

‘ऐरोली-काटई’साठी अधिकच्या जागेची आवश्यकता
वाढीव जागेसह खर्चाचे होणार सर्वेक्षण
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ७ : ऐरोली ते कटाई या उन्नत मार्गासाठी १२.५९ हेक्टर जागेचे संपादन ठाणे महापालिकेद्वारे करण्यात येत आहे. त्यासाठी मूळ प्रस्ताव २५३ कोटी रुपयांचा होता, मात्र या मार्गासाठी आणखी वाढीव जागेची आवश्यकता आहे. त्यामुळे त्यासाठी किती जागा लागेल आणि खर्च किती वाढेल, यासाठी सर्वेक्षण करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. ठाणे पालिका मुख्यालयात एमएमआरडीएमार्फत सुरू असलेल्या प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी घेण्यात आलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. तसेच भूसंपादन आणि वाढीव खर्च या दोन्हींचे सुधारित प्रस्ताव पाठविण्याचा निर्णयदेखील या बैठकीत घेण्यात आला.
एमएमआरडीएमार्फत ठाणे महापालिका क्षेत्र आणि परिसरात सुरू असलेल्या वाहतूक सुधारणा प्रकल्पांबाबत आढावा घेण्यासाठी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (ता. ७) बैठक झाली. या बैठकीस एमएमआरडीएचे अतिरिक्त महानगर आयुक्त अश्विन मुदगल, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, सहाय्यक संचालक नगररचना संग्राम कानडे, पोलिस उपायुक्त (वाहतूक) पंकज शिरसाट यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. घोडबंदर रस्ता आणि सेवा रस्ता यांचे एकत्रीकरण, आनंद नगर ते साकेत उन्नत रस्ता, बाळकूम ते गायमुख किनारी रस्ता, गायमुख ते पायेगाव खाडी पूल, कासारवडवली ते खारबाव खाडी पूल, कोलशेत ते काल्हेर खाडी पूल, ठाणे-बोरिवली भुयारी मार्ग या वाहतूक सुधारणा प्रकल्पांचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. ठाणे महापालिकेशी निगडित भूसंपादन, पर्यावरण परवानगी, वृक्षारोपण, जल-मल वाहिन्यांचे स्थलांतरण यावर या बैठकीत चर्चा झाली.
ऐरोली ते कटाई नाका या उन्नत रस्त्यासाठी आवश्यक असलेल्या वाढीव जागेसाठी भूसंपादन करण्याचा सुधारित प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तसेच या वाढीव भूसंपादनाच्या खर्चासाठी निधीची मागणी करण्यासाठी सुधारित प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. घोडबंदर रोड आणि सेवा रस्ता एकत्रीकरण करण्याच्या प्रकल्पात महावितरणच्या वीज वाहिन्यांचे स्थलांतरण हे मोठे आव्हानात्मक काम असेल. या वाहिन्यांच्या स्थलांतरणासाठी महावितरण, एमएमआरडीए आणि ठाणे महापालिका यांनी पुढील आठ दिवसांत एकत्रित सर्वेक्षण करावे तसेच या स्थलांतरणाचा आराखडा तयार करावा, असे निर्देश या बैठकीत देण्यात आले.
सुरक्षा अनामत रकमेबाबत सवलत
नवी मुंबई महापालिकेच्या धर्तीवर वृक्ष कापणीसाठी घेण्यात येणाऱ्या सुरक्षा अनामत रकमेत एमएमआरडीएला सवलत देण्यासाठी कायद्याचा अभ्यास करून प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी उद्यान विभागाला दिले. त्याचप्रमाणे बाधित होणाऱ्या वृक्षांचे पुनर्रोपण, नवीन झाडे लावणे ही कामेही पालिकेच्या उद्यान विभागामार्फत करण्यात येतील. त्यासाठी लागणारा खर्च एमएमआरडीएकडून दिला जाईल, असे एमएमआरडीएचे अतिरिक्त महानगर आयुक्त अश्विन मुदगल यांनी स्पष्ट केले.
ठाणे-बोरिवली भुयारी मार्ग
ठाणे-बोरिवली भुयारी मार्गाच्या कामासाठी दररोज आठ लाख लिटर पाण्याची आवश्यकता भासणार आहे. ठाणे महापालिकेच्या मल-जल शुद्धीकरण केंद्रातून प्रक्रिया केलेले पाणी या प्रकल्पासाठी देण्याबाबत या बैठकीत निर्णय घेण्यात आला. तसेच अमृत जल योजनेअंतर्गत १,५०० एमएम आकाराच्या जलवाहिनीच्या मार्ग स्थलांतराबाबतही आजच्या बैठकीत निर्देश देण्यात आले.
गायमुख ते पायेगाव खाडी पूल
गायमुख ते पायेगाव या खाडी पुलाच्या कामाला गती देण्यासाठी भूसंपादन, सीआरझेड वन विभाग अधिक क्षेत्राचा विस्तृत आराखडा १५ दिवसांत तयार करण्यात यावा, असे निर्देश अश्विन मुदगल यांनी बैठकीत दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.