ठाण्याला मिळणार व्हिविंग टॉवरची ओळख

ठाण्याला मिळणार व्हिविंग टॉवरची ओळख

Published on

ठाण्याला मिळणार व्हिविंग टॉवरची ओळख
देशातील सर्वांत उंच प्रतिकृती उभारण्याचा मानस : पर्यटनाला चालना, रोजगार वाढणार
हेमलता वाडकर : सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १८ : तलावांचे शहर म्हणून ओळख असलेले ठाणे भविष्यात देशातील सर्वांत उंच अशा व्हिविंग टॉवरमुळे ओळखले जाणार आहे. ठाणे महापालिकेच्या शहर विकास आराखड्यात या व्हिविंग टॉवरचा प्रस्ताव आहे. कासारवडवली, गायमुखजवळ हा टॉवर उभारण्यात येणार आहे. या टॉवरच्या उंचीवरून एका बाजूला सुंदर खाडीचे दृश्य, दुसरीकडे निसर्गाने नटलेले येऊरच्या जंगलासह ठाण्याच्या सौंदर्याचे दर्शन घडणार आहे. विशेष म्हणजे या व्हिविंग टॉवरखालून कोस्टल रोड जाणार असून, इतर प्रमुख रस्तेही जोडण्यात येणार आहेत. त्यामुळे केवळ राज्यातून, देशातून नव्हे तर जगभरातून पर्यटक ठाण्यात हे व्हिविंग टॉवर पाहण्यासाठी येतील आणि पर्यटनासह रोजगाराला बळकटी मिळेल, असा विश्वास पालिकेने व्यक्त केला आहे.

जगभरात सध्या उंच टॉवरची स्पर्धा सुरू झाली आहे. यामध्ये जपान टोकिओ येथील स्कायट्री हा सर्वांत उंच ६३५ मीटरचा टॉवर आहे. त्या खालोखाल चीन येथील ६०० मीटर उंचीचा कॉनटॉन टॉवर आहे. कॅनडाचे जीएन टॉवर, उजेकिस्तानचे टस्किन टॉवर, पॅरिसचा आयफेल टॉवर पाहिल्याशिवाय विश्वभ्रमंती आणि पर्यटन अपुरे समजले जाते. हे टॉवर त्या त्या देशाची ओळख बनले आहेत. भारतातही दिल्ली येथे लोटस टॉवर आहे. त्याची उंची ३५ मीटर इतकी आहे, तर गुजरात राज्यात स्टॅच्यू ऑफ युनिटी हे सरदार वल्लभभाई पटेल यांची साकारलेली १८२ मीटरची प्रतिकृती आहे. ही प्रतिकृती पाहण्यासाठी देश-विदेशातील पर्यटक गुजरातला येतात. त्यामुळे पर्यटनाच्या त्याच धर्तीवर पण जगाशी स्पर्धा करणारा व्हिविंग टॉवर उभारण्याचा मानस ठाणे महापालिकेने सोडला आहे. पुढील २० वर्षांतील शहराचा सुधारित आराखडा तयार करताना या व्हिविंग टॉवरला पालिकेने मानाचे स्थान दिले आहे.

ठाणे हे तलावांचे शहर म्हणून ओळखले जाते. ऐतिहासिक वारसा या ठाण्याला आहेच, पण विकासाच्या दृष्टीनेही अनेक नवीन पॅटर्न हे ठाण्यातून देशभरात पोहोचले आहेत. येत्या काळात ठाण्याचा विकास झपाट्याने होईल या वेगाने पावले उचलली जात आहेत. सीबीडी म्हणजे सेंट्रल बिझनेस डिस्ट्रीक, कोस्टल अर्बन फॉरेस्ट, मेंग्रोचे वन, डिजिटल युनिव्हर्सिटी, वॉटर प्लांट, आंतरराष्ट्रीय दर्जाचे पक्षीगृह अशी अनेक विकासकामे त्यातून होणार आहे. यामध्ये व्हिविंग टॉवर मोलाची भर टाकेल, असा विश्वास ठाणे महापाकिलेला आहे. पालिकेने सुधारित विकास आराखड्यात प्रस्तावित केलेले व्हिविंग टॉवर कासारवडवली, गायमुख जवळ असेल. कोस्टल रोडच्या जक्शनला लागून हा १६० मीटर उंचीचा आणि ९१.१४ मीटर रुंदीचा टॉवर असणार आहे. राणीच्या मुकुटाचा आकार असलेल्या हा टॉवर चार भागाने जोडला जाणार आहे, तर वर अंडाकृती शिरोमणी असणार आहे. या शिरोमणी आकाराच्या इमारतीमधून संपूर्ण ठाणेच नव्हे तर वसई, पालघरचा काही भागही पाहता येणार आहे. तर खालून कोस्टल रोड जाणार आहे. भारतातील हा सर्वांत उंच व्हिविंग टॉवर ठरेल, असा दावा पालिकेने केला आहे.

ठळक मुद्दे
टॉवरच्या बाजूला रोजगारनिर्मितीकरिता बिकेसी पेक्षाही आधुनिक असे व्यापारी केंद्र उभारण्यात येणार आहे. याशिवाय, इम्स, डिजिटल युनिर्व्हसीटी, आयटीसीची निर्मिती होणार आहे. त्यामुळे महामुंबई परिक्षेत्रामध्ये उद्योगाचे हब उदयास येणार असून, त्याचे केंद्रबिंदू ठाणे महापालिका असणार आहे.

ठाण्याची मान उंचावणार
प्रख्यात वास्तुविशारद हाफीज कॉन्ट्रॅक्टर यांनी या व्हिविंग टॉवरचे डिझाइन तयार केले आहे. या व्हिविंग टॉवरमध्ये इमारती असतीलच पण मुख्य आकर्षण हे चार इमारतींना जोडणारे शिरोमणी ठरणार आहे. त्यामुळे भविष्यात जपान, पॅरिस, चीनमध्ये जसे टॉवर पाहण्यासाठी पर्यटक जातात, तसेच भारतात येणारे पर्यटक ठाण्यातील व्हिविंग टॉवर पाहण्यासाठी येतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाणे पालिका आयुक्त सौरभ राव यांनी हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यामुळे हा प्रकल्प मार्गी लागला, तर तमाम ठाणेकरांसाठी ही मान उंचावणारी बाब असणार आहे.

टॉवरची उंची १६० मीटर
रुंदी ९१.१४ मीटर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com