्यार्थ्यांच्या दोन कलाकृतींचा समावेश केला जातो. यात यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांना एकूण सात विभागात तब्बल १ लाख ४० हजारांहून अधिक रकमेचे पारितोषिक दिले जाते. विशेष म्हणजे यामधील प्रत्येक विभागातील उत्कृष्ठ कलाकृतीना १० हजाराचा पुरस्कार दिले जातात तर दिव्यांग विद्यार्थीसाठी खास पुरस्कार आहे
असे आहेत पारितोषिके
विभाग पारितोषिकांची संख्या
१. चित्रकला ४
२. शिल्पकला ४
३. उपयोजित कला ४
४. कला शिक्षण ४
५. कला व हस्तव्यवसाय -
अ. धातूकाम २
ब. गृहसजावट २
क. वस्त्रकाम २
ड. मातीकाम २
६. मूलभूत ६
७. दिव्यांग विद्यार्थी १
एकूण १६
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

