मालमत्ता करवाढीला विरोध

मालमत्ता करवाढीला विरोध

Published on

खालापूर, ता. १३ (बातमीदार)ः मालमत्ताकरातील वाढीसंदर्भात खालापूर नगर पंचायतीने नागरिकांना नोटिसा पाठवल्या होत्या. यामुळे संतापलेल्या नागरिकांनी नगर पंचायत कार्यालयाबाहेरच शुक्रवारी ठिय्या आंदोलन केल्याने प्रस्तावित करवाढीचा ठराव मासिक बैठकीत रद्द करण्यात आला.
मालमत्ताकरात भरमसाठ वाढीचा प्रस्ताव खालापूर नगर पंचायतीने पारित केला आहे. याबाबतच्या नोटिसाही नागरिकांना पाठवण्यात आल्या होत्या. नोटीस बजावताना पुढील पाच वर्षांत होणारी करवाढ चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आली होती. त्यामुळे करदात्यांमधील रोष अधिकच वाढला होता. अशातच शुक्रवारी नगर पंचायतीची मासिक बैठक घेण्यात आली. यावेळी या बैठकीपूर्वीच करवाढीवर निर्णय घेण्याची मागणी करत ठिय्या आंदोलन करण्यात आले. मासिक बैठकीत विषयपत्रिकेवर यासंदर्भात चर्चा करण्यात येणार असल्याचे उपनगराध्यक्ष संतोष जंगम यांनी सांगितले. यावेळी कोणत्याही परिस्थितीत मालमत्ता करवाढ लादली जाऊ नये, अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली. तसेच, ठोस निर्णय घ्या, अन्यथा नगर पंचायत बरखास्त करा, अशी मागणी केल्याने मालमत्ता करवाढीला एकमताने विरोध असल्याचा ठराव घेण्यात आला.
-----------------------------------------------------------
करवाढीमुळे ग्रामपंचायतच बरी
आंदोलनावेळी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. पाण्याची प्रचंड समस्या असताना महिला वर्गाच्या डोक्यावर हंडा उतरलेला नसताना पाणीपट्टी दुप्पट करण्यात आली आहे. अशातच आता मालमत्ताकरातही भरमसाठ वाढ करण्यात आल्याने ग्रामपंचायतच बरी असल्याचा सूर महिलांनी काढला. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
----------------------------------
मासिक बैठकीत मालमत्ता करवाढ रद्द करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत ठराव घेऊन शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल.
- वैभव गारवे, प्रभारी मुख्याधिकारी, खालापूर नगर पंचायत
----------------------------------------
मालमत्ता करवाढ भरमसाठ असल्याने त्याला ठाम विरोध आहे. आजच्या बैठकीतदेखील प्रस्तावित मालमत्ता करवाढ नागरिकांवर लादू नये, असा ठराव आम्ही बहुमताने मंजूर केला आहे.
- रोशना मोडवे, नगराध्यक्षा, खालापूर नगर पंचायत
---------------------------------------
मालमत्ता वार्षिक पुनर्मूल्यांकन प्रस्तावित असून दर पुढील पाच वर्षांकरिता असल्याची नोटीस पाठवण्यात आली आहे; परंतु पाच वर्षांत शंभर टक्के वाढ होण्याऐवजी ५०० टक्के वाढ झाली आहे. त्याला आमचा विरोध आहे.
- नवीनचंद्र घाटवळ, रहिवासी, खालापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com