शहापूर तालुक्यात निकृष्ट कामांचा सपाटा

शहापूर तालुक्यात निकृष्ट कामांचा सपाटा

Published on

शहापूर तालुक्यातील कामे निकृष्ट दर्जाची
अधीक्षक अभियंत्यांकडे तक्रार : उपकार्यकारी अभियंत्यांचे शहापूर कार्यालयाला चौकशीचे आदेश
किन्हवली, ता. १८ (बातमीदार) : शहापूर तालुक्यातील विविध गावपाड्यांवर सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत केलेल्या रस्ते, संरक्षक भिंती, पूल, साकवाची कामे निकृष्ट पद्धतीने करण्यात आल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते भूषण साबळे यांनी अधीक्षक अभियंत्यांकडे केली होती. या तक्रारीची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता यांनी चौकशी करून अहवाल उपविभागीय कार्यालयाला सादर करण्याचे आदेश शहापूर सार्वजनिक बांधकाम उपविभागीय अभियंत्यांना दिले आहेत.

२०२४ मध्ये शहापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात विकासकामे करण्यात आली आहेत; मात्र यातील काही कामे सहा महिन्यांच्या आतच खराब झाली असून, उर्वरित कामेही अत्यंत निकृष्ट दर्जाची असल्याचा आरोप होत आहे. अंदाजपत्रकानुसार काम न करणे, योग्य दर्जाच्या स्टीलचा वापर न करणे, संरक्षक भिंतींत मोठ्या प्रमाणात दगडांचा भरणा करणे, डांबरी रस्त्यावरील काही लेयर न टाकणे, काँक्रीटीकरण करताना खडीकरण न करताच आरएमसी टाकणे अशा गैरप्रकारांमुळे अनेक ठिकाणी नव्याने बांधलेल्या रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. रस्ते खचले आहेत.

काँक्रीट रस्त्यांना मोठा निधी मिळत असूनही कामांचा दर्जा निकृष्ट असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते भूषण साबळे यांनी केला आहे. वाशिंद, मानसमंदिर रोड, खर्डी विभाग, डोळखांब विभाग, किन्हवली, शेंद्रूण विभाग, सावरोली(सो) अशा अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाची कामे झाली आहेत. बहुतांश काँक्रीट रस्त्यांना मोठ्या प्रमाणात तडे गेले आहेत. जीएसबी, डीएलसी, पीक्यूसी यांचे मापांनुसार कामे न केल्याने कामांचा दर्जा घसरल्याचे दिसून येत आहे. सावरोली ग्रामपंचायत क्षेत्रात रस्त्यालगतच्या सुरक्षा भिंतीत काँक्रीटऐवजी मोठमोठे दगड भरल्याचे प्रकरण ताजे असतानाच पुन्हा एकदा सावरोलीतच खडीकरण न करताच मातीवरच काँक्रीट टाकले आहे.

डांबरीकरण रस्त्यांच्या कामात डब्ल्यूबीएम, ग्रेड १/२, एमपीएम, बीएम, बीसी यांचा वापर कमी प्रमाणात केल्याचा आरोप होत आहे. बहुतांश कामांचे टेस्ट रिपोर्ट आढळून येत नसल्याची गंभीर बाब समोर येत आहे. याप्रकरणी अभियंते व अधिकारीवर्गाचीही चौकशी व्हावी, अशी मागणी साबळे यांनी केली आहे. संबंधित अधिकारी वारंवार माहिती आणि पत्र देऊनसुद्धा कोणत्याही प्रकारची कारवाई करत नाहीत. निकृष्ट दर्जाची कामे लक्षात आणून दिल्यानंतरही ती न तोडताच पूर्ण केली असून, बिलेही काढली आहेत.

निकृष्ट दर्जाची कामे तोडून अधिकारी आणि ठेकेदारांकडून सर्व खर्च वसूल करून नव्याने कामे करावीत. संबंधित सर्व अधिकारीवर्गाची चौकशी करावी, तसेच गुन्हे दाखल करून निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी अधीक्षक अभियंता यांच्याकडे भूषण साबळे यांनी केली होती. त्याची दखल सार्वजनिक बांधकाम विभाग ठाणे-२ च्या उपकार्यकारी अभियंता बी. पी. पंडित यांनी घेतली असून, शहापूर सा. बांधकाम उपविभागाला लेखी आदेश काढत चौकशी करून उपविभागीय कार्यालयास अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.

शहापूर तालुक्यातील निकृष्ट कामांच्या चौकशीसाठी सातत्याने पाठपुरावा करत आहे. नुकताच बांधकाम विभागाच्या उपकार्यकारी अभियंता चौकशीचे आदेश शहापूर कार्यालयाला आले आहेत. याप्रकरणी ठेकेदारांच्या दबावाला बळी न पडता निष्पक्ष चौकशी होणे अपेक्षित आहे. अन्यथा मला उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागेल.
- भूषण साबळे, तक्रारदार, शहापूर

निकृष्ट कामांच्या चौकशीबाबतचे उपकार्यकारी अभियंता, ठाणे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पत्राच्या अनुषंगाने तक्रारदार भूषण साबळे यांना बोलवून त्यांना आक्षेप असलेल्या कामांची माहिती घेऊ.
- बी. आर. कांबळे, उपविभागीय अभियंता शहापूर सार्वजनिक बांधकाम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com