कृषी परिसंवादात समस्यांचा पाढा

कृषी परिसंवादात समस्यांचा पाढा

Published on

कृषी परिसंवादात समस्यांचा पाढा
खर्डी, ता. १६ (बातमीदार) : शहापूर तालुक्यातील शेतकरी नेते व प्रगतशील शेतकरी बबन हरणे यांनी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यापुढे तालुक्यातील शेतकऱ्यांना उद्भवणाऱ्या विविध समस्यांचा पाढा वाचला. कृषिमंत्री यांच्या संकल्पनेतून आयोजित केलेल्या कोकण विभागाचा प्रगतशील आणि प्रयोगशील शेतकरी परिसंवाद कार्यक्रमात हरणे यांनी विविध मुद्द्यांना हात घालत शेतकऱ्यांच्या व्यथा अलिबाग जिल्हा नियोजन भवनात मांडल्या. या वेळी राज्यातील प्रगतशील शेतकरी उपस्थित होते.

शहापूर तालुक्यातील भात उत्पादनाचा खर्च तीन हजारांच्या आसपास येत आहे; मात्र प्रत्यक्षात आदिवासी विकास महामंडळाचा क्विंटलला दर बावीसशे ते पंचवीसशे मिळतो. त्यामुळे शेतकरी तोट्यात जात आहे. किमान भाताला प्रतिक्विंटल दर महामंडळाच्या माध्यमातून चार हजार मिळावा, जेणेकरून शेतकऱ्यांना दिलासादायक ठरेल. तसेच ठाणे व पालघर जिल्ह्यात डोंगर उतारावर आदिवासी समाज मोठ्या प्रमाणावर नाचणी, वरई पीक घेतात. कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या वाणांपेक्षा स्थानिक शेतकरी निर्माण केलेल्या बियाण्यांमधून अधिक उत्पन्न घेतले जात आहे.

नाचणी, वरईच्या दृष्टिकोनातून स्थानिक प्रजातीचे बीजोत्पादन करून त्याचे ब्रॅण्डिंग केल्यास चांगले उत्पादन वाढण्यास मदत होईल आणि बाजारपेठ मिळेल. नाचणी वरईला खरेदी केंद्र नसल्याने विविध ठिकाणांहून येणाऱ्या व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूट केली जाते. हे रोखून शेतकऱ्यांना चांगले दर मिळावेत यासाठी शहापूर तालुक्यात शासकीय खरेदी केंद्र सुरू करणेदेखील गरजेचे आहे, असे मत हरणे यांनी व्यक्त केले.

शेतकरी आणि विद्यापीठ यात फार मोठे अंतर आहे. हे अंतर समन्वयात साधण्यासाठी प्रत्येक तालुका स्तरावर कृषी मेळावे आयोजित करावे, त्यामुळे संशोधक, विद्यापीठांचे प्रतिनिधी आणि शेतकरी यांना एकत्र आणता येईल. शहापूर तालुक्यात अनेक ठिकाणी शासकीय जमीन उपलब्ध असूनही आजही महामंडळ व कृषी कार्यालये भाड्याच्या खोलीत सुरू आहेत. लोकाभिमुख प्रशासन करण्यासाठी त्या ठिकाणी हक्काची कार्यालये निर्माण होणे गरजेचे आहे, अशी मागणीदेखील बबन हरणे यांनी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडे केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com