थकीत मालमत्ता कर धारकावर टाच

थकीत मालमत्ता कर धारकावर टाच

Published on

पनवेल, ता. १५ (बातमीदार) ः तळोजा औद्योगिक वसाहतीमधील मेसर्स वालरेक मॉड्युलर सिस्टम, प्लॉट क्रमांक जी १३/४ या कंपनीवर दोन कोटी २० लाख ४० हजार ३७५ रुपयांच्या थकबाकीसाठी जप्तीची कारवाई करण्यात आली. या वेळी इमारतीला सील ठोकण्यात आले असून सामग्री जप्त करण्यात आला. विभाग प्रभाग अधिकारी अमर पाटील वसुली अधिकारी हरिश्चंद्र कडू, संजय देशमुख, दिलीप सावळे तसेच आदर्श पाटील, लालसिंग राठोड, एकनाथ ठाकूर, तळोजा पोलिस ठाण्याचे कर्मचारी व नावडे विभागातील कर्मचारी यांच्या उपस्‍थितीत कारवाई करण्यात आली.
मालमत्ता कर न भरलेल्या थकबाकीदारांना जप्तीपूर्व नोटिसा व वॉरंट बजावण्यास पनवेल महापालिकेने सुरुवात केली आहे. आयुक्त मंगेश चितळे यांच्या सूचनेनुसार, मालमत्ता कर विभागाच्या जप्ती पथकाच्या कर्मचाऱ्यांनी आजपर्यंत तळोजा औद्योगिक वसाहतीमधील ५० उच्चतम कराची थकबाकी असणाऱ्या कंपन्यांना जप्तीपूर्व नोटिशीचे वाटप केले आहे. या कंपन्यांना सात दिवसांची मुदत देण्यात आली असून त्यांनी मालमत्ता कर न भरल्यास जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे.
महापालिका क्षेत्रातील चारही प्रभागांमधील सुमारे तीन लाख ५० हजार मालमत्तांना कर आकारणी करण्यात आली आहे. सध्याच्या आर्थिक वर्षामध्ये एप्रिलपासून आजपर्यंत ३२४ कोटींची वसुली झाली आहे. त्यानुसार मालमत्ता कर उपायुक्त स्वरूप खारगे व जप्ती पथकामधील अधिकारी-कर्मचारी यांनी सर्व मालमत्ताधारकांना लवकरात लवकर कराचा भरणा करून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. मालमत्ता कराचा भरणा न केल्यास जप्ती व अटकावणी कारवाई करण्यात येणार आहे.
थकबाकीपोटी जंगम, स्थावर मालमत्ता जप्त अथवा अटकावणी करून जाहीर लिलावाने विक्री करून थकबाकी वसूल करण्याची तरतूद महापालिकेस आहे. त्यानुसार नोटीस देऊनही मालमत्ता कराचा भरणा न केलेल्या थकबाकीदारांना उपायुक्तांच्या सूचनेनुसार, कर अधीक्षक महेश गायकवाड व सुनील भोईर यांच्या जप्ती पथकामार्फत खारघर, उपविभाग नावडे, कळंबोली, कामोठे, पनवेल व नवीन पनवेल प्रभागामधील थकबाकीदारांना जप्ती व अटकावणीची कारवाई करण्यात येत आहेत.

शास्‍त्रीमध्ये दोन टक्‍क्‍यांची वाढ
महापालिकेच्या सर्व प्रस्तावित कामांसाठी मालमत्ता कर हा प्रमुख स्रोत आहे. मालमत्ता कर न भरल्यास त्याच्या शास्तीमध्ये प्रतिमहा दोन टक्क्यांची वाढ होत असल्याने नागरिकांनी आपला मालमत्ता कर भरावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. कर ऑनलाइन भरण्यासाठी ‘PMC TAX APP’ मोबाईल ॲप विकसित केले आहे. तसेच www.panvelmc.org या वेबसाईटवर जाऊनही मालमत्ता कर नागरिकांना भरता येणार आहे. मालमत्ताधारकांना काही शंका असल्यास १८००-५३२०-३४० या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com