

वाशी पोलिसांकडून चार लाखांचे गोमांस जप्त
नवी मुंबई, ता. ७ (वार्ताहर) : पिकअप वाहनातून भुश्याच्या गोण्यांखाली लपवून मुंबईत विक्रीसाठी नेले जाणारे चार लाख रुपये किमतीचे २०० किलो गोमांस जप्त करण्याची कारवाई वाशी पोलिसांनी शनिवारी मध्यरात्री वाशी टोल नाका येथे केली. या कारवाईत पोलिसांनी जनावरांचे मांस घेऊन जाणारा १० लाख रुपये किमतीचे पिकअप वाहन जप्त करून बेकायदेशीररित्या मांस घेऊन जाणाऱ्या पिकअपचालकाला ताब्यात घेतले आहे.
या कारवाईत ताब्यात घेण्यात आलेला पिकअपचालक विशाल कांबळे (वय, २२) हा तरुण गत शनिवारी रात्री आपल्या पिकअपमधून गोवंश जनावरांचे मांस घेऊन मुंबईच्या दिशेने जात होता. याबाबतची माहिती प्रतीक ननावरे याला मिळाल्यानंतर त्याने आपल्या सहकाऱ्यांसह वाशी टोल नाक्यावर सदरचे पिकअप वाहन अडवून वाशी पोलिसांना याबाबतची माहिती दिली होती. त्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी धाव घेऊन पिकअपची तपासणी केली असता, पिकअपमध्ये भुश्याच्या गोण्यांच्या खाली गोवंशीय जातीच्या जनावराचे मांसाची वाहतूक करण्यात येत असल्याचे आढळून आले.
त्यानंतर पोलिसांनी पिकअप वाहनामध्ये असलेले सुमारे चार लाख रुपये किमतीचे २०० किलो जनावरांचे मांस, तसेच १० लाख रुपये किमतीचे पिकअप वाहन जफ्त करून चालक विशाल कांबळे याला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याने संगमनेर येथील जाडू नावाच्या व्यक्तीकडून सदरचे मांस पिकअपमध्ये भरून घेतल्याचे तसेच गोवंडी येथील सुलेमान कुरेशी व रईस कुरेशी यांच्याकडे ते विक्रीसाठी घेऊन जात असल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी टेम्पोचालकासह चौघांविरोधात प्राण्यांचा छळ अधिनियम तसेच इतर कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. तसेच या प्रकरणाच्या पुढील तपासाला सुरुवात केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.