

पनवेल, ता. ७ (बातमीदार) : पनवेल महापालिका क्षेत्रातील सर्व दुकानदार, हॉकर्स, हातगाडीधारक, फेरीवाले तसेच इतर सर्व व्यावसायिकांना त्यांच्या आस्थापनेवर कचरापेटी ठेवणे बंधनकारक राहील. तसे न केल्यास आणि आस्थापनेच्या परिसरात अस्वच्छता आढळल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा पनवेल महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिला होता. त्या अनुषंगाने कळंबोली येथे कचऱ्याचे डबे न ठेवल्यामुळे अनेक आस्थापनांवर कारवाई करून दंड वसूल आकारण्यात आला.
कचरापेटी ठेवण्याच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचा इशारा दिला असतानाही शहरातील अनेक दुकानांपुढे कचरापेटी दिसलीच नाही. त्यामुळे महापालिकेच्या इशाऱ्याला शहरातील दुकानदार जुमानत नाहीत असेच चित्र शहरातील अनेक भागांमध्ये दिसून आले. यासंदर्भात आरोग्य विभागाने सूचना जारी केली होती. त्यात दंडाची रक्कमही नमूद केली आहे. आयुक्त मंगेश चितळे यांच्या निर्देशानुसार शहर स्वच्छतेच्या बाबतीतल्या नियमांची आता कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्यांकडून दंडाची मोठी रक्कम आकारण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्येक दुकानदार, हॉकर्स, हातगाडीधारक, फेरीवाले आणि इतर सर्व व्यावसायिकांनी आपल्या आस्थापनेत कचरापेटी ठेवण्याचे आवाहन उपायुक्त डॉ. वैभव विधाते यांनी केले; परंतु सोमवारी (ता. ६) शहरातील अनेक मुख्य मार्गांवरील दुकानांची पाहणी केली असता कचरापेटी कुठेही दिसली नाही.
--------------------
चार हजारांचा दंड
दुकान सुरू झाल्यानंतर स्वच्छता करण्यात येते, असे अनेक दुकानदारांनी सांगितले. रात्री दुकाने बंद करताना जमा झालेला कचरा गोळा करून जवळच्या कचरापेटीत टाकण्यात येतो, असेही काही दुकानदारांनी सांगितले. त्यामुळे दिवसभर दुकानांसमोर तयार होणारा कचरा नेमका कुठे टाकला जातो, यावर मात्र दुकानदारांकडे कुठलेही उत्तर नाही. कळंबोली प्रभाग क्रमांक १० येथील दुकानांत कचऱ्याचे डबे न ठेवल्यामुळे अनेक आस्थापनांकडून चार हजारांचा दंड आकरण्यात आला. या वेळी मुख्य स्वच्छता निरीक्षक योगेश कस्तुरे, स्वच्छता निरीक्षक दिग्नेश भोईर व कर्मचारी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.