पीओपी मूर्ती विक्रेते अडचणीत
पंढरीनाथ कुंभार : सकाळ वृत्तसेवा
भिवंडी, ता. १६ : भिवंडी शहर आणि परिसरात सुमारे २५ हजारांपेक्षा जास्त गणेशमूर्तींची विक्री होत आहे. त्यामध्ये जास्तीत जास्त प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनवलेल्या मूर्तींची विक्री केली जाते. उच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याच्या हेतूने या वर्षी महापालिका क्षेत्रात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती विक्रीवर निर्बंध आणण्यात आले आहेत. पीओपी मूर्ती विकू नये, अशी कडक भूमिका पालिकेने घेतल्याने मूर्ती विक्रेते अडचणीत आले आहे.
भिवंडी महापालिका क्षेत्रात व्यवसाय आणि रोजगाराच्या निमित्ताने परराज्यातील नागरिक स्थायिक झालेले आहेत. महाराष्ट्रातील गणेशोत्सवाचे आकर्षण आणि भक्तीच्या निमित्ताने मराठी नागरिकांसह इतर हिंदू कुटुंबेही या उत्सवात सहभागी होत असतात. यासाठी शहरात मोठ्या संख्येने गणेशमूर्तींची विक्री होत असते. भिवंडी शहरात मोजक्याच मूर्ती बनवण्याच्या कार्यशाळा आहेत. इतर व्यावसायिक मूर्ती विक्रेते आयत्या वेळेस प्लास्टरच्या मूर्ती विक्रीस आणून आपला व्यवसाय करत आहेत. त्यामुळे अनेक वेळा शाडूपासून मूर्ती बनवणाऱ्या मूर्तिकारांना फटका बसत आहे. असे मूर्तिकार उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करत आहेत; परंतु शहरात मोठ्या संख्येने कामगार वर्ग राहत असल्याने त्यांचा नेहमी प्लास्टरच्या मूर्ती खरेदी करण्याकडे कल राहिला आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने पीओपीच्या मूर्तींची विक्री होते.
शहरात आणि परिसरात सुमारे ४० हजार मूर्तींची विक्री होते. त्यापैकी १५ हजार शाडूच्या मातीच्या मूर्ती विकल्या जातात. महापालिकेने न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे ठरवल्यास ४० हजार शाडूच्या मूर्ती बनवणाऱ्या मूर्तिकारांना लागणारे सहकार्य पालिका प्रशासनाला करावे लागणार आहे. तसेच शाडूच्या मूर्ती बनवण्यासाठी मूर्तिकारांनी पुढाकार घेतल्यास पालिका प्रशासनाची जबाबदारी वाढणार आहे. प्लास्टरच्या मूर्तीच्या विक्रेत्यांवर कारवाई करणे क्रमप्राप्त होणार आहे. या सर्व घटनांमुळे २० वर्षांपासून प्लास्टरच्या मूर्ती विकणाऱ्या व्यावसायिकांवर मोठा परिणाम होणार असून, ते सध्या अडचणीत आले आहेत.
भिवंडी महापालिकेत नुकतीच प्लास्टरच्या मूर्ती विक्रीबाबत अतिरिक्त आयुक्त विठ्ठल ढाके यांच्या अध्यक्षतेखाली मूर्तिकारांची बैठक घेण्यात आली आहे. त्यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणीची माहिती देत प्लास्टरच्या मूर्ती न बनवण्यासाठी मूर्तिकारांना आवाहन केले आहे. या वेळी मूर्तिकारांच्या अडचणी समजून घेत त्यांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
- सुदाम जाधव, नियंत्रण अधिकारी
प्रदूषण विभाग, भिवंडी महापालिका
----------------------------
मातीच्या मूर्ती बनवण्यासाठी प्रशासनाने निर्णय घेतल्यास मूर्तिकारांना रोजगार निर्माण होईल. त्यासाठी सरकारने आणि स्थानिक स्वराज्य संस्थेने मूर्तिकारांना अपेक्षित सहकार्य केले पाहिजे. अन्यथा, मूर्ती बनवण्याच्या खर्चात वाढ झाल्यास मूर्तिकार प्लास्टरच्या मूर्ती बनवण्यासाठी पुढाकार घेतील.
- दिलीप चौघुले, मूर्तिकार
टिळक चौक, भिवंडी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

