भटक्या कुत्र्यांची दहशत
दत्ता बाठे : सकाळ वृत्तसेवा
कल्याण, ता. ११ : टिटवाळ्यात एका महिलेचे भटक्या कुत्र्याने लचके तोडल्याच्या घटनेला २४ तास उलटत नाही, तोच कल्याण पश्चिमेत एका चिमुकल्याला गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. लागोपाठ घडलेल्या या दोन घटनांमुळे संपूर्ण कल्याण-डोंबिवली पालिका क्षेत्रात भटक्या कुत्र्यांची पुन्हा एकदा दहशत निर्माण झाली आहे. गेल्या वर्षी २०२३ मध्ये १८ हजार ९३९ जणांना, तर यावर्षी ऑक्टोबर २०२४ पर्यंत १८ हजार ७०५ जणांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याची आकडेवारी आहे. तर दुसरीकडे नोव्हेंबरपर्यंत १२ हजार ४०६ श्वानांचे निर्बिजीकरण करण्यात आले आहे. यासाठी एक कोटी २२ लाख ६९ हजार ५३४ रुपयांचा खर्च झाला आहे. मात्र, तरीही भटक्या कुत्र्यांची संख्या वाढतच असल्याने हे निर्बिजीकरणही वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे.
भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करणे महाराष्ट्र प्रांतिक अधिनियमानुसार पालिका प्रशासनाचे काम आहे. नागरिकांच्या भटक्या कुत्र्यांसंदर्भातील तक्रारीनुसार प्रशासन वेळेनुसार डॉग व्हॅनद्वारे त्यांना पकडतात. त्यानंतर जीवरक्षा ॲनिमल वेल्फेअर ट्रस्टमार्फत कल्याण पश्चिमेतील निर्बिजीकरण केंद्रात नसबंदी केली जाते. तसेच, ॲन्टी रेबीज लस दिली जाते. दररोज शिजवलेला भात-चिकन दिले जाते. तीन दिवस श्वानाला निरीक्षणाखाली ठेवून त्याला चौथ्या दिवशी सोडले जाते. यासाठी संस्थेला ९८९ रुपये एका भटक्या कुत्र्यामागे दिले जातात. हा उपक्रम स्तुत्य असून, श्वानांनाही जगण्याचा अधिकार देणार आहे. पण त्यापैकी काही श्वान वयोमानाने अथवा इतर आजाराने पिसाळतात आणि चावा घेतात. अशा श्वानांचा बंदोबस्त करण्यात पालिका प्रशासनाला अपयश आल्याचे दिसते. म्हणूनच निर्जनस्थळी किंवा रात्रीच्या वेळी रस्त्यावरून फिरताना नागरिकांना असुरक्षितता भासत आहे.
१ जानेवारी ते ३० नोव्हेंबरपर्यंत १२ हजार ४०६ भटक्या श्वानांचे निर्बिजीकरण करण्यात आले आहे. यासाठी एक कोटी २२ लाख ६९ हजार ५३४ रुपयांचा खर्च झाल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे. तरी भटक्या कुत्र्यांची संख्या कमी होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. मिळालेल्या आकडेवारीनुसार, १ जानेवारी ते ३१ ऑक्टोबरपर्यंत पालिका क्षेत्रात भटक्या कुत्र्यांनी चावा घेतलेल्या; तसेच रेबिज लसीकरण केलेल्या रुग्णांची संख्या १८ हजार ७०५ इतकी आहे. दरम्यान, १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत १८ हजार ९३९ इतके श्वानदंश झालेल्या रुग्णांना रेबिज लसीकरण इंजेक्शन दिल्याची माहिती आरोग्य विभागातील कमलेश सोनवणे यांनी दिली.
चालू वर्षावर दृष्टिक्षेप
भटक्या श्वानांचे निर्बिजीकरण
१२ हजार ४०६
(१ जानेवारी ते ३० नोव्हेंबरपर्यंत)
चावा घेतलेल्या घटना
१८ हजार ७०५
(१ जानेवारी ते ३१ ऑक्टोबरपर्यंत)
खर्च
एक कोटी २२ लाख ६९ हजार ५३४ रुपये
------
श्वानांच्या संख्येत वाढ
२०१२च्या पशुगणनेनुसार कल्याण-डोंबिवली पालिका क्षेत्रात ५५ हजार इतकी श्वानाची संख्या होती. दर पाच वर्षांनी पशुगणना होते. मात्र, १० वर्षे होऊनही पशुगणना अद्याप झाली नाही. कोविडनंतर आता पशुसंवर्धन विभागामार्फत पशुगणना करण्याचे काम सुरू आहे. आजमितीस सुमारे ८० हजार श्वानांची संख्या असावी, असे समजते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

