ठाणे थोडक्यात
महापालिकेतील ई-टेंडर प्रणाली बंद
कल्याण (वार्ताहर) : माजी नगरसेवक मोहन उगले यांनी कल्याण डोंबिवली महापालिकेतील ई-टेंडर प्रणाली निविदा प्रक्रियेत निविदा उघडण्याचे काम मागील दोन दिवसांपासून बांधकाम विभागात होत नसल्याचा आरोप केला आहे. कल्याण-डोंबिवली बांधकाम विभागात टेंडर निविदा प्रक्रिया, तत्सम कामे ठप्प झाल्याबाबत मोहन उगले यांनी संबंधित विभागातील अधिकारी यांना विचारले तेव्हा नेटवर्क नसल्याचे त्यांनी सांगितले. तर पालिकेचे सिस्टीम विभागाचे अधिकारी प्रमोद कांबळे यांनी असा काही प्रकार नसल्याचे सांगितले. बांधकाम विभागातील संदर्भित अधिकारी यांनी गेल्या दोन दिवसांपासून नेटवर्क येत नसल्याचे सांगितले.
.....................
ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
कल्याण (वार्ताहर) : शिवसेना ठाकरे गटाचे रामबाग शाखेचे कार्यालय प्रमुख संदेश वाघदरे, शिवसैनिक हमिद शेख यांनी शिवसेना शिंदे गटाचे कल्याण-मुरबाड जिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेत प्रवेश केला. आमदार विश्वनाथ भोईर यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. आमदार विश्वनाथ भोईर यांनी संदेश वाघदरे यांची कल्याण-मुरबाड जिल्हाप्रमुख यांच्या कार्यालयाचा कार्यालय प्रमुख म्हणून नियुक्ती जाहीर केली. या वेळी कल्याण डोंबिवली महापालिकेचे माजी परिवहन सभापती मनोज चौधरीदेखील उपस्थित होते.
..............
माल्हेड येथे अखंड हरिनाम सप्ताह
मुरबाड (वार्ताहर) : तालुक्यातील माल्हेड येथे माजी आमदार गोटीराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अखंड हरिनाम सप्ताहाचे मागील १३ वर्षांपासून आयोजन करण्यात येत आहे. यंदा या सोहळ्यासाठी सुभाष गोटीराम पवार यांनी विशेष योगदान दिले. या कार्यक्रमात संपूर्ण मुरबाड तालुक्यातील वारकरी संप्रदाय मोठ्या संख्येने सहभागी झाला होता. अखिल मुरबाड तालुका कीर्तनकार, प्रवचनकार, कथाकार, भागवतकार, गायक, वादक, विणेकरी, टाळकरी, चोपदार यांच्या विशेष उपस्थितीत व ग्रामस्थ मंडळ माल्हेड यांच्या विशेष सहयोगाने हा हरिनाम सप्ताह सोहळा साजरा करण्यात आला. ह.भ.प. महेश महाराज साळुंके (पनवेल) यांच्या उपस्थितीत पालखी सोहळा पार पडला.
.........................
टिटवाळ्यात संत वामनभाऊ महाराज पुण्यतिथी सोहळा
टिटवाळा (वार्ताहर) : थोर समाजसुधारक, अध्यात्म व शिक्षण प्रचारक भगवानबाबा आणि संत वामनभाऊ महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्याचे आयोजन राष्ट्रसंत भगवानबाबा सेवा मंडळ, टिटवाळा यांच्यावतीने करण्यात आले आहे. हा सोहळा शुक्रवारी (ता. १७) सुरू झाला असून, या सोहळ्याची सांगता रविवारी (ता. १९) सकाळी काल्याच्या कीर्तनाने होणार आहे. त्यानंतर दुपारी १२ ते ३ या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे अग्निशमन केंद्र कार्यालयाच्या पाठीमागे गणेश मंदिर रोड या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला आहे.
.....................
कुस्ती, मॅरेथॉन स्पर्धेत ७५ विद्यार्थ्यांचा सहभाग
खर्डी (बातमीदार): शहापूर तालुक्यातील मोहिली-अघई येथील आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलात क्रीडा व युवक सेवा संचालनालय व जिल्हा क्रीडा परिषद ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय मिनी मॅरेथॉन व कुस्ती स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत एकूण ७५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. मॅरेथॉन स्पर्धेत वंदना ठाकूर, प्रियुशा लोहार, स्नेहा निखाडे, नमिता टोपले, अस्मिता पांढरे, सुषमा पडेल, रोशनी ठाकरे, हर्षला डपका, प्रतीक लहारे, ललित खिलारे, अमोल बरसट, करण फुफाणे, समीर खांदे यांनी प्रावीण्य मिळवले. कुस्ती स्पर्धेत पल्लवी पवार, तृप्ती वळवी, वैष्णवी सोनवणे, जानवी जाधव, सेजल महंती, चंदना चव्हाते, दक्ष लोखंडे, सोहम जाधव, अर्जुन वाघ यांनी प्रावीण्य मिळवले. विजेत्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या वेळी कार्याध्यक्ष उमेश जाधव, नंदकुमार सूर्यवंशी, अनंत गायकवाड, प्रवीण मोरे, उल्हास पाटील, प्राचार्य पंकज बडगुजर, कैलास थोरात, उपप्राचार्य दीपाली खांडगे, बिकास रॉय व पुरुषोत्तम पानबुडे आदी मान्यवर उपस्थित होते.
....................
अपघातांचे प्रमाण रोखण्यासाठी रस्ता सुरक्षा अभियान
खर्डी (बातमीदार) : वाहनचालकांनी हेल्मेट न वापरणे, नशेत वाहन चालवणे, वाहन चालवताना मोबाईलवर बोलणे, सीटबेल्ट न लावणे, रस्ता ओलांडताना सिग्नल न पाहणे या व इतर अनेक कारणांमुळे राष्ट्रीय महामार्गावरील अपघातांचे प्रमाण वाढले आहे. अपघातांचे प्रमाण रोखण्यासाठी व आपला जीव वाचविण्यासाठी वाहनचालकांनी नियमांचे पालन करावे तसेच चालकांमध्ये जनजागृती व्हावी, या उद्देशानेच राज्यात राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येत असल्याचे पोलिस उपअधीक्षक कल्पना गाडेकर यांनी शहापूर येथे रस्ता सुरक्षा अभियानात मार्गदर्शन करताना सांगितले. मागील सहा महिन्यांत राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघातांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. चालकांनी वाहन चालवताना काळजी घेणे आवश्यक असल्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक छाया कांबळे यांनी सांगितले. वाहनचालकांच्या निष्काळजीपणामुळे अपघात घडत असल्याचे पोलिस निरीक्षक संतोष खानविलकर यांनी सांगितले. या वेळी पोलिस निरीक्षक नंदू उघडे, योगेश हजारे, सरपंच सुनील भेरे, रामकृष्ण निचिते, जगदीश पवार, विठ्ठल भेरे, जीवरक्षक सामाजिक संस्थेचे रवींद्र मडके उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

