शिंदे सेनेची पुन्हा पक्षबांधणी होणार

शिंदे सेनेची पुन्हा पक्षबांधणी होणार

Published on

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ११ : विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या शिंदे गटाची झालेली पडझड भरून काढण्यासाठी नवे जिल्हाप्रमुख किशोर पाटकर रिंगणात उतरले आहेत. बेलापूर शिवसेना जिल्हा कार्यकारणी नव्याने नियुक्त करणार असल्याची माहिती पाटकर यांनी दिली. निवडणुकीत पक्षाकरिता काम करणाऱ्या नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे; परंतु जम्बो कार्यकारिणीच्या नावाखाली पोकळ कार्यकर्त्यांची सेना उभी न करता मोजक्याच पदांची नियुक्ती करणार असल्याचे पाटकर यांनी स्पष्ट केले.
किशोर पाटकर यांची बेलापूर जिल्हाप्रमुखपदावर वर्णी लागल्यानंतर पहिल्यांदाच वाशी येथे पक्षाची बैठक बोलावण्यात आली होती. या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बेलापूर विधानसभा मतदारसंघात शिवसेना-भाजप महायुतीच्या उमेदवार मंदा म्हात्रे यांना भरघोस मतांनी निवडून आणण्यासाठी आणि जिल्हाप्रमुखपदावर नियुक्ती केल्यामुळे पाटकर यांचे शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले. तसेच, विधानसभा निवडणुकीच्या काळात पक्षाने कारवाई केलेल्या पदाधिकाऱ्यांना पुन्हा पक्षात घेण्याची विनंती काही पदाधिकाऱ्यांनी केली. अशा पदाधिकाऱ्यांना पुन्हा पक्षात सन्मानाने घेण्याची विनंती पक्षाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांच्याकडे करणार असल्याचे पाटकर यांनी सांगितले. विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप महायुतीच्या उमेदवार मंदा म्हात्रे यांच्याविरोधात उपनेते विजय नाहटा यांनी बंडखोरी करून उमेदवारी लढवली. त्यांच्यासोबत विजय माने, दिलीप घोडेकर आदींनी उघडपणे काम केले; परंतु अखेर नाहटा यांचा पराभव झाला. तसेच, आता निवडणूक संपली असून पक्षाला आगामी महापालिका निवडणुकीला सामोरे जायचे आहे. अशा परिस्थितीत पक्षाला पुन्हा उभारी देण्याकरिता जुन्या पदाधिकाऱ्यांवरील कारवाई शिथिल करून त्यांना पक्षात घेण्याची विनंती केली जाणार असल्याचे किशोर पाटकर यांनी सांगितले.
----------------
नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने बेलापूर जिल्ह्यातील शिवसैनिक मोठ्या ताकदीने आणि दमाने उतरणार आहेत. उपजिल्हाप्रमुखांपासून ते अगदी शाखाप्रमुखांपर्यंतचे पदाधिकारी बदलले जाणार आहेत. जम्बो कार्यकारणी करण्यापेक्षा लहान; पण प्रभावी कार्यकारणी तयार करण्यावर भर असणार आहे.
- किशोर पाटकर, बेलापूर विभाग जिल्हाप्रमुख, शिवसेना
--------------
ऐरोलीचे जिल्हाप्रमुख कुठे गेले?
बेलापूरचे नवे जिल्हाप्रमुख किशोर पाटकर यांनी वाशी येथे घेतलेल्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात नवीन कार्यकारिणी करणार असल्याचे घोषित केले. या वेळी ऐरोली विभागातील काही पदाधिकारी उपस्थित होते. बेलापूरच्या जिल्हाप्रमुखांनी एक तरी बैठक घेतली; पण ऐरोलीच्या जिल्हाप्रमुखांना पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यास कधी वेळ मिळेल, अशी खासगीत चर्चा रंगली होती. विधानसभा निवडणूक झाल्यापासून ते कुठे गायब झाले आहेत, अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू होती.
--------------------------------
विजय नाहटांचे काय?
बेलापूर विधानसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवार मंदा म्हात्रे यांच्याविरोधात शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा यांनी बंडखोरी केली. अपक्ष उमेदवारी लढवली; परंतु त्यापूर्वी नाहटा यांनी पक्षाचा राजीनामा दिल्याचे समजते. त्यामुळे ज्या पदाधिकाऱ्यांवर पक्षाकडून शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली, ती नाहटा यांच्यावर करता आली नाही; मात्र आता निवडणुका संपल्यानंतर पुन्हा नाहटा यांना पक्षात घ्यावे, अशी विनंती शिंदे सेनेतील एक गट पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्याकडे करणार असल्याचे समजते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com