जिल्हा कृषी हवामान केंद्राचे पुनर्जीवन होण्याचे संकेत
वाणगाव, ता. १६ (बातमीदार) : पालघर जिल्ह्यात पाच वर्षांपासून भारतीय हवामान विभाग व कृषी अनुसंधान परिषदेच्या विद्यमाने कोसबाड येथील कृषी विज्ञान केंद्राकडून नियमितपणे हवामान अंदाज पुरविला जातो. या केंद्रामुळे शेतकऱ्याला पिकाचे व्यवस्थापन करून बदलत्या हवामानामुळे होणारे नुकसान कमी होण्यास मदत होत आहे. पालघर जिल्ह्यातील आठ तालुक्यांचे ६७ व्हॉट्सअप ग्रुपद्वारे जवळपास १५ हजार शेतकरी नियमितपणे हवामान अंदाज व हवामान आधारित कृषी सल्ल्याचा लाभ घेत आहेत.
१७ जानेवारी २०२४ रोजी भारतीय हवामान विभागाद्वारे डीएमयू देण्यात येणारी सेवा बंद होणार असल्याचे पत्र काढले होते, परंतु या योजनेचे पुनर्जीवन करून नवीन रचना भक्कमपणे उभारण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव रवि चंद्रन आणि भारतीय हवामान विभागाचे महासंचालक यांनी मुलाखतीत सांगितले. त्यामुळे भविष्यात जिल्हा कृषी हवामान केंद्राची सेवा सुरू ठेवून सरकार शेतकरी वर्गाचा विकास करेल, अशी अपेक्षा आहे.
भारतीय हवामान विभागाकडे ३९ डॉप्लर रडार, ८०६ स्वयंचलित हवामान केंद्रे, १३८२ स्वयंचलित पर्जन्य मापके, सात प्रारूपे आणि दोन अत्याधुनिक उपग्रहे आहेत. सध्या पाऊस, उष्णतेची लाट, थंडीची लाट, चक्रीवादळ, वीजांची स्थितीचाही अंदाजही ८०-८५ टक्के अचूक वर्तवत आहे. पृथ्वी मंत्रालयाच्या सहकार्याने हवामान विभागाने नागरिकांना जलद गतीने व अचूक हवामान अंदाज पुरवण्यासाठी विविध सुविधांचा शुभारंभ करण्यात आला.
या सुविधांचा शेतकऱ्यांना फायदा
मौसम मोबाईल ॲप :
मौसम या ॲपमध्ये मराठीसह १३ प्रादेशिक भाषेमध्ये हवामान अंदाज उपलब्ध आहेत. या ॲपद्वारे नागरिकांना मोबाईलवर पुढील पाच दिवसांचा हवामान अंदाज प्राप्त होतो. दैनंदिन पाऊस, किमान व कमाल तापमान, सापेक्ष आर्द्रता, वाऱ्याचा वेग, वाऱ्याची दिशा या हवामान घटकांची आकडेवारी पाहू शकतात.
मेघदूत ॲप :
या ॲपद्वारे शेतकऱ्यांना पुढील पाच आणि मागील दहा दिवसांतील हवामानाचा आढावा बघू शकतात. त्याबरोबर प्रत्येक जिल्ह्यातील प्रमुख पिकाविषयी उपयुक्त सल्लादेखील उपलब्ध होईल. अचूक हवामान अंदाज व वेळेत मिळालेल्या मार्गदर्शनाने शेतकऱ्यांना पिकांचे योग्य नियोजन करणे सोयीचे होईल.
दामिनी ॲप :
विजांसह होणाऱ्या पावसाचे पूर्वानुमान नागरिकांना समजावे, यासाठी भारतीय हवामानशास्त्र विभागाने दामिनी हे मोबाइल ॲप सुरू केले आहे. यामुळे शेतकरी, नागरिकांना वादळी पाऊस, विजांच्या कडकडाटाचे अर्धा ते एक तास आधी अचूक अंदाज मिळणार आहेत. वीज कोसळून होणारी जीवितहानी टाळणे, हा या ॲपचा उद्देश आहे.
मिशन मौसम :
देशातील जनतेला हवामान सज्ज आणि हवामान जागरूक बनवण्याचे उद्दिष्ट ठेवून केंद्र सरकारने दोन हजार कोटींची गुंतवणूक करून मिशन मौसम या उपक्रमाला सुरवात केली आहे. यामध्ये हवामान शास्त्रीय संशोधन, विविध हवामान घटकांची निरीक्षणे, कलर डॉप्लर रडारचे जाळे तयार करून ते महासंगणकाला जोडले जात आहे, जे अतिजलद आणि अचूक माहिती देण्यास सक्षम असेल.
पालघर जिल्हा कृषी हवामान केंद्राचे योगदान :
ग्रामीण कृषी मोसम सेवा या योजना अंतर्गत कोसबाड हिल येथील कृषी विज्ञान केंद्रामध्ये जिल्हा कृषी हवामान केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी एक स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यात आले आहे, ज्यामुळे हवामानविषयक दैनंदिन आकडेवारी मोबाइल व संगणकावर सहजपणे संकलित केली जाते. स्वयंचलित हवामान केंद्राद्वारे दर १५ मिनिटांनी पाऊस, कमाल व किमान तापमान, सापेक्ष आर्द्रता, वाऱ्याचा वेग, तसेच जमिनीचे तापमान व जमिनीतील ओलावा आदी घटकांची नोंद प्राप्त होते. भारतीय हवामान विभागाच्या सुधारित हवामान अंदाजाच्या आधारे दर मंगळवारी आणि शुक्रवारी कृषी विज्ञान केंद्रातील कृषीविषयक तज्ज्ञ, जिल्ह्यातील कृषी आणि पशुसंवर्धन विभागातील अधिकारी यांच्या मार्गदर्शनाने कृषी सल्ला शेतकऱ्यांपर्यंत पुरवला जात आहे.
हवामानाची अचूक माहिती न मिळाल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणीना सामोरे जावे लागते. बदलत्या हवामानावर आधारित शेती पद्धतीचे नियोजन करून शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी भारतीय हवामान विभागाकडून जिल्ह्यातील प्रत्येक महसूल मंडळात अथवा तालुक्याच्या ठिकाणी स्वयंचलित हवामान केंद्र उभारणे ग्रामीण भागाच्या हिताचे ठरणार आहे.
- रिझवाना सय्यद, हवामान शास्त्रज्ञ, जिल्हा कृषी हवामान केंद्र, कोसबाड हिल, डहाणू
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

