शिलालेखांमुळे मराठीच्या प्राचीन इतिहासाची ओळख

शिलालेखांमुळे मराठीच्या प्राचीन इतिहासाची ओळख

Published on

अभिजात मराठी...


शिलालेखांमुळे मराठीच्या प्राचीन इतिहासाची ओळख

नाणेघाट, अक्षी, श्रवणबेळगोळचे आद्य शिलालेख

संजीव भागवत : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : मराठी भाषेचे वय आणि तिची प्राचीनता विविध प्राकृत ग्रंथांतील उल्लेख आणि नोंदीवरून झाली असतानाच सुमारे अडीच हजार वर्षांपासून राज्यात आणि राज्याबाहेर मिळालेले शिलालेखही यासाठी महत्त्वाचे ठरले आहेत. यात नाणेघाट, अक्षी आणि श्रवणबेळगोळ येथील शिलालेखांचा समावेश आहे.

पुणे जिल्ह्यातील जुन्नरजवळच्या नाणेघाटातील ब्राह्मी लिपीतील शिलालेख मराठीची ओळख सांगणारा आणि मराठीला ‘महारठ‍िनो’ असा उल्लेख त्यात आहे. तो सुमारे दोन हजार २२० वर्षांपूर्वीचा असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे, तर काहींनी शके ९३४ मधील अक्षीचा शिलालेख पहिला असल्याचे संशोधनकांनी नमूद केले आहे. दुसरीकडे शिलालेखांवर अधिकचे संशोधन होण्यापूर्वी श्रवणबेळगोळ येथील शिलालेख (शके ९०५) मराठीतील आद्य शिलालेख म्हणून मानला जातो. आजही अभ्यासक्रमांतून या शिलालेखाचा तसा उल्लेख होतो. दुसरीकडे विदर्भातील इसवी पूर्वच्या तिसऱ्या शतकादरम्यान असलेले देवटेक येथील शिलालेख, अकराव्या शतकातील मार्केंडेश्वर, भद्रावती, चंडिका माता मंदिरातील शिलालेखांमध्ये देवनागरी, मराठीचा सर्वाधिक उल्लेख असतानाही त्याकडे दुर्लक्ष झाल्याची खंत विदर्भातील संशोधकांकडून व्यक्त केली जात आहे.

नाणेघाटातील शिलालेखावरून मराठी भाषा बोलणारे लोक त्या प्रदेशात असावेत. यामुळे मराठीचे वय हे साधारण अडीच हजार वर्षे असावे, असा अंदाज अभिजात दर्जा मिळवण्यासाठी व्यक्त करण्यात आला होता. अहमदनगर जिल्ह्यातील हरिश्चचंद्र गडावरील लेण्यांमध्ये आठ शिलालेख असून, त्यात एका मंदिरात असलेल्या देवनागरीतील शिलालेखात ‘चक्रपाणी वटेश्वर नंदनू तश्यतसुतू विकटदेवो’ असा उल्लेख मिळतो. हे दहाव्या शतकातील शिलालेख असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.

अक्षीच्या नऊ ओळींच्या शिलालेखात केशिदेवाच्या महाप्रधान भुईर्जू सेणूई यांनी ९३४ मध्ये देवीच्या बोडणासाठी नऊ कबुली धान्य दिल्याचा उल्लेख असून, तो श्रवणबेळगोळच्या शिलालेखापूर्वी सुमारे १०० वर्षांचा असल्याचेही डॉ. शं. गो. तुळपुळे यांनी नमूद केले आहे. मात्र वा. वि. मिराशी यांनी तो पहिला नसल्याचे नमूद केले आहे. आनंद कुंभार यांनी सोलापूर जिल्ह्यातील कुडल येथील शके ९४० मधील शिलालेखही पहिला असल्याचे आपल्या संशोधनात नमूद केले आहे. श्रवणबेळगोळ येथील शिलालेख हा शके ९०५ मधील असल्याने तो आद्य शिलालेख ठरतो, असेही महाराष्ट्र सारस्वतकार वि. ल. भावे यांनी आपल्या ग्रंथात नमूद केले आहे.
--
श्रवणबेळगोळच्या शिलालेखाचे महत्त्व
मराठी भाषेचा आद्य शिलालेख म्हणून श्रवणबेळगोळ येथील शिलालेखाचा उल्लेख होतो. हा इ. स. ९८३ मधील आहे. यात मराठीतून ‘श्री चामुंडराये करवियले, गंगराये सुत्ताले करवियले’ असा उल्लेख मिळतो. जैन प्राकृत साहित्यासोबत जैन परंपरेतील हा शिलालेख मराठीतील आद्य शिलालेख असल्याचे जैन साहित्याचे अभ्यासक डॉ. गोमटेश्वर पाटील यांनी सांगितले.
--
विदर्भातील शिलालेखांकडे दुर्लक्ष
इ. स. पूर्व दुसऱ्या ते तिसऱ्या शतकात विदर्भातील नागभीडजवळील देवटेक येथील मौर्यकालीन ब्राह्मी लिपीतील शिलालेख महत्त्वाचा होता. यात त्या वेळच्या आमात्त्यांकडून प्राण्यांची हिंसा करू नये, असे राजा आदेश देत असल्याचे नमूद आहे, तर दुसरीकडे देवनागरी लिपीत आणि त्यानंतर वाकाटककालीन शिलालेख, विजासन लेणी, भांदक-भद्रावती, मार्कंडेश्‍वर मंदिर आदींमधील शिलालेखांची मोठी यादी आहे. त्याकडे दुर्लक्ष झालेले आहे. यामुळे आपल्या राज्यातील प्राचीन वारसा, धरोहर राज्य सरकारने आपल्या अखत्यारीत घेऊन त्याचा विकास करण्याची गरज ज्येष्ठ पुरातत्त्व संशोधक डॉ. रघुनाथ बोरकर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com