घोडबंदर भागात पाणीटंचाई

घोडबंदर भागात पाणीटंचाई

Published on

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ११ : शहरातील घोडबंदर भागात नव्याने मोठ्या प्रमाणात गृहसंकुले उभी राहत आहे. या गृहसंकुलात वाढती नागरिकांची संख्या लक्षात घेता पालिकेकडून पुरवण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांवर ताण पडत आहे. त्यात घोडबंदर भागात आजही पाणी टंचाईची समस्या भेडसावत असून, टँकरद्वारे अनेक गृहसंकुलात पाणीपुरवठा करण्यात येत आहे. टँकरपासून सुटका मिळावी, यासाठी वाढीव पाण्याची मागणी कित्येक वर्षांपासून केली जात आहे. विधानसभा निवडणुकीतही घोडबंदरला वाढीव पाणी देण्याचे आश्वासन राजकीय पक्षांकडून देण्यात आले होते. मात्र, अद्याप ते घोडबंदरला उपलब्ध होऊ शकलेले नाही.
ठाणे शहराचे झपाट्याने होणारे नागरिकीकरण, वाढती लोकसंख्या यांमुळे ठाणे शहराचा विस्तार होऊ लागला आहे. घोडबंदर परिसरातही निवासी गृहसंकुलांचे मोठमोठे इमले उभे राहू लागले आहे. त्यात सध्याच्या घडीला ठाणे शहराला चार स्त्रोतांमार्फत दररोज ५८५ दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा करण्यात येतो. लोकसंख्येच्या मानाने तो अपुरा पडू लागला आहे. नव्याने विकसित झालेल्या घोडबंदर भागातील इमारतींमधील रहिवाशांना टँकरद्वारे पाणी विकत घ्यावे लागत आहे. अशीच परिस्थिती शहराच्या इतर भागांमध्येही आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने भातसा धरणातून १०० दशलक्ष लिटर, तर मुंबई महापालिकेकडून २० दशलक्ष लिटर वाढीव पाणी देण्याची मागणी केली होती. त्यानुसार मुंबई महापालिकेने वाढीव पाण्यास मंजुरी दिली. मुंबई महापालिकेच्या जलवाहिनीवरून कोपरी, किसननगर आणि वागळे इस्टेट या भागांना पाणी देण्यासाठी जलवाहिनी जोडणीची कामे हाती घेतली. यामुळे या तिन्ही भागांना पुरवठा होऊ लागला आहे. मात्र, घोडबंदरवासीयांना पाण्याची प्रतीक्षाच करावी लागत आहे.
यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही राजकीय पक्षांकडून प्रचारातही घोडबंदरला वाढीव पाणी मिळणार असल्याचा दावा केला होता. वर्ष संपत आले, तरी घोडबंदरला वाढीव पाणी मिळू शकलेले नाही. त्यात ५० दशलक्ष वाढीव पाणी तत्काळ उपलब्ध व्हावे, यासाठी पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने पुन्हा मुंबई महापालिकेकडे पत्रव्यवहार केला आहे. या पत्राद्वारे प्रति दिन ५० दशलक्ष लिटर पाणी घोडबंदर भागासाठी उपलब्ध व्हावे, अशी मागणी केली आहे.

अनामत रक्कम भरण्यास पालिका तयार
मुंबई महापालिकेच्या कापुरबावडी येथील जलवाहिनीवरून पाणीपुरवठा उपलब्ध करून दिल्यास घोडबंदर परिसराची पाणी टंचाई दूर होण्याची शक्यता आहे. जलवाहिनीपासून १०० मीटर अंतरावर घोडबंदर रोड परिसरात पाणीपुरवठा करणारी ठाणे महापालिकेची ११५८ मिमी व्यासाची जलवाहिनी आहे. या जलवाहिनीला ६०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीद्वारे पाणी घेणे शक्य आहे. या ठिकाणी जलमापक बसवून त्याद्वारे पाणी पुरवठ्याचे मोजमाप करण्यासाठी आवश्यक अनामत रक्कम भरण्यास तयार असल्याचेही महापालिकेने स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com