मुंबईत जनाधार टिकवण्याचे काँग्रेसपुढे आव्हान

मुंबईत जनाधार टिकवण्याचे काँग्रेसपुढे आव्हान

Published on

मुंबईत जनाधार टिकवण्याचे काँग्रेसपुढे आव्हान
मोर्चेबांधणीत पक्ष मागे; कार्यकर्ते संभ्रमात
विष्णू सोनवणे : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : भाजपा आणि शिवसेना ठाकरे गट मुंबई महापालिकेतील सत्ता मिळविण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी करीत आहेत. अशा स्थितीत मुंबईतील जनाधार टिकवण्याचे मोठे आव्हान काँग्रेसपुढे असणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षनेतृत्वात आणि कार्यकर्त्यांमध्ये विस्कळीपणा असल्याने एकसंघ काँग्रेस कुठेच दिसत नाही. त्यामुळे जिंकलेल्या जागा टिकून राहतील की नाही, याबाबत काँग्रेस कार्यकर्त्यांना चिंता वाटू लागली आहे.
मुंबई काँग्रेसची धुरा मुरली देवरा आणि ॲड. गुरुदास कामत यांच्याकडे असताना पक्षाला चांगले दिवस होते. पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये चैत्यन्य दिसत होते. अलीकडेच काँग्रेसचे माजी खासदार संजय निरुपम आणि मिलिंद देवरा, काँग्रेसच्या पदाधिकारी सुशीबेन शहा यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. माजी आमदार झिशान सिद्दीकी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला आहे. तसेच काँग्रेसचे माजी नगरसेवक आणि माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी थेट भाजपामध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबत त्यांच्या समर्थकांनीही पक्षप्रवेश केला आहे.
सर्वच राजकीय पक्षांनी मुंबईमध्ये पक्षवाढीसाठी प्रयत्‍न सुरू केले आहेत. त्यात भाजपा आणि शिवसेना ठाकरे गट आघाडीवर आहे. हे पक्ष मुंबई जिंकण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी करीत आहेत. त्या तुलनेत काँग्रेस कुठेच दिसत नाही. मुंबईतील काँग्रेसच्या विविध विंगही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सक्रिय दिसत नाहीत. पक्षाचे कार्यकर्ते संभ्रमावस्थेत आहेत. त्यांना कार्यक्रम नाही. पक्षाच्या नेत्यांमध्येही संवाद नाही. त्यामुळे काँग्रेस पक्ष निवडणुकीला कसा सामोरा जाणार, याबाबत पक्ष कार्यकर्त्यांनाच चिंता वाटू लागली आहे.

खासदार - वर्षा गायकवाड
आमदार - अस्लम शेख, अमिन पटेल, ज्योती गायववाड
़़़़़़़़़़़़़़़
२०१७चे पालिकेतील पक्षीय बलाबल
शिवसेना - ९६
भाजपा - ८२
काँग्रेस - २९
राष्ट्रवादी काँग्रेस - ८
सपा - ६
एमआयएम - २
मनसे - १

गेल्‍या निवडणुकीत मिळालेल्‍या जागा काँग्रेसला टिकवाव्या लागतील किंवा त्यापेक्षा अधिक जागा मिळविण्याचा प्रयत्न करावा लागेल अन्यथा मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होईल. पक्षांतर्गत परिस्थिती नियंत्रित करावी लागेल. प्रत्‍येक निवडणुकीत आपण एक नंबरवर असू असे काँग्रेसच्या नेत्‍यांना वाटते, पण असे होत नसते. जनाधार टिकवून ठेवायला हवा. याचा पक्षश्रेष्ठींनी विचार करणे गरजेचे आहे.
- प्रताप आसबे,
ज्येष्ठ पत्रकार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com