

यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात रंगणार ‘नाट्यचौफुला’
सचिन शिंदे यांच्या चार नाटकांचे एका दिवसात सलग प्रयोग
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ ः प्रायोगिक रंगभूमीचा परीघ गेल्या दशकभरात मुंबई-पुण्याबाहेर विस्तारल्याचा प्रत्यय देणारी नाशिकच्या दत्ता पाटील या वर्तमान पिढीतल्या नाटककाराने लिहिलेल्या व प्रयोगशील रंगकर्मी सचिन शिंदे यांनी दिग्दर्शित केलेल्या हंडाभर चांदण्या, दगड आणि माती, कलगीतुरा, तो राजहंस एक या गाजलेल्या महत्त्वाच्या चार नाटकांचा ज्येष्ठ रंगकर्मी, दिग्दर्शक व अभिनेते अतुल पेठे यांच्या संकल्पनेतून एकाच दिवसात सलग प्रयोगांचा अनोखा महोत्सव ‘नाट्यचौफुला’ या नावाने मुंबईत होत आहे.
माटुंग्याच्या यशवंतराव चव्हाण नाट्यमंदिरात अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या सहकार्याने हा अनोखा महोत्सव शनिवारी (ता. ११) दुपारी दोन ते रात्री दहा या वेळेत हे प्रयोग होत आहेत. नाट्यचौफुलाच्या उद्घाटनाला प्रसिद्ध दिग्दर्शक विजय केंकरे उपस्थित राहणार आहेत. जागतिकीकरण आणि आर्थिक उदारीकरणानंतर बदलत गेलेल्या ग्रामीण भूवास्तवाचा वर्तमान पट प्रभावीपणे मांडणारी ही एकाच नाटककाराची चार नाटके एकाच दिवशी सलग आठ तासांच्या सत्रात सादर होण्याचा हा मराठी रंगभूमीच्या इतिहासातील पहिलाच उपक्रम ठरेल. ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांच्या ‘वाडा चिरेबंदी, मग्न तळ्याकाठी, युगान्त’ या तीन नाटकांचा तीस वर्षांपूर्वी त्रिनाट्यधाराअंतर्गत एकाच दिवसात सलग नाट्यानुभव देणारा प्रयोग सादर झाला होता. या सुमारे आठ तासांच्या नाट्यत्रयीचे त्या वेळी अनेक प्रयोग झाले. त्यानंतर मराठी प्रायोगिक रंगभूमीवर दत्ता पाटील लिखित व सचिन शिंदे दिग्दर्शित चार नाटकांचा सलग नाट्यानुभव ‘नाट्यचौफुला’अंतर्गत रसिकांना घेता येणार आहे.
तब्बल चाळीस कलावंत आणि तंत्रज्ञ यात सहभागी होत असून, प्रामुख्याने प्राजक्त देशमुख, अनिता दाते, ओंकार गोवर्धन, उमेश जगताप, अश्विनी कासार, धनंजय गोसावी, नुपूर सावजी, प्रणव प्रभाकर, राहुल गायकवाड, राजेंद्र उगले, अरुण इंगळे, दीप्ती चंद्रात्रे, हेमंत महाजन, अमेय बर्वे, हेमंत महाजन, ऋषिकेश गांगुर्डे, कविता देसाई, किरण राव, निलेश सुर्यवंशी, प्रवीण जाधव, राम वाणी, ऋषिकेश शेलार, श्रुती कापसे, शुभम लांडगे, विक्रम नांनावरे, कृष्णा शिरसाठ, हेमंत महाजन, बद्रिश कट्टी, कृतार्थ शेवगावकर, जयश्री जगताप, राजेंद्र उगले, प्रफुल्ल दीक्षित, लक्ष्मण कोकणे, रोहित सरोदे, चेतन बर्वे, निखिल मारणे, सौरभ महाजन, ललित कुलकर्णी, सागर अवटे, हृषिकेश गांगुर्डे, राहुल गायकवाड, माणिकनाना कानडे यांचा समावेश आहे.
दुष्काळातील होरपळ दाखवतानाच माणसामधील जगण्यासाठीच्या चिवटपणाचा प्रत्यय देणारं हंडाभर चांदण्या, शिकूनही अनेक संधीच्या अभावातून मानसिकदृष्ट्या खचून चाललेल्या शेतकऱ्यांच्या तरुण पिढीच्या जगण्यातील दोलायमानतेचं प्रभावी चित्रण करणारं तो राजहंस एक, जगात अस्तित्व आणि ओळखच नसल्यानं ती मिळवून देण्याच्या भाबड्या प्रयत्नात स्वत:चं अस्तित्वच पणाला लावणाऱ्या ग्रामीण तरुण पिढीचं यथार्थ दर्शन घडविणारं दगड आणि माती, जागतिकीकरणाच्या धबडग्यात लोप पावलेली जुन्या काळातील लोककला परंपरा नव्या विखंडित जगातील जगण्याला किमान लय मिळावी यासाठी पुनरुज्जीवित करण्याच्या धडपडीची संगीतमय गोष्ट मांडणारं कलगीतुरा अशी ही चार नाटके रसिकांना अनुभवायला मिळणार आहेत.
चार नाटकांचे एकसमान सूत्र
या चार नाटकांतील सामायिक स्थळांचा विचार केला, तर महाराष्ट्रातल्या ओळख नसलेल्या गावांचा आणि त्या गावातील माणसांचा आर्थिक मानसिक आणि सामाजिक आलेख ही नाटके अत्यंत प्रत्ययकारीपणे आपल्यापर्यंत पोहोचवतात. खेड्यांमधल्या अनेक समस्यांचे आणि त्या भौतिक समस्यांमुळे निर्माण झालेल्या अनेक शारीरिक, मानसिक, आर्थिक आणि भावनिक प्रश्नांचे तिढे ही नाटके आपल्यासमोर मांडतात. कमीत कमी संधींची उपलब्धता, उद्ध्वस्त होत चाललेलं जीवनमान, दररोजचे जगणे लढाई वाटावी अशी परिस्थिती, यामधून आधुनिकतेच्या रेट्याखाली नष्ट होत जाणारा गावगाडा आणि तेथील लोक परंपरा, संवादांचे अभाव, एकारलेपण, अपरिहार्यपणे शहरांकडे घेतली जाणारी धाव आणि त्यातून तयार होत जाणारे अंतरंग आपल्याला या चारही नाटकांमधून दिसतं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.