अपारंपरिक ऊर्जाक्षेत्रात नवउद्योजकांना संधी
विरार, ता. १६ (बातमीदार) : सौरऊर्जेसारख्या अपारंपरिक ऊर्जाक्षेत्रात नवउद्योजकांसाठी मोठी संधी आणि बाजारपेठ उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांनी नवीन स्टार्टअपच्या दृष्टीने या क्षेत्राकडे अवश्य पाहावे, असे आवाहन सौरऊर्जा क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या ‘क्विन्सो’ या कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रत्नेश शिंगरूपे यांनी केले. विद्यावर्धिनी शिक्षण संस्थेच्या अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी घेतलेल्या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना बोलत होते.
वर्तक महाविद्यालयाचा भौतिकशास्त्र विभाग आणि अंतर्गत दर्जा हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नवीकरणीय ऊर्जा तंत्रज्ञान आणि करिअर संधी’ या विषयावर महाविद्यालयाच्या सी. आर. राजाणी सभागृहात एकदिवसीय चर्चासत्र घेतले होते. चर्चासत्रासाठी प्रमुख वक्ते आणि मार्गदर्शक म्हणून रत्नेश शिंगरुपे उपस्थित होते. शिंगरुपे यांनी सौरऊर्जेची वाढती गरज, सौर पॅनेल्सची कार्यप्रणाली, त्यांची कार्यक्षमता यांसह खर्चाच्या दृष्टीने किफायतशीरता याबाबत सविस्तर चर्चा केली. सौरऊर्जा क्षेत्रातील उद्योगांसाठी शासकीय योजना, अनुदान मिळवण्याच्या संधी आणि महिला उद्योजकांसाठी विशेष प्रोत्साहन योजनांविषयीही माहिती दिली.
पारंपरिक अभ्यासक्रम शिकत असताना अधिकाधिक नव्या क्षेत्रांचा शोध घ्यावा आणि अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांसारख्या क्षेत्रामधील संधी शोधाव्यात, असे आवाहन प्राचार्य डॉ. अरविंद उबाळे विद्यार्थ्यांना केले. चर्चासत्रामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवीन स्टार्टअप संधी आणि सरकारी अनुदान योजनांबाबत जागरूकता निर्माण झाली, असे भौतिकशास्त्र विभागाच्या प्रमुख प्रा. बीना पाटील यांनी सांगितले. चर्चासत्राला उपप्राचार्य डॉ. अनिलकुमार शेळके, डॉ. दीपा कत्रे, प्रा. पी. एम. पगारे, महाविद्यालयातील विभागप्रमुखांसह १५ प्राध्यापक आणि एकूण १३० विद्यार्थी उपस्थित होते.
३०० गीगावॅट वीज निर्मितीचे उद्दिष्ट
२०३०पर्यंत नवीकरणीय ऊर्जेच्या माध्यमातून ३०० गीगावॅट वीज निर्मितीचे उद्दिष्ट ठेवले असून, सध्या आपण १७५ गीगावॅट वीजनिर्मितीचे उद्दिष्टाची पूर्तता केली आहे. या क्षेत्रासाठी शासकीय पातळीवर विविध अनुदाने तसेच वेगवेगळ्या माध्यमातून प्रोत्साहन मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. या क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या नवोद्योजकांना बाजारपेठेत मोठी आर्थिक संधी उपलब्ध आहे. १२ लाखांहून अधिक नोकऱ्याही उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

