रस्त्यांच्या कामात गैरव्यवहार

रस्त्यांच्या कामात गैरव्यवहार

Published on

विक्रमगड, ता. १६ (बातमीदार) : पालघर जिल्ह्यात रस्त्यांसाठी आलेल्या निधीचा गैरवापर करण्यात आल्याचा दावा राज्यस्तरीय अनुसूचित क्षेत्र आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित यांनी केला. त्याबाबत त्यांनी पुराव्यानिशी माहिती देत जिल्हा पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्याकडे तक्रार केली. तसेच कार्यकारी अभियंत्यांना गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. त्यांच्या तक्रारीनुसार शाखा अभियंता नीलकंठ कोकाटे याच्याविरोधात विक्रमगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

विक्रमगड तालुक्यात जव्हार आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत विविध योजना राबवल्या जातात. या योजनांचा आढावा घेण्यासाठी विवेक पंडित यांनी विक्रमगड पंचायत समिती येथे बैठक बोलावली होती. या बैठकीत आदिवासी विकासकामांचा आढावा घेण्यात आला. आदिवासी उपयोजनेतून रस्त्यांच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात सरकारचा निधी येतो. यामध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचा दावा विवेक पंडित यांनी केला.

रस्ते गैरव्यवहाराची चौकशी करून त्याचा अहवाल देण्याचे निर्देश पंडित यांनी दिले होते. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे तत्कालीन उपविभागीय अभियंता विष्णू बोरसे आणि शाखा अभियंता नीलकंठ कोकाटे यांनी अहवाल सादर केला.

एका रस्त्याच्या फोटोंचा वापर
माजी आमदार विवेक पंडित यांच्या माहितीनुसार अहवालात बनावट कागदपत्रांचा वापर करण्यात आल्याचा दावा आहे. एकाच रस्त्याचे फोटो अनेक ठिकाणी वापरून जिल्ह्यातील कामे झाल्याचे दाखवण्यात आले, हे निदर्शनास आल्यानंतर आढावा बैठकीतच पंडित यांनी तत्कालीन उपअभियंता आणि शाखा अभियंत्यावर शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्याचे निर्देश कार्यकारी अभियंत्यांना दिले होते. उपविभागीय अभियंत्यांनी चौकशी करून याप्रकरणी विक्रमगड पोलिस ठाण्यात तक्रार केली. जिल्हा परिषदेचे उपअभियंता मनोज अंभोरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार कोकाटे याच्याविरोधात अनेक कामांबाबत तक्रारीच्या आधारे फसवणुकीचा आणि बनावट दस्तावेज तयार करण्यात आल्याचा गुन्हा दाखल केला.

कामे न करताच बिले हडप
हातणे-कारेल पाडा रस्ता, देहर्जे-हातणे रस्ता, उटावली-माळे रस्ता, हातणे रस्ता, कुंर्झे-हातणे रस्ता, वसुरी-मलवाडा या रस्त्यांच्या कामासंदर्भात विवेक पंडित यांनी घेतलेल्या राज्यस्तरीय आढावा बैठकीत तक्रारी करण्यात आल्या होत्या. यानुसार रस्त्यांची कामे अपूर्ण असतानाही अन्य ठिकाणचे फोटो जोडून रस्त्यांची कामे झाल्याचे दाखवण्यात आले. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात त्रुटी आढळून आल्या आहेत.

पोलिस अधीक्षकांकडे तक्रार
विवेक पंडित यांनी पालघरचे पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्याकडेही याबाबत तक्रार केली होती. त्यामुळे अखेर उपअभियंत्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. अधिकारी सरकारची फसवणूक करून गैरव्यवहार करतात; परंतु त्यांच्यावर कोणाचाच अंकुश नसतो. कणखर भूमिकेमुळे चुकीच्या प्रकारांना आळा बसेल, असा विश्वास नागरिकांमधून व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com