मुंबईसह एमएमआरला उन्हाळ्यात विजेचे नो टेन्शन

मुंबईसह एमएमआरला उन्हाळ्यात विजेचे नो टेन्शन

Published on

मुंबईसह एमएमआरला उन्हाळ्यात विजेचे नो टेन्शन
- महापारेषणने कळवा-पडघा वीजवाहिन्यांची क्षमता वाढवली; अतिरिक्त २,१०० मेगावॉट वीज आणता येणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : मुंबई, ठाण्यासह एमएमआर क्षेत्राच्या विजेच्या मागणीत झपाट्याने वाढ होत असली तरी उन्हाळ्यात येथील ग्राहकांना विजेचे टेन्शन राहणार नाही. मुंबईसह एमएमआर क्षेत्राला अतिरिक्त वीजपुरवठा करता यावा म्हणून महापारेषणने कळवा-पडघा १ आणि २ उच्च क्षमतेच्या वीजवाहिन्यांचे जुने कंडक्टर बदलून उच्च क्षमतेचे नवीन कंडक्टर लावले आहेत. त्यामुळे दोन्ही वीजवाहिन्यांची वीज वाहून नेण्याची क्षमता दुप्पट म्हणजे २,००० मेगावॉटवरून तब्बल ४,२०० मेगावॉट एवढी झाली आहे. त्यामुळे मुंबईसह परिसराला मुबलक वीज उपलब्ध होऊ शकणार आहे.
मुंबईसह परिसरातील वीज मागणीत सातत्याने वाढ होत आहे. ही मागणी पूर्ण करण्यात महापारेषणच्या कळवा-पडघादरम्यान असलेल्या ४०० केव्हीच्या उच्चदाब वीजवाहिन्या महत्त्वाची भूमिका पार पाडतात. त्या पार्श्वभूमीवर महापारेषणने कळवा-पडघा वाहिनी क्र. १चे सध्याचे जुने कंडक्टर बदलून त्याऐवजी नवीन उच्च क्षमतेचे कंडक्टर लावण्याचे महत्त्वाकांक्षी काम महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीकडून ५००हून अधिक कुशल कर्मचाऱ्यांच्या मदतीने अवघ्या १७ दिवसांत पूर्ण केले आहे. तर वाहिनी क्रमांक २चे काम त्याआधी पूर्ण झाले आहे. त्यामुळे ५०० पेक्षा अधिक कुशल कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने विक्रमी वेळेत नुकतेच हे काम पूर्ण झाले. वाहिनी क्र. १ आणि वाहिनी क्र. २ या दोन्ही वाहिन्या मिळून २,००० मेगावॅटऐवजी ४ हजार २०० मेगावॅट इतक्या विजेचे आता मुंबईपर्यंत वहन करता येणार आहे. हे काम महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार यांच्या नेतृत्वाखाली संचालक (संचलन) सतीश चव्हाण व वाशी परिमंडळाचे मुख्य अभियंता महेश भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

रेल्वे लाइन, हायवे, वीजवाहिन्यांचे आव्हानात्मक क्रॉसिंग
कळवा-पडघा या वाहिनीचे २७ किमीचे काम २०२३-२४ मध्ये पूर्ण झाले होते. उर्वरित २३ किमीचे काम महापारेषणने युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे नियोजन केले. या वाहिनीच्या मार्गात रेल्वे लाइन, हायवे व उच्च विद्युत वाहिन्यांचे क्रॉसिंग हे मोठे आव्हान होते. तसेच डोंगराळ भागातून वाहिन्या टाकताना अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. त्याचबरोबर स्थानिक ग्रामस्थांच्या रोषाचा सामना करावा लागला. या सर्व अडचणींवर मात करून महापारेषणने या वाहिनीच्या कामात गतिशीलता आणण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर व विविध भागधारकांशी सकारात्मक सुसंवाद साधून २३ किलोमीटरच्या वीजवाहिनीचे काम पूर्ण केले आहे.

१२ ऑक्टोबरसारखी परिस्थिती टळणार
१२ ऑक्टोबर २०२० मध्ये ग्रीडमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मुंबई, ठाण्यासह नवी मुंबईच्या अनेक भागांत ब्लॅकआऊट झाला होता. टाटाच्या वीज केंद्रातून पुरेशी वीजनिर्मिती शक्य नव्हती, तर महापारेषणची कळवा-खारघर एक वीजवाहिनी बंद असल्याने आणि दुसरी वाहिनी मेन्टनन्ससाठी आधीच बंद ठेवली असल्याने राज्यभरात मुबलक वीज उपलब्ध असतानाही उच्च क्षमतेची वीजवाहिनी नसल्याने मुंबईत वीज आणता आली नव्हती. त्यामुळे मुंबई, शहर, पूर्व-पश्चिम उपनगर, ठाणे, नवी मुंबईच्या अनेक भागांत आठ-बारा तासांचे भारनियमन करावे लागले होते. मात्र आता महापारेषणच्या कळवा-पडघा वीजवाहिन्यांची क्षमता वाढली आहे. त्यामुळे आणीबाणीच्या वेळी राज्यभरातून मुंबईत अतिरिक्त वीज आणता येणार असल्याने ऑक्टोबरसारखी ब्लॅकआऊटची परिस्थिती टाळता येणार असल्याचे महापारेषणच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com