

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १८ ः डॉ. डी. वाय. पाटील स्टेडिअममधील ‘कोल्ड प्ले’ सांगीतिक कार्यक्रमाचा परिणाम शनिवारी नवी मुंबईतील वाहतुकीवर दिसून आला. या कार्यक्रमासाठी आलेल्या प्रेक्षकांची वाहने रस्त्यालगतच उभी केल्यामुळे एकीकडे सायन-पनवेल महामार्गावर चार किलो मीटरपर्यंतच्या रांगा लागल्या होत्या, तर दुसरीकडे अंतर्गत रस्ते वाहतूकही पोलिसांनी बंद केल्यामुळे नेरूळ परिसरातील वाहतूक कोंडीने रुग्णसेवेलाही फटका बसला.
नेरूळच्या डॉ. डी. वाय पाटील स्टेडिअमवर जगप्रसिद्ध ‘कोल्ड प्ले’ हा लाइव्ह संगीताचा कार्यक्रम सुरू आहे. या कार्यक्रमासाठी परदेशातील तसेच देशाच्या कानाकोपऱ्यातूनही मोठ्या संख्येने तरुणाई नवी मुंबईत दाखल झाली आहे. या कार्यक्रमासाठी पुढील तीन दिवस शहरातील अवजड वाहतूक बंद करण्यात आली आहे. तसेच नेरूळ परिसरातील अंतर्गत सेवा रस्तेही पोलिसांनी बंद केले आहेत. त्याचा परिणाम सायन-पनवेल महामार्गावर शनिवारी संध्याकाळी दिसून आला. सीबीडी-बेलापूरहून वाशीकडे जाणाऱ्या मार्गावर अनेकांनी वाहने रस्त्याच्या कडेला उभी केल्याने वाहनांचा वेग मंदावला होता. परिणामी, वाहनांच्या रांगा बेलापूरपर्यंत गेल्या होत्या. तसेच वाशीहून सीबीडी-बेलापूरकडे जाणाऱ्या मार्गिकेवरही वाहनांचा वेग मंदावला होता.
-------------------------
नेरूळकरांना मनस्ताप
- नेरूळमधील अंतर्गत रस्ते कार्यक्रमानिमित्त पोलिसांनी बंद केले होते. डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयाकडे जाणारा शनिदेव मंदिर मार्ग वाहतुकीसाठी बंद होता. पोलिसांनी मार्गाच्या प्रवेशद्वारावर बॅरिकेड लावले होते. तसेच रिक्षा तसेच दुचाकीलादेखील जाण्यास मनाई केल्याने अनेकांना पायी रुग्णालय गाठावे लागले.
- सायन-पनवेल महामार्गावरील कोंडीमुळे मुंबईला जाण्यासाठी अनेकांनी पर्यायी मार्ग म्हणून पामबीच मार्ग निवडला होता. त्यामुळे अचानक एकाचवेळी मोठ्या संख्येने पामबीच मार्गावर वाहने वाढल्याने या मार्गावरील वाहतुकीचा वेग मंदावला.
-------------------------------
काँग्रेसकडून आगपाखड
डॉ. डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटीलगतचे सर्व रस्ते पोलिसांनी वाहतुकीकरिता बंद केले होते. त्यामुळे वाहनांच्या रांगांबरोबर कार्यक्रमासाठी आलेल्या तरुणाईची गर्दी एकाच वेळी झाल्यामुळे काही काळासाठी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. या वेळी काँग्रेसचे माजी नगरसेवक संतोष शेट्टी आणि प्रवक्ते रवींद्र सावंत यांनी पोलिसांनाच धारेवर धरले. अखेर वाहतूक पोलिस उपायुक्त तिरुपती काकडे यांनी घटनास्थळी धाव घेत रिक्षा थांब्यावर १० रिक्षा उभ्या करण्याची परवानगी दिली. तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक, एसबीआय कॉलनी, आर्मी कॉलनी येथील वाहतूक कोंडी सोडवली.
---------------------------------
वाहतुकीत कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांचा फौजफाटा तैनात होता. बाहेरून येणाऱ्या लोकांकरिता सहा ठिकाणी पार्किंगची व्यवस्था होती. बंद पडलेली वाहने काढण्यासाठी १७ टोइंग व्हॅन आहेत. त्यामुळे वाहतूक बंद नव्हती. फक्त काही ठिकाणी गती मंदावली, पण पोलिसांनी तत्काळ वाहतूक पूर्ववत केली.
- तिरुपती काकडे, पोलिस उपायुक्त, नवी मुंबई पोलिस
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.