रोह्यातील मुख्य जलवाहिनीवर ढाब्‍याचे बांधकाम

रोह्यातील मुख्य जलवाहिनीवर ढाब्‍याचे बांधकाम
Published on

रोहा, ता. ७ (बातमीदार) ः राज्य मार्गापासून ५० मीटरपर्यंत कोणतेही व्यावसायिक बांधकाम करण्यास सक्त मनाई आहे. असे असताना रोहा-कोलाड या मुख्य राज्य मार्गावर अनधिकृत ढाबा उभारला जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे रोहे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीवरच हे बांधकाम केले गेले आहे. याबाबत तक्रारी करूनही बांधकामावर कारवाई होत नसल्‍याने नागरिकांमधून संताप व्यक्‍त होत आहे.
मुरूड-रोहा-कोलाड या मुख्य राज्य मार्गावर ढाबा उभारण्यात येत आहे. सरकारी नियमानुसार, मुख्य राज्य मार्गावर ५० मीटर अंतरापर्यंत कुठल्याही प्रकारचे व्यावसायिक बांधकाम उभारण्यास मनाई आहे. असे असताना ढाबा मालकाने स्वतःच्या मालकीच्या जागेत ढाब्याचे बांधकाम केले आहे. कोलाडजवळील डोलवहाळ धरणातून रोहा शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी याच रस्त्याच्या बाजूने जाते, मात्र ढाब्‍याच्या बांधकामासाठी करण्यात जलवाहिनीवर भराव करण्यात आला असून, गळती झाल्‍यास रोहा शहरात पाणीबाणी निर्माण होण्याची शक्यता आहे. जवळपास सवाशे फूट लांबीच्या क्षेत्रात जलवाहिनीवर भराव करण्यात आल्‍याने एखाद्या वेळी डागडुजी करायची असल्‍यास अडचणीचे ठरू शकते.
नागरिकांच्या तक्रारीनंतर बांधकामाचे सर्वेक्षण करून नगरपालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने २ जानेवारीला ढाबामालकाला नोटीस बजावली असून, आठ दिवसांत बांधकाम हटवण्याचे आदेश दिले आहेत. नियोजित वेळेत बांधकाम न काढल्यास सक्त कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

रस्त्याला भगदाड पडल्‍याची घटना
चार महिन्यांपूर्वी पावसाळ्यात अनधिकृत बांधकामामुळे पाण्याचा निचरा होऊ न शकल्याने नियोजित जागेपासून जवळच असलेल्‍या रस्त्याला भगदाड पडले होते. २ ऑगस्ट २०२४ रोजी रात्री घडलेल्‍या या घटनेनंतर काही काळ वाहतूक बंद करण्यात आली होती. त्‍या वेळी सार्वजनिक बांधकाम विभागाने ढाबामालकाला नोटीस बजावली होती, मात्र ठोस कारवाई न केल्‍याने ढाबामालकाचे फावले.

रोहे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीवर ठिकठिकाणी अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अनेक दुकानदारांना नोटिसा बजावण्यात आल्‍या आहेत, मात्र ठोस कारवाई होत नसल्‍याने बांधकामे वाढली आहेत. जलवाहिनीवर अनधिकृत बांधकाम केल्याने भविष्यात जलवाहिनी नादुरुस्त झाली, तर संपूर्ण शहर व अष्टमीकरांना पाणी समस्याला तोंड द्यावे लागेल. त्यामुळे प्रशासनाने वेळीच लक्ष देऊन पालेखुर्दप्रमाणे धाटाव अन्य भागात जलवाहिनीवरील अतिक्रमण दूर करावे.
- संदीप सरफळे, माजी उपसभापती, शिक्षण मंडळ रोहा

मुख्य जलवाहिनीवर अनधिकृत बांधकाम केल्यानंतर संबंधित मालकाला २ जानेवारी रोजी नोटीस बजावण्यात आली आहे. आठ दिवसांत बांधकाम काढून टाकण्यात यावे, असे आदेश दिले आहेत. नियोजित वेळेत बांधकाम न हटवल्यास तहसीलदारांच्या आदेशानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल व त्यासाठी होणारा खर्च संबंधित व्यक्तीकडून वसूल करण्यात येईल. नोटीसची प्रत महाड येथील सार्वजनिक बांधकाम विभाग, रोहा उपविभागीय अधिकारी, रोहा तहसीलदार, नगर पालिका मुख्याधिकारी, कोलाड पोलिस निरीक्षक आदींना देण्यात आली आहे.
- विजय बागुल, उपअभियंता, रोहा सार्वजनिक बांधकाम विभाग

रोहा ः कोलाड मार्गावर पाले खुर्द गावात मुख्य जलवाहिनीवर बांधकाम करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com