खारघरमध्ये पुन्हा आठवडा बाजार

खारघरमध्ये पुन्हा आठवडा बाजार

Published on

खारघर, ता. १८ (बातमीदार) : महापालिका हद्दीतील विनापरवानगी आठवडा बाजार व अनधिकृत हातगाड्यांवर कारवाई करण्याची मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी पालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्याकडे केली होती. त्यानंतर तळोजा आणि खारघर परिसरातील आठवडा बाजार बंदही करण्यात आले होते; मात्र आमदारांच्या पत्राला केराची टोपली दाखवत खारघर सेक्टर ३६मध्ये आठवडा बाजार भरविला जात असल्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
पनवेल महापालिका हद्दीत सुरू असलेले आठवडा बाजार हे कोणत्याही अधिकृत परवानग्या न घेता काही लोकांच्या दादागिरीने सुरू आहेत. पालिकेचे काही अधिकारी याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप परिसरातील रहिवाशांनी केला आहे. बाजारातील हातगाड्यांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून, हातगाड्यांवर व्यवसाय करणारे बांगलादेशी लोक असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. आठवडा बाजार व हातगाड्यांवर अनैतिक व्यवसाय चालत असल्याच्या तक्रारी येत आहेत. नागरिकांकडून वेळोवेळी यासंदर्भातील तक्रारी महापालिकेकडे करण्यात आल्या आहेत; परंतु महापालिका अधिकाऱ्यांकडून त्यांच्या तक्रारीला केराची टोपली दाखवली जात असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. पालिकेने कोणाच्याही दबावाला बळी न पडता आठवडा बाजार व हातगाड्यांवर पूर्णपणाने कारवाई करावी अन्यथा १ जानेवारीपासून व्यापक आंदोलन करणार असल्याचे लेखी निवेदन आमदार प्रशांत ठाकूर यांनी १२ डिसेंबरला आयुक्त मंगेश चितळे यांना दिले होते. पत्र दिल्यानंतर खारघर, तळोजामधील आठवडा बाजार बंद झाले होते; मात्र काही दिवसांनी खारघर सेक्टर ३६ मधील सिडकोच्या स्वप्नपूर्ती सोसायटीसमोरील आणि गणेशपुरी गावाकडे जाणाऱ्या रस्त्याकडेला आणि पदपथावर बाजार भरविला जात असल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे.
------------
सेक्टर ३६ येथील सिडकोच्या स्वप्नपूर्ती सोसायटीसमोरील आणि गणेशपुरी गावाकडे जाणाऱ्या रस्त्याकडेला, पदपथांवर मागील गुरुवारपासून रात्री आठनंतर आठवडा बाजार सुरू असतो. पालिका अधिकारी आल्यावर फेरीवाले हातगाड्या आणि टेम्पो काही अंतरावर घेऊन जात असतात. अधिकारी गेल्यावर पुन्हा बाजार सुरू होतो. गुरुवारी (ता. १६) रात्री साडेअकरा वाजेपर्यंत आठवडा बाजार सुरू होता. पालिका अधिकारी कारवाईचा केवळ दिखावा करीत असल्याचे दिसून येत आहे.
- पांडुरंग गुळवे, रहिवासी, खारघर
---------------------
फेरीवाले विविध वस्तू विकण्यासाठी खारघरमध्ये मोठ्या प्रमाणात येत असतात. सेक्टर ३६मध्ये आठवडा बाजार सुरू झाल्याची माहिती मिळताच बाजारावर कारवाई करून विक्रेत्यांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
- अमर पाटील, प्रभाग अधिकारी, नावडे

------------
नावडे प्रभाग अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
खारघर सेक्टर ३० ते ४० तसेच तळोजा वसाहत, नावडे नोड आणि परिसरातील गावे मिळून नावडे उपप्रभाग कार्यालयाअंतर्गत समावेश करून यासाठी स्वतंत्र प्रभाग अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. खारघर सेक्टर १ ते २७ परिसरात आठवडा बाजार सुरू होऊ नये तसेच पदपथावर फेरीवाल्यांनी अतिक्रमण करू नये, यासाठी प्रभाग अधिकारी लक्ष ठेऊन आहेत. मात्र नावडे उपविभाग कार्यालयाकडून आठवडा बाजार आणि फेरीवाल्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com