

टोरेस कंपनीच्या चालक, मालकांवर गुन्हा
नवी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुप्तवार्ता पथकाची कारवाई
नवी मुंबई, ता. ७ (वार्ताहर) : शेकडो गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या टोरेस कंपनीने गुंतवणुकीवर तसेच साखळी पद्धतीने आणखी गुंतणूकदार आणल्यास त्यावर अवाजवी परतावा देण्याचे प्रलोभन दाखविल्याचे तसेच सिंथेटिक मोझीनाइट या स्टोनची भविष्यात हिऱ्यापेक्षा जास्त किंमत मिळेल, असा गुंतवणूकदारांमध्ये भ्रम निर्माण केल्याचे तपासात आढळून आले आहे. त्यानुसार नवी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुप्तवार्ता पथकाने (टोरेस कंपनीच्या) मे. प्लॅटिनम हर्न प्रा.लि.चे मालक, संचालक, सभासद, व्यवस्थापक, पर्यवेक्षक व विक्री अधिकारी या सर्वांविरोधात फसवणुकीसह अपहाराचा गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी स्वत: या प्रकरणात फिर्यादी होऊन गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे.
टोरेस कंपनीने सप्टेंबर २०२४मध्ये सानपाडा येथील मॅफ्को मार्केटसमोर आपले ज्वेलरी शॉप सुरू केले होते. त्यानंतर या शोरूममधील विक्री अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून तेथील सेमिनार हॉलमध्ये ग्राहकांना सोने, चांदी, ओरिजनल डायमंड ज्वेलरी व मोझीनाइट स्टोन खरेदीवर अवाजवी आकर्षक परताव्याचे आश्वासन देण्यात येत होते. तसेच गुंतवणूकदाराने त्याच्यासोबत दुसरा अन्य गुंतवणूकदार जोडल्यास त्याला प्रति ग्राहक २० टक्के बोनस देण्याची जाहिरातबाजीदेखील या कंपनीकडून करण्यात येत होती. तसेच साप्ताहिक लकी ड्रॉच्या माध्यमातून महागड्या कार व महागडे मोबाईल फोन जिंकता येतील, असे प्रलोभनही दाखवले होते. शेकडो ग्राहकांनी या कंपनीच्या फसव्या जाहिरातबाजीला भुलून लाखो रुपये गुंतवल्याचे समोर आले आहे.
..
आर्थिक गुप्तवार्ता विभागाला फसव्या योजनांची यापूर्वीच कुणकुण
नवी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुप्तवार्ता पथकाला ‘टोरेस’च्या फसव्या योजनांची यापूर्वीच कुणकुण लागली होती. त्यामुळे आर्थिक गुप्तवार्ता पथकाने या कंपनीच्या दुकानावर तेव्हापासूनच पाळत ठेवून टोरेस ज्वेलरी शॉपला भेट देऊन त्या ठिकाणी चालू असलेल्या व्यवसायाची कार्यपद्धती जाणून घेतली होती. तसेच गेल्या महिन्यामध्ये सानपाडा येथील टोरेस ज्वेलरी शोरूममध्ये पोलिसांनी बनावट ग्राहक बनून येथून ६,२४० रुपये किमतीच्या मोझीनाइट स्टोनची खरेदी केली होती. त्या वेळी तेथील विक्रेत्याने या स्टोनच्या गुंतवणुकीवर साप्ताहिक ९ टक्क्यांप्रमाणे ५६१ रुपये बोनस मिळेल, असे सांगून ही रक्कम पोलिसाच्या खात्यावर इन्व्हेस्टमेंट बोनस म्हणून जमादेखील केली होती.
सिंथेटिक मोझीनाइट स्टोनची विक्री
आर्थिक गुप्तवार्ता पथकाने टोरेस कंपनीच्या दुकानामधून खरेदी केलेल्या मोझीनाइट स्टोनची मुंबई, चर्नी रोड येथील भारतीय जेमोलॉजिकल संस्थेकडून तपासणी करून घेतली असता, हा स्टोन हा सिंथेटिक मोझीनाइट स्टोन असल्याचा अहवाल देण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी या स्टोनची मुंबई, हाजी अली येथील नोंदणीकृत ज्वेलरी व मोझीनाइट स्टोन व्हॅल्युअरकडून त्याचे बाजारमूल्य जाणून घेतले होते. त्याच्याकडून या सिंथेटिक मोझीनाइट स्टोनची किंमत फक्त २३० रुपये इतकी असल्याचा अहवाल देण्यात आला होता.
दोन परदेशी नागरिकांचा समावेश
नवी मुंबईच्या आर्थिक गुप्तवार्ता पथकाने टोरेस ज्वेलरी शोरूम कंपनीच्या संचालक मंडळाची माहिती घेतली असता, मे. प्लॅटिनम हर्न प्रा. लि. (टोरेस) ही कंपनी एक भारतीय व दोन परदेशी नागरिकांनी मिळवून बनविली असल्याचे व त्यामध्ये युक्रेन व रशिया या देशांतील नागरिक असल्याचे आढळून आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.