तळोजा, खारघरमधील पाणी समस्या दूर होणार

तळोजा, खारघरमधील पाणी समस्या दूर होणार

Published on

तळोजा, खारघरमधील पाणीसमस्या दूर होणार
सिडकोकडून नवीन जलवाहिनीच्या कामाला सुरुवात; सव्वा दीड कोटी रुपयांचा निधी
खारघर, ता. १६ (बातमीदार) : तळोजा फेज एक वसाहतमधील काही सेक्टर तसेच खारघर सेक्टर दहा परिसरातील काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्‍यामुळे मागील अनेक महिन्‍यांपासून सिडकोविरोधात जनआंदोलन करण्यात आले आहे. त्‍यामुळे अखेर सिडकोकडून सव्वा दीड कोटी रुपये खर्च करून येथील भागात नवीन जलवाहिनी टाकण्यात येणार असल्याचे कार्यकारी अभियंता बी. व्ही. गायकवाड यांनी सांगितले आहे. उन्हाळ्यात नागरिकांनी पाणीटंचाई निर्माण होण्यापूर्वी सिडकोने हे काम पूर्ण करावे, अशी मागणी रहिवाशांकडून केली जात आहे.
तळोजा फेज एक वसाहत सेक्टर दोन, चार, १०, ११ परिसरातील जवळपास ६४ सोसायट्यांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्‍यामुळे रहिवाशांनी अनेक वेळा सिडकोच्या विरोधात मोर्चे, आंदोलन केले. तळोजा कॉलनी फेडरेशनच्या वतीने मागील वर्षी जुलैमध्ये रायगड भवनमधील सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाच्या कार्यालयात धडक दिली होती. या वेळी ज्या भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे त्या भागात नवीन आणि मोठ्या व्यासाच्या जलवाहिन्या टाकण्यासाठी निविदा काढण्यात येईल आणि सर्वांना समान पाणीपुरवठा होईल, असे आश्वासन सिडकोच्या अधिकारीवर्गाकडून देण्यात आले होते. खारघर सेक्टर १० मधील सिक्विन पॅराडाइज, इलाइटिंग एन्क्लेव्ह, बोनझर कार्निव्हल, महावीर ज्योती, एक्स ब्लॉक्स, निहारिका अशा दहाहून अधिक सोसायटीत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्यामुळे रहिवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्‍यामुळे सिडकोने ही समस्या दूर करावी, यासाठी माजी नगरसेवक ॲड. नरेश ठाकूर यांनी सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाकडे अनेक वेळा पत्रव्यवहार केला आहे. त्‍यामुळे सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाने तळोजा फेज एक वसाहतीबरोबर खारघर सेक्टर दहामध्ये नवीन आणि वाढीव व्यासाच्या जलवाहिन्या टाकण्यासाठी एका एजन्सीची निवड केली आहे. या एजन्सीकडून जलवाहिनीच्या कामाला सुरुवात झाल्यामुळे नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत.
.........................
खारघर सेक्टर दहामधील काही सोसायट्यांत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्यामुळे रहिवाशांसमवेत सिडको अधिकारी तसेच आमदार प्रशांत ठाकूर यांच्या निदर्शनास आणून दिली होती. सिडकोने एप्रिल महिन्यापूर्वी नवीन जलवाहिन्यांचे काम पूर्ण करून पाणीसमस्या दूर करावी.
- ॲड. नरेश ठाकूर, माजी नगरसेवक
...............
तळोजा वसाहतीत सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाकडून नवीन जलवाहिनी जोडणीच्या कामाला सुरुवात झाली आहे. रहिवाशांना समान प्रमाणात पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी केलेल्या मोर्चा, आंदोलनाचे हे यश आहे.
- प्रसाद पाटील, अध्यक्ष- तळोजा कॉलनी फेडरेशन
.....................
तळोजा येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी तळोजा वसाहतमधील पाणीसमस्येविषयी लोकायुक्तांकडे तक्रार केली होती. या तक्रारीची डिसेंबर महिन्यात ऑनलाइन सुनावणी पार पडली होती. या वेळी सिडकोचे तत्कालीन व्यस्थापकीय संचालक आणि लोकआयुक्त विभागाचे उपायुक्त संजय भाटिया यांनी ऑनलाइन सुनावणीच्या वेळी तळोजा वसाहतमधील पाणीसमस्या दूर करण्यासाठी एमआयडीसीच्या व्यवस्थापकीय संचालकांशी संपर्क साधा, पाणीसमस्येविषयी काय उपाययोजना केल्या जाणार आहेत, याविषयी अहवाल सादर करा, असे आदेश सिडकोला दिले होते.
................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com