पुन्हा एकदा सीबीएसई शाळेचा घाट!

पुन्हा एकदा सीबीएसई शाळेचा घाट!

Published on

भाईंदर, ता. १६ (बातमीदार) : गेल्या दोन वर्षांपासून सीबीएसई शाळा सुरू करण्यात मिरा-भाईंदर महापालिकेला अपयश आले आहे. असे असताना यावर्षी नव्या शैक्षणिक वर्षापासून पुन्हा एकदा सीबीएसई शाळा सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा महापालिकेकडून करण्यात आली आहे. त्यासाठी १ एप्रिलला जाहिरात काढण्यात येणार आहे.

मिरा-भाईंदर शहरात सध्या अनेक खासगी शैक्षणिक संस्थांच्या सीबीएसई बोर्डाच्या शाळा सुरू झाल्या आहेत व त्यांना प्रतिसादही चांगला मिळत आहे, परंतु खासगी शाळांकडून आकारण्यात येणारे लाखोंचे शुल्क सर्वसामान्य पालकाला न परवडणारे आहे. यासाठी महापालिकेने स्वत:ची इंग्रजी माध्यमाची सीबीएसई शाळा सुरू करावी व त्यात गरीब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण द्यावे, असा प्रस्ताव दोन वर्षांपूर्वी आमदार प्रताप सरनाईक यांनी दिला होता. त्यानुसार भाईंदर पूर्व इंद्रलोक परिसरातील आरक्षण क्रमांक ११५ मधील शाळेत सीबीएसई शाळा सुरू करण्याचा निर्णय महापालिकेकडून घेण्यात आला.

सीबीएसई शाळा सुरू करण्यास राज्य सरकारच्या शिक्षण विभागाकडून हिरवा कंदीलही दाखविण्यात आला. सीबीएसई शाळा चालविणे महापालिकेला स्वत:ला शक्य होणार नसल्यामुळे प्रशासनाने खासगी शैक्षणिक संस्थांकडून स्वारस्य पत्र मागवली. नवी मुंबई महापालिकेने स्वत:ची सीबीएसई शाळा सुरू केली असून, ती खासगी शैक्षणिक संस्थेकडून चालवली जाते. त्याच धर्तीवर महापालिकेची सीबीएसई शाळा चालविण्याचे आवाहन प्रशासनाने खासगी शैक्षणिक संस्थांना केले. यासाठी तयार केलेल्या धोरणानुसार महापालिकेकडून शाळा इमारत, वीज व पाणीपुरवठा केला जाणार आहे, तर शाळा व्यवस्थापन संबंधित खासगी शैक्षिणक संस्थेने करायचे होते. त्यात सर्व शिक्षक व व्यवस्थापनाचा खर्च, शाळेसाठी आवश्यक सर्व सुविधा तयार करणे, फर्निचर, डिजिटल बोर्ड, लॅब आणि सर्व आवश्यक सुविधा आदींचा समावेश होता.

पहिल्या टप्प्यात पहिली ते चौथी इयत्तेपर्यंत शाळा सुरू करून नंतर टप्प्याटप्प्याने वर्ग महापालिकेचा विचार होता, परंतु यासंदर्भात दोनवेळा जाहिरात करूनही एकाही शैक्षणिक संस्थेने स्वारस्य पत्र देण्यात रस दाखवला नाही. एका शैक्षणिक संस्थेने स्वतःहून शाळेच्या इमारतीची पाहणी केली, मात्र त्यानंतर त्यांच्याकडून प्रतिसादच आला नाही. त्यामुळे सीबीएसई शाळा सुरू करण्याचा महापालिकेचा प्रस्ताव बारगळला.

आता पुन्हा एकदा आगामी शैक्षणिक वर्षापासून सीबीएसई शाळा सुरू करण्यासाठी प्रशासनाने तयारी सुरू केली आहे, मात्र सीबीएसई शाळेसंदर्भात महापालिकेला याआधी आलेला अनुभव लक्षात घेता नव्या वर्षात ही शाळा सुरू होईल का, याबाबत साशंकता व्यक्त होत आहे.

प्रशासनाच्या विचाराधीन प्रस्ताव
सुरुवातीला खासगी शैक्षणिक संस्थांनाच शाळा चालविण्यासाठी पाचारण केले जाणार आहे. खासगी संस्थेने शाळा चालवायची, त्यासाठी त्यांनी विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक शुल्कही आकारायचे. बदल्यात महापालिकेच्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण द्यायचे किंवा शाळा खासगी संस्थेने चालवायची व प्रत्येक विद्यार्थ्यासाठी असलेले शुल्क महापालिका संस्थेला देईल, असे दोन ते तीन पर्याय खासगी संस्थांना दिले जाणार आहेत. त्यानंतरही संस्थांकडून प्रतिसाद मिळाला नाही, तर महापालिका स्वत:च शाळा चालवेल व त्यासाठी लागणाऱ्या शिक्षकांची नियुक्ती करेल, असाही प्रस्ताव प्रशासनाच्या विचाराधीन आहे.

आगामी शैक्षणिक वर्षापासून सीबीएसई शाळा सुरू केली जाईल. पहिल्या टप्प्यात पूर्व प्राथमिक वर्ग सुरू केले जातील. त्यासाठी १ एप्रिलला जाहिरात प्रसिद्ध केली जाईल. प्रत्येक वर्गात २० विद्यार्थी असतील व विद्यार्थ्यांची निवड आलेल्या अर्जातून लॉटरी पद्धतीने केली जाईल.
- संजय काटकर, आयुक्त, मिरा-भाईंदर महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com