नवी मुंबईतील दशावतारी नाट्य महोत्सव

नवी मुंबईतील दशावतारी नाट्य महोत्सव

Published on

दशावतारी नाट्य महोत्सवाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
वाशी, ता. १८ (बातमीदार) : कोकणच्या तांबड्या मातीचा गंध असलेल्या दशावतारी नाट्य महोत्सवाचे आयोजन सांस्कृतिक कार्यमंत्री अ‍ॅड. आशीष शेलार यांच्या संकल्पनेतून जुईनगर सेक्टर २४ येथील बंट्स सभागृहात करण्यात आले होते. १३ ते १८ फेब्रुवारी या कालावधीत संपन्न झालेल्या या दशावतारी नाट्य महोत्सवात कोकणातील नामांकित दशावतारी नाट्य मंडळांचे सादरीकरण अनुभवण्यासाठी रसिकांनी पहिल्या दिवसापासूनच मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या मार्गदर्शनानुसार हा दशावतार नाट्य महोत्सव रसिकांची उत्साही दाद मिळवत साजरा होत, प्रत्येक दिवशी रसिकांची गर्दी वाढत होता.

दशावतारी नाट्य मंडळांचे सादरीकरण
दशावतार ही महाराष्ट्राच्या कोकण प्रदेशातील एक पारंपरिक लोकनाट्य शैली आहे, ज्यामध्ये भगवान विष्णूच्या १० अवतारांची कथा नाट्यमयरितीने सादर केली जाते. यामध्ये सादर होणारा कलाविष्कार हा कलावंतांमार्फत उस्फूर्तपणे केला जात असल्याने दशावतार नाटकांची वेगळीच मोहिनी रसिकांवर आहे. गुरुवारी (ता. १३) सुधीर कलिंगण प्रस्तुत कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ, नेरूर यांच्या नाट्यप्रयोगाने महोत्सवाची दिमाखात सुरुवात झाली. शुक्रवारी (ता. १४) देवेंद्र नाईक चेंदवणकर पारंपरिक लोकनाट्य दशावतार नाट्य मंडळ, चेंदवण यांच्या नाट्यप्रयोगाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रविवारी (ता. १६) सुट्टीच्या दिवशी जय हनुमान पारंपरिक दशावतार नाट्य मंडळ, आरोस यांचा नाट्यप्रयोग मोठ्या उपस्थितीत रंगला. सोमवारी (ता. १७) आरोलकर पारंपरिक लोकनाट्य दशावतार नाट्य मंडळ, आरवली व ओंकार दशावतार नाट्य मंडळ, वेंगुर्ला यांचा दशावतार नाट्यप्रयोग सादर केला, तर मंगळवारी (ता. १८) श्री देव बुटेश्वर दशावतार नाट्य मंडळ, मानखुर्द व तेंडोलकर पारंपरिक दशावतार नाट्य मंडळ, झाराप यांच्या नाट्य प्रयोगाने या दशावतारी नाट्य महोत्सवाची सांगता झाली.
दशावतार नाट्य महोत्सव पाहण्यासाठी रसिक प्रेक्षकांना विनामूल्य प्रवेश होता. या दशावतारी नाट्य महोत्सवात सहभागी कलाकारांचा अप्रतिम नाट्याविष्कार अनुभवण्यासाठी नाट्य-नृत्याचा मिलाफ असणाऱ्या कलापथकांच्या कार्यक्रमाचा असंख्य कलारसिकांनी आस्वाद घेतला, अशी माहिती सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com