दरनिश्चितीअभावी रखडला सीटी सर्व्हे

दरनिश्चितीअभावी रखडला सीटी सर्व्हे

Published on

भाईंदर, ता. १८ (बातमीदार) : उत्तनसह पाच गावांमधील नगर भूमापन (सीटी सर्व्‍हे) गेल्या अनेक वर्षांपासून रखडले आहे. आधी गावकऱ्यांनी विरोध केल्यामुळे आणि आता सर्वेक्षण करण्यासाठी वाढीव दर निश्चित न झाल्यामुळे हे काम सुरू होऊ शकलेले नाही. जमिनींच्या मालकी हक्काची कागदपत्रे मिळावीत, यासाठी तातडीने सीटी सर्वेक्षण सुरू करावे, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

गावठाणांच्या जमिनींचा सीटी सर्व्‍हे झाल्यानंतर जमीनमालकांना जमिनीच्या मालकी हक्काची सनद दिली जाते. मिरा-भाईंदरमधील अनेक गावांचा सीटी सर्व्‍हे न झाल्याने स्थानिकांना मोठ्या समस्या उभ्या राहिल्या. घर व त्याखालील जमिनींची मालकी हक्काची सनद नसल्याने घरदुरुस्ती, नवीन घरबांधणी करणे ग्रामस्थांना अशक्य झाले. यासाठी ज्या गावात नगर भूमापन झाले नाही, अशा गावांचे सर्व्‍हे करण्याचा निर्णय महापालिकेने २००४ मध्ये घेतला. त्यासाठी कंत्राटदाराची नियुक्तीदेखील केली. त्यानुसार बहुतांश गावांमध्ये सर्वेक्षण पूर्ण झाले, परंतु उत्तन व आसपासच्या गावांमधून हे सर्वेक्षण होऊ शकले नाही. त्या वेळी उत्तन व आसपासची गावे राज्य सरकारने एसईझेड (विशेष आर्थिक क्षेत्र) घोषित केले होते. त्यामुळे आर्थिक क्षेत्रासाठीच हे सर्वेक्षण केले जात असून, नंतर आपल्या जमिनी सरकार काढून घेईल, अशी भीती ग्रामस्थांमध्ये गैरसमजूतीमधून निर्माण झाली. परिणामी त्यांनी सीटी सर्व्हेच्या कामाला विरोध केला. त्यामुळे पाच गावांमधील सर्वेक्षणाचे काम बंद पडले.

कालांतराने ग्रामस्थांचा गैरसमज दूर झाला. तसेच विशेष आर्थिक क्षेत्रही रद्द झाले. त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधींनी उत्तन व पाच गावांचा सीटी सर्व्हे व्हावा, यासाठी मिरा-भाईंदर महापालिकेकडे आग्रह धरण्यास सुरुवात केली. त्यामुळे महापलिकेने सीटी सर्व्हे करण्याची तयारी सुरू करून आधी काम केलेल्या कंत्राटदारालाच ते काम करण्याच्या सूचना केल्या, परंतु कंत्राटदाराने आधी केलेल्या कामाला तब्बल १५ वर्षांचा कालावधी लोटला होता. त्यामुळे २००४ साली मंजूर झालेल्या दरात काम करण्यास कंत्राटदाराने नकार देऊन दर वाढवण्याची मागणी केली. कंत्राटदाराला दर वाढवून देण्याचा प्रस्ताव महापालिकेने मान्यतेसाठी महसूल विभागाच्या भूमी अभिलेख कार्यालयाकडे पाठवला आहे. त्याला अद्याप मान्यता मिळालेली नाही. त्यामुळे उत्तनसह पाच गावांचे सर्वेक्षण रखडले आहे.

लोकदरबारात साकडे
आता सीटी सर्वेक्षण करण्याच्या पद्धतीत नवे तंत्र आले आहे. हे सर्वेक्षण ड्रोनद्वारे केले जाणार आहे. त्यामुळे त्यानुसार दर निश्चिती केली जाणार आहे. परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी नुकताच उत्तनमध्ये लोकदरबार भरवला होता. त्यात स्थानिकांनी सीटी सर्वेक्षणाचे काम रखडले असून, ते लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी केली. त्यावर भूमी अभिलेख विभागाच्या अधिकाऱ्यांनी दर निश्चितीचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे. त्याला लवकरच मान्यता दिली जाईल.

ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर
सध्या बदलापूर येथे प्रायोगिक तत्त्वावर ड्रोनद्वारे सीटी सर्व्हेचे काम सुरू आहे. ते यशस्वी ठरल्यास उत्तनमध्येही त्याच पद्धतीने सर्वेक्षणाचे काम सुरू केले जाईल, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. त्यावर उत्तनसह पाच गावांत आगामी मेपर्यंत सीटी सर्वेक्षणाच्या कामाला सुरुवात होईल, असे आश्वासन प्रताप सरनाईक यांनी ग्रामस्थांना दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com