अंबरनाथच्या नाट्यगृहाचे महाराष्ट्रदिनी लोकार्पण

अंबरनाथच्या नाट्यगृहाचे महाराष्ट्रदिनी लोकार्पण

Published on

अंबरनाथच्या नाट्यगृहाचे महाराष्ट्रदिनी लोकार्पण
खासदार शिंदे यांची विविध विकासकामांची पाहणी
अंबरनाथ, ता. १६ (बातमीदार) : अंबरनाथ येथे नगरपालिकेच्या माध्यमातून बांधण्यात येत असलेल्या नाट्यगृहाचे लोकार्पण महाराष्ट्रदिनी होणार आहे. त्यामुळे परिसरातील रसिकांची बरीच वर्षे असलेली जुनी मागणी पूर्ण होऊन प्रतीक्षा संपणार आहे, असे प्रतिपादन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केले. अंबरनाथ येथे विविध विकासप्रकल्पांची उभारणी करण्यात येत आहे. याच विकासकामांची खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी शनिवारी (ता. १५) पाहणी करून आढावा घेतला. या वेळी सर्व विकासकामे जलदगतीने पूर्ण करण्याच्या सूचना खासदार डॉ. शिंदे यांनी अंबरनाथ नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना केल्या.

अंबरनाथ शहराची ओळख असलेल्या शिवमंदिराला जागतिकस्तरावर ओळख मिळवून देणारा सुमारे १४० कोटी रुपयांच्या निधीतून शिवमंदिर परिसर सुशोभीकरण प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या अंतर्गत काशी कॉरिडॉरच्या धर्तीवर प्रवेशद्वार, संपूर्ण सुशोभीकरण प्रकल्प काळ्या पाषाणात केला जाणार आहे. वाहनतळ, प्रदर्शन केंद्र, प्रवेशद्वारासमोरील चौकात नंदी, संरक्षक भिंत, चेक डॅम भक्तनिवास आणि घाट यांची उभारणी करण्यात येणार आहे. यातील घाट उभारणीचे काम जलदगतीने सुरू आहे. यामुळे भविष्यात मंदिराला भेट देणाऱ्या भाविकांना काशी, वाराणसीप्रमाणेच घाट आरतीचा अनुभव घेता येणार आहे. प्राचीन कुंडाचे काम पूर्ण होत आले आहे. भक्तनिवासाचे काम सुरू झाले आहे. लवकरच या प्रकल्पाचे काम पूर्ण होऊन या शहराचे रूप पालटणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पश्चिम येथील नेताजी मार्केट परिसरात सुमारे दहा कोटी रुपयांच्या निधीतून स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारण्यात येत आहे. या कामाचीही या वेळी पाहणी केली. उत्तम दर्जाचे काम व्हावे, यासाठी विविध सूचना केल्या. तर याचे काम हे व्हर्टिकल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स या संकल्पनेतून उभारण्यात येणार आहे. यामुळे एकाच छताखाली खेळाडूंना विविध खेळ खेळता येणार आहेत. नगरपालिकेला निधी मिळाला असल्याने कामे वेळेतच पूर्ण होणे गरजेचे असल्याचे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.

नवीन शालेय इमारत
शहरातील कैलासनगर येथील लोकल बोर्ड शाळा क्रमांक एक आणि स्वामीनगर शाळा क्रमांक ११ या दोन्ही शाळांची जीर्ण झालेली इमारत तोडून लोकल बोर्ड शाळा क्रमांक एक येथे दोन्ही शाळांची एकत्रितरीत्या इमारत बांधण्यात येत आहे. यामुळे विद्यार्थ्यांना प्रशस्त आणि विविध सुविधांनी युक्त अशी नवीन शालेय इमारत उपलब्ध होणार आहे. या कामाचीही त्यांनी पाहणी केली. पालिका प्रशासक डॉ. प्रशांत रसाळ, मुख्याधिकारी अभिषेक पराडकर, माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी, उपनगराध्यक्ष अब्दुलभाई शेख, रवींद्र पाटील, निखील वाळेकर, मिलिंद गान, तसेच पालिका अधिकारी या पाहणी दौऱ्यादरम्यान उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com