उन्हाच्या तडाख्याने नागरिक त्रस्‍त

उन्हाच्या तडाख्याने नागरिक त्रस्‍त

Published on

उन्हाच्या तडाख्याने नागरिक त्रस्‍त
तापमानात वाढ झाल्याने रस्ते ओस; शीतपेयांसह फळे खरेदीला जोर
पेण, ता. १८ (वार्ताहर) : रायगड जिल्ह्यासह पेण तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल होऊन उन्हाचा तडाखा जाणवू लागला आहे. शहरातील मुख्य रस्ते भरदुपारी ओस पडू लागले असून, वाढलेल्या तापमानामुळे शीतपेये आणि रसाळ फळांना मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे.
मागील काही वर्षांपासून वातावरणात बदल झाल्याने अवेळी थंडी तर कधी उकाडा जाणवू लागला आहे. पूर्वी दरवर्षी मार्च, एप्रिल, मे महिन्यात उन्हाचा तडाखा बसत असे. आता मात्र फेब्रुवारीच्या सुरुवातीपासूनच कडक उन्हाच्या झळा नागरिकांना जाणवू लागल्या आहेत. त्यामुळे सकाळी पडणारी थंडी, दुपारी लागणारी उन्हाची हीट आणि पुन्हा रात्री लागणारा गारवा असे दिवसभर सततच्या वातावरणातील बदलाचे चक्र फिरू लागल्याने ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांमध्ये आजारी पडण्याचे प्रमाण वाढत आहे. शिवाय उन्‍हाच्‍या तडख्यामुळे आतापासून कामानिमित्त किंवा जीवनावश्यक गोष्टींसाठी बाहेर पडणाऱ्यांची संख्या कमी होऊ लागली आहे. शिवाय या रखरखत्या उन्हामध्ये टोपी, गॉगल, मास्क वापरण्याचे प्रमाण वाढले आहे. महिलावर्ग तोंडाला स्कार्प किंवा ओढणीने चेहरा झाकत फिरताना दिसून येत आहे. प्रखर उन्हामुळे अनेक जण उसाचा रस, ज्यूस, नारळ पाणी, ताक, लस्सी, लिंबू सरबत, कोकम सरबत अशा प्रकारच्या शीतपेयांसह कलिंगड, काकडी, द्राक्षे, मोसंबी, संत्री, ड्रॅगन फ्रूट यासारखी रसाळ फळे खाण्याला अधिक पसंती देत आहेत. त्‍यामुळे शहरातील तसेच मुख्य चौकातील शीतपेयांच्‍या दुकानात मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे.
..................
या वर्षाच्या सुरुवातीलाच वातावरणातील बदल जाणवू लागला असून, येथील वृक्षतोड आणि डोंगरांचा ऱ्हास हेच तापमानवाढीचे मुख्य कारण आहे. एकीकडे मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामामुळे दोन्‍ही रस्त्यांच्या दुतर्फा असणारी अनेक दशकांपूर्वीची पिंपळ, वड, आंबा, जांभूळ यासारखी मोठमोठी झाडे तोडली गेली आहेत. त्‍यामुळे महामार्गावर सावलीच शिल्लक राहिलेली नाही. त्यामुळे आता कडक उन्‍हाचा मारा नागरिकांना सहन करावा लागत आहे.
- हरीश बेकावडे, सामाजिक कार्यकर्ते, पेण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com