रेवस -रेड्डी सागरी महामार्गाला विरोध

रेवस -रेड्डी सागरी महामार्गाला विरोध
Published on

रेवस-रेडी सागरी महामार्गाला विरोध
द्रोणागिरी पर्वताला धक्का न लावता प्रकल्‍प राबविण्याची स्‍थानिकांची मागणी
उरण, ता. ७ (बातमीदार) ः रायगड जिल्ह्यातील करंजा-रेवस ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेडीपर्यंतच्या सागरी महामार्गाच्या कामाला शासनाकडून हिरवा कंदील दाखविण्यात आला आहे. परंतु या सागरी महामार्गामुळे द्रोणागिरी पर्वताचे नुकसान होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्‍यामुळे या सागरी महामार्गाच्या कामाला चाणजे प्रकल्प बाधित, स्थानिक शेतकरी, करंजा ग्रामस्थ, जमीनधारक, सामाजिक कार्यकर्ते, कोंढरी ग्रामस्थ यांनी विरोध केला आहे. शासनाने या परिसरातील शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन आणि ऐतिहासिक प्रसिद्ध द्रोणागिरी पर्वताला धक्का न लागता रेवस ते रेडी हा सागरी महामार्ग तयार करावा, अशी मागणी येथील ग्रामस्‍थांकडून करण्यात येत आहे.
मुंबई-गोवा महामार्गाला पर्यायी ठरणारा रायगड जिल्ह्यातील करंजा-रेवस ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेडीपर्यंतच्या सागरी महामार्गाचे भूमिपूजन राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले आहे. रेवस (रायगड) ते रेडी (सिंधुदुर्ग) या सागरी महामार्गावरील सात खाडीपुलांच्या कामाचे भूमिपूजन नुकतेच झाले. मात्र येथील शेतकरी, ग्रामस्थ, सामाजिक संस्था यांना विश्वासात न घेता भूसंपादन, जागेचा सर्व्हे शासनस्तरावर सुरू असल्याचा आरोप करण्यात येत आहे. तसेच उरण तालुक्यातील ऐतिहासिक ठेवा असणाऱ्या द्रोणागिरी पर्वताला धोका पोहोचविण्याचा घाट घातला जात आहे, असा आरोप स्थानिक करीत आहेत. त्यामुळे रेवस-रेड्डी सागरी महामार्ग प्रकल्प बाधित, स्थानिक शेतकरी, सामाजिक संस्था यांनी या कामाला विरोध दर्शविला आहे. त्‍यामुळे करंजा रेवस ते रेड्डी सागरी सेतूच्या जागेच्या मोजणीसंदर्भात पनवेल येथील उप विभागीय अधिकारी पवन चांडक यांनी घटनेची माहिती घेण्यासाठी उरण तहसील कार्यालयात संबंधित खात्याचे अधिकारी, शेतकरी यांच्यात मंगळवारी ( ता. ७) बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला उप विभागीय अधिकारी पवन चांडक, एमएसआरडीसीचे अधिकारी बोराडे, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नरेश पवार यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. या वेळी सामाजिक कार्यकर्ते सचिन डाऊर यांनी याविषयी चर्चा करून परिसरातील शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन आणि ऐतिहासिक प्रसिद्ध द्रोणागिरी पर्वताला धक्का न लागता रेवस ते रेड्डी हा सागरी महामार्ग तयार करावा, अशी मागणी त्‍यांनी अधिकारीवर्गाकडे केली. या वेळी चाणजे ग्रामपंचायत सरपंच अजय म्हात्रे, माजी सभापती सागर कडू, माजी जिल्हा परिषद सदस्य सीताराम नाखवा, करंजा ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष कल्पेश थळी, उपाध्यक्ष देवीदास थळी, मेघनाथ थळी, मुळेखंड कोंढरी ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष आणि ग्रामस्थ उपस्थित होते. या बैठकीत ऐतिहासिक आणि पौराणिक महत्त्व असलेल्या द्रोणागिरी पर्वत परिसरातून जाणाऱ्या मार्गाला ग्रामस्थांनीही कडाडून विरोध दर्शविला आहे.
...............
रेवस-रेडी महामार्गाची कल्पना दिवंगत माजी मुख्यमंत्री बॅ. ए. आर. अंतुले यांनी मांडली होती. त्यानंतर काही प्रमाणात या कामाला गतीही आली होती; मात्र निधीअभावी हा प्रकल्प रखडला. त्‍यानंतर महायुतीच्‍या काळात या प्रकल्‍पाला गती आली. महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून प्रस्तावित रेवस ते रेडी या मुंबईला थेट कोकणाशी जोडणाऱ्या सागरी महामार्गावरील उरणच्या करंजा ते अलिबाग येथील रेवस दरम्यानच्या दोन किमीच्‍या पुलाचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे केले. रेवस ते रेडी सागरी महामार्गाची एकूण लांबी ४९८ किमी इतकी आहे. पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा हा सागरी महामार्ग असणार आहे. हा महामार्ग ५४० किलोमीटर लांबीचा आहे. यासाठी चार हजार ५०० कोटी रुपये निधी लागण्याची शक्‍यात वर्तविण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com