उन्हाळ्यात वीज तापणार!
विजेची मागणी गाठणार उच्चांक
३१ हजार मेगावॉटचा टप्पा ओलांडण्याचा अंदाज
बापू सुळे ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : सध्या तापमानाचा वाढू लागलेला पारा आणि जाणवणाऱ्या उन्हाच्या चटक्यांमुळे मुंबईसह राज्यभरातील विजेच्या मागणीचा आलेख चढू लागला आहे. याआधीच्या उन्हाळ्यातील विजेच्या मागणीचा विचार करता, उकाड्यामुळे एसी, पंखे, कुलरबरोबरच शेतकऱ्यांकडून पंपाचा वापर वाढणे अपेक्षित असल्याने मार्च, एप्रिल आणि मे या तीन महिन्यांत ती तब्बल ३१ हजार मेगावाॅटचा टप्पा ओलांडेल, असा अंदाज वीज कंपन्यांसह वीजतज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.
राज्यभरातून मागील वर्षीच्या उन्हाळ्यात मे महिन्यात सुमारे २४ हजार ८०० मेगावाॅट, तर मुंबईतील वीज कंपन्यांकडे २१ मे रोजी चार हजार ३०६ मेगावाॅट विजेची मागणी नोंदली होती. आता जानेवारीत महावितरणकडे २५ हजार ८०८ मेगावाॅट विजेची मागणी होती. त्यामुळे आगामी मार्च, एप्रिल आणि मे या तीन महिन्यांत उन्हामुळे राज्यभरात २७ हजार मेगावाॅट, मुंबईत चार हजार ५०० मेगावाॅट, तर मुंबईसह राज्यभरात विजेची एकूण मागणी ३१,००० मेगावाॅटचा टप्पा ओलांडणार असल्याचा अंदाज वीजतज्ज्ञांनी व्यक्त केला. विजेची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी महावितरणनेही तयारी केली असून, वेगवेगळ्या वीजनिर्मिती कंपन्यांसोबत ३६,५०० हजार मेगावाॅटचे वीज खरेदी करार केले असून, त्यातून पुरेशी वीज उपलब्ध होऊ शकणार आहे.
...
शहरांच्या विजेच्या मागणीत वाढ
बदललेली लाइफस्टाइल आणि गगनचुंबी इमारतींमुळे एसी, पंखे, कुलरसह इतर विद्युत उपकरणांचा वापर वाढल्याने मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, पुणे, संभाजीनगर, नाशिक, नागपूर अशा शहरांच्या विजेच्या मागणीत वाढ होत आहे. तसेच राज्यात दिवसेंदिवस उसाचे क्षेत्र वाढत असल्याने उन्हाळ्यातही कृषिपंपांचा वापर होत असल्याने त्याचा विजेच्या मागणीवर परिणाम होत आहे.
------
मुंबईतील विजेची मागणी
२१ मे २०२४ - ४,३०६ मेगावाॅट
९ जून २०२३ - ४,१२९ मेगावाॅट
...
महावितरणकडे नोंदलेली मागणी
११ जानेवारी २०२५ - २५,८०८ मेगावाॅट
२६ एप्रिल २०२४ - २५,१०० मेगावाॅट
...
मुंबईसह राज्यभरात एसी, पंखे, कुलरचा वापर मोठ्या प्रमाणात वाढत चालल्याने राज्याची विजेची मागणी सातत्याने वाढताना दिसत आहे. यंदाही त्यात विक्रमी वाढ होऊ शकते. त्यामुळे सर्वच वीज कंपन्यांनी पुरेशा विजेचे नियोजन करणे गरजेचे आहे.
- डाॅ. अशोक पेंडसे, वीजतज्ज्ञ
...
राज्याच्या मागील वर्षीच्या विजेच्या मागणीचा विचार करता, यंदा उन्हाळ्यात महावितरणकडे विजेची उच्चांकी मागणी नोंदली जाऊ शकते. त्या पार्श्वभूमीवर वाढीव मागणी पूर्ण करण्यासाठी महावितरणकडून पुरेशा विजेचे नियोजन करण्यात आले आहे. ऐनवेळी पाॅवर एक्स्चेंजमधून वीज उपलब्ध होईल.
- भारत पवार, मुख्य जनसंपर्क अधिकारी, महावितरण
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

