गायनासह तबला, बासुरीची जुगलबंदी रंगली

गायनासह तबला, बासुरीची जुगलबंदी रंगली

Published on

संगीतभूषण पं. राम मराठे संगीत महोत्सव
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १६ : ठाणे महापालिका आयोजित संगीतभूषण पं. राम मराठे स्मृती संगीत समारोह शनिवारी (ता. १५) विविधतेने सजलेल्या सादरीकरणाने रंगला. पहिल्या दिवशीच्या कलाकारांच्या सादरीकरणाला पुढे नेणारी ही सांगीतिक मैफल दर्दी रसिकांना मंत्रमुग्ध करणारी ठरली. गायनासह तबला आणि बासरीची रंगलेल्या जुगलबंदीचा आस्वाद या वेळी रसिकांनी लुटला.

डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात तीनदिवसीय संगीतभूषण पं. राम मराठे महोत्सव सुरू आहे. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशीचे पहिले पुष्प जयपूर अत्रोली घराण्याच्या गायिका व श्रेष्ठ गायक डॉ. अरुण द्रविड यांच्या शिष्या जुई धायगुडे-पांडे यांनी आपल्या सुश्राव्य गायनाने गुंफले. त्यांनी घरंदाज शैलीत राग ‘भीमपलास’ सादर केला. त्यांना सुप्रिया मोडक जोशी (हार्मोनियम), स्वप्नील भिसे (तबला), निधी पुराणिक (तानपुरा), अर्चना पाटील (स्वर मंडल) यांनी साथसंगत केली. तर बासरीच्या जुगलबंदीने दुसरे पुष्प बासरीवादक सतेज करंदीकर व युवराज सोनार यांनी गुंफले. बासरीची जुगलबंदी, तबल्यावर थिरकणारी बोटे, तानपुऱ्याची साथ आणि रसिकांकडून येणाऱ्या टाळ्या अशा वातावरणात रंगलेली ही अनोखी जुगलबंदी वेगळाच आनंद देऊन गेली. या वेळी बासरीवादक सतेज करंदीकर व युवराज सोनार यांनी राग मधुवंती, मत्तताल व एक तालातील चीज सादर केली. त्यांना तबल्यावर पं. कालिनाथ मिश्रा यांनी तर तानपुऱ्यावर पं. विवेक सोनार यांच्या शिष्या दीपश्री आपटे यांनी साथसंगत केली.

महोत्सवाचे तिसरे पुष्प किराणा घराण्याचे गायक पं. कैवल्यकुमार गुरव यांनी आपल्या गायनाने गुंफले. या वेळी त्यांनी पं. राम मराठे यांच्या आठवणींना उजाळा दिला. पं. कैवल्यकुमार गुरव यांनी राग गावतीने आपल्या गायनाला सुरुवात केली. ‘गुंतलागो मालनिया’ ही स्वरचित बंदिश सादर करून त्यांनी रसिकांची वाहवा मिळवली. आलाप तानांमधील अप्रतिम लयकारी, गायनातून प्रकट होणारे आर्तभाव, भजनाचा ताल अशा वातावरणात पं. कैवल्यकुमार यांनी आपल्या गायकीची मोहिनी रसिकांवर घातली. त्यांना रोहित देव (तबला), ज्ञानेश्वर सोनावणे (हार्मोनियम), वज्रकाय उदयराज कदम, क्षितिजा वेदपाठक (तानपुरा), आदित्य जोशी (स्वरमंडल) यांनी साथसंगत केली.

जयपूर घराण्याचा जोडराग
विदुषी सानिया पाटणकर यांनी आपल्या गायनाने चौथे पुष्प गुंफले. त्यांनी सुरुवातीला जयपूर घराण्याचा जोडराग बसंतीकेदार सादर केला. विलंबित बंदिश अतर सुगंध, त्याला जोडून पंडिता मोगुबाई कुर्डीकर यांची ‘खेलन आई नवेली नार’ ही बंदिश त्यांनी सादर केली. मैफलची सांगता त्यांनी अतिद्रुत लयीतील सरगम गीताने केली. त्यांना मंदार पुराणिक (तबला), नीलय साळवी (हार्मोनियम), आदिती नगरकर (तानपुरा) यांनी साथसंगत केली. पाचवे पुष्प तालाच्या लयकारीसाठी प्रसिद्ध असलेले तबलावादक पं. विभव नागेशकर यांनी गुंफले. तीन तालांनी त्यांनी तबला वादनाला सुरुवात केली. त्यांना आकाश जलमी (हार्मोनियम), निनाद नांदलस्कर (तबला), राकेश कुळकर्णी (ताल) यांनी साथसंगत केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com