पालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घेतले सुलेखनाचे धडे

पालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घेतले सुलेखनाचे धडे

Published on

वाशी, ता. १८ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिकेच्या वतीने राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागामार्फत मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. पहिल्या व्याख्यानात राज्याचे सेवानिवृत्त उपसचिव वसंत चौधरी यांनी कार्यालयीन टिप्पणी व मराठी सुलेखन या विषयावर अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. त्यांनी अत्यंत सोप्या पद्धतीने फाईल अर्थात नस्तीचे स्वरूप, प्रशासकीय लेखन, टिप्पणी लेखन, पत्रलेखन, कार्यालयीन कागदपत्रे मांडणीची सहा गठ्ठे पद्धती, तसेच अभिलेखाचे वर्गीकरण अशा महत्त्वपूर्ण विषयांवर सविस्तर माहिती दिली.
सरकारी पत्रव्यवहाराचे निरनिराळे प्रकार सांगत वसंत चौधरी यांनी त्यावरील सुयोग्य कार्यवाहीविषयी विवेचन केले. परिपूर्ण नस्ती कशी असावी हे सांगताना त्यांनी टिप्पणी व पत्रलेखनाच्या तांत्रिक बाजू, पत्राचा मसुदा कसा असावा याविषयीही मार्गदर्शन केले. कार्यालयातील सहा गठ्ठे मांडणी पद्धतीची वैशिष्ट्ये विशद करीत त्यांनी कार्यालयातील अभिलेखाचे अ, ब, क, ड स्वरूपात संग्रहणाचे महत्त्व सांगितले व कागदपत्रांच्या तत्पर उपलब्धतेच्या अनुषंगाने कार्यपद्धतीची गरज सांगितली. सरकारी कार्यालयीन कामकाजाच्या पद्धतीविषयी वसंत चौधरी यांच्यासारख्या शासनातील कायदेविषयक अनुभवसंपन्न व्यक्तिमत्वाच्या मार्गदर्शनाचा लाभ मराठी भाषा पंधरवड्याच्या निमित्ताने नवी मुंबई महापालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना होत असल्याचा आनंद व्यक्त करीत आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी आजच्या प्रशिक्षणाचा उपयोग कार्यालयीन लेखन व कामकाजातील सुधारणांसाठी होईल, असा विश्वास व्यक्त केला.
------------------
मराठीची महती वाढली
आपल्या दैनंदिन व्यवहारात भाषा ही अत्यंत महत्त्वाची असून, ती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे शुद्ध स्वरूपात पोहोचविण्याची सामाजिक जबाबदारी प्रत्येकाने पार पाडली पाहिजे. त्यासाठी मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे, असे आयुक्तांनी सांगितले. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्याने मराठी भाषेची प्राचीनता सिद्ध होऊन तिची महती वाढली असल्याचा आनंद व अभिमान आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com