नवी मुंबई महापालिकेची ई-ऑफिसकडे वाटचाल
नवी मुंबई महापालिकेची ई-ऑफिसकडे वाटचाल
अर्थसंकल्पात आयुक्तांकडून खास तरतूद; प्रशासकीय कामात येणार सुसूत्रता
वाशी, ता. १६ (बातमीदार) ः नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्याकडून आठवड्यामध्ये पालिकेचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. पालिका आयुक्तांनी पालिकेची सूत्रे हाती घेतल्यापासून ई-ऑफिसकडे विशेष लक्ष दिले आहे. अनेक वर्षांपासून पाणी देयक हे ऑफलाइन पद्धतीने भरली जात होती. ती ऑनलाइन पद्धतीने सुरू करून नवी मुंबईकरांना दिलासा देण्यात आला आहे. पालिका आयुक्तांनी आता पेपरलेस कामकाजाकडे वाटचाल सुरू केली असून, यासाठी मुख्यालयासह सर्व विभाग कार्यालयांत ई-ऑफिस प्रणाली कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला आहे. येणाऱ्या अर्थसंकल्पातदेखील ई-ऑफिसकडे विशेष लक्ष आयुक्त देणार आहेत. त्यामुळे नागरिकांना यापुढे विविध सुविधा ऑनलाइन पद्धतीने मिळणार आहेत.
राज्य सरकारने ई-ऑफिस प्रणाली सर्व सरकारी, निमसरकारी कार्यालयांत सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. काही कार्यालयांत आजही कोऱ्या पेपरचा वापर केला जातो. अनेकदा फायली गहाळ होणे, तर कधी फायलीमधील दस्तऐवज गहाळ होण्याच्या घटना घडतात. आग लागल्याने महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाल्याच्याही घटना घडल्या आहेत. अशावेळी ई-ऑफिस प्रणाली उत्तम असून, त्यामध्ये केलेल्या कामकाजाचा डाटा, महत्त्वाच्या नोंदी, दस्तऐवज अबाधित राहतात. यामुळे वेळही वाचतो आणि खर्चही कमी होतो. ई-ऑफिस प्रणालीमुळे शहर अभियंता, नगररचना, आरोग्य, घनकचरा, मालमत्ता विभागासह सर्व विभाग अधिकाऱ्यांना आणि एचओडींना याचा फायदा होणार आहे. सर्व सुविधा ऑनलाइन पद्धतीने झाल्यास नागरिकांचीदेखील गैरसोय दूर होणार आहे. त्यामुळे येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये ई-ऑफिस प्रणालीकडे विशेष लक्ष देण्यात येणार असल्याचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.
..............
कामकाज होणार गतिमान
ई-ऑफिस प्रणालीमुळे संगणकांचा अधिकाधिक वापर करून प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान व कागदविरहित होण्यास हातभार लागत आहे. शिवाय ई-प्रणालीमुळे विविध नागरी सुविधा विनाविलंब लाभार्थ्यांना मिळत आहेत. तसेच ई-ऑफिस प्रणालीमुळे कुठल्याही कार्यालयाची फाइल ही अधिकाऱ्यांना बसल्या जागी हाताळता येऊ शकणार आहे. यामुळे कामामध्ये पादर्शकता व जलदगती येणार असून, कार्यालयीन कामकाजात सुसूत्रता येण्यास मदत होणार आहे. तसेच दस्तऐवज सुरक्षित राहतील, असे पालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांना विश्वास आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

