

पहिल्यांदा १०० कोटींची वसुली
९६०३ नळजोडण्या खंडित : २०२४ मोटर पंप जप्त, ५४७ पंप रूम सील, ९९२३ थकबाकीदारांना नोटीस
ठाणे, ता. १८ : महापालिकेने पाणी बिल थकबाकी वसुलीसाठी सुरू केलेल्या धडक मोहिमेमुळे वुसलीचा १०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा १८ कोटींची जास्त वसुली झाली आहे. त्याचबरोबर आतापर्यंत संपूर्ण महापालिका क्षेत्रात ९,६०३ नळजोडण्या खंडित केल्या आहेत, तर ४११ मोटर पंप जप्त केले आहेत. तसेच ५४७ पंप रूम सील केल्या आहेत. ९,९२३ थकबाकीदारांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत.
महापालिकेची पाणी बिल रक्कम सुमारे २२५ कोटी रुपयांच्या घरात आहे. त्यापैकी ७६ कोटी रुपये ही थकबाकी आहे. चालू वर्षाच्या बिलाची रक्कम ही १४८ कोटी रुपये आहे. एकूण बिलाच्या रकमेपैकी आतापर्यंत १०६ कोटी रुपयांची वसुली केल्याची माहिती उपनगर अभियंता विनोद पवार यांनी दिली आहे. पाणी बिलाची थकबाकी न भरल्यास नळजोडणी खंडित करून पाणीपुरवठा बंद करण्याची कारवाई सुरू केली आहे. महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी याबाबत स्पष्ट निर्देश दिले आहेत. तसेच अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी या वसुलीबाबत सातत्याने आढावा घेत असल्याचेही पवार यांनी सांगितले.
पाणीपुरवठा खंडित होणार
पाणीबिलाच्या साप्ताहिक वसुलीचे लक्ष्य निर्धारित करून पाणी बिल वसुली अभियान सुरू केले आहे. त्यानुसार पाणी बिलाच्या थकबाकीसह वसुलीसाठी महापालिकेच्या सर्व प्रभागांत नळजोडणी खंडित करणे, मोटर पंप जप्त करणे, मीटर रूम सील करण्यात येत आहेत. तसेच पाणी बिलाचा भरणा न करता खंडित नळजोडणी परस्पर पुन्हा कार्यान्वित करून घेतल्यास फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.
६६ टक्के वसुलीचे उद्दिष्ट
कठोर कारवाईचा बडगा उगारूनही महापालिकेच्या पाणीपट्टी वसुलीची घागर रिकामीच असल्याचे उघड झाले आहे. २०२४-२०२५च्या आर्थिक वर्षासाठी पाणी विभागाला वसुलीचे २२५ कोटी ४८ लाख २० हजार रुपयांचे उद्दिष्ट दिले होते. जानेवारीपर्यंत पालिकेच्या तिजोरीत केवळ ७७ कोटी १३ लाख १६ हजारांची गंगाजळी जमा झाली. म्हणजे ३५ टक्केही वसुली झालेली नाही. पुढील दोन महिन्यांत उर्वरित ६६ टक्के वसुलीचे उद्दिष्ट साध्य करायचे आहे.
कोट्यवधींचा खर्च
ठाणे महापालिकेची लोकसंख्या २७ लाखांच्या घरात पोहोचली आहे. एकीकडे वाढते नागरीकरण तर दुसरीकडे त्यासाठी लागणारे वाढीव पाणी या समस्येशी ठाणे महापालिका सध्या झुंजत आहे. वास्तविक ठाणे शहरासाठी प्रतिदिन ६१६ दशलक्ष लिटर इतका पाण्याचा कोटा मंजूर आहे; मात्र प्रत्यक्षात ५८५ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होत आहे. त्यापैकी पालिकेच्या स्वत:च्या पाणीपुरवठा योजनेतून २५० दशलक्ष लिटर, महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाकडून १३५ दशलक्ष लिटर तर मुंबई महापालिकेकडून ८५ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होता. हे पाणी ठाणेकरांच्या घरापर्यंत पोहोचवण्यासाठी पालिका कोट्यवधी रुपये खर्च करते. हा खर्च पाणीपट्टी बिलाच्या रूपाने ठाणे महापालिका ठाणेकरांकडून वसूल करते.
प्रशासकीय आकारात सवलत
महापालिका कार्यक्षेत्रातील घरगुती वापरासाठी असलेल्या नळ संयोजनाच्या थकीत देयकाची चालू वर्षाच्या मागणीसह पूर्ण भरणा केल्यास प्रशासकीय आकारात १०० टक्के सवलत लागू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे. ही योजना ३१ मार्च २०२५ या कालावधीत लागू राहील. या योजनेचा लाभ घेऊन थकीत व चालू पाणी देयकाची रक्कम पूर्णपणे भरून त्यावरील प्रशासकीय आकारात १०० टक्के सवलत योजनेचा लाभ नागरिक घेऊ शकतील.
प्रभाग समितीतील पाणीपुरवठा विभागाच्या अभियंत्यांच्या नेतृत्वात पाणी बिल वसुलीची मोहीम राबविण्यात येत असून, कारवाईत हयगय करू नये, असे त्यांना निर्देश देण्यात आले आहेत. तसेच पाणी बिल वसुलीत हयगय करणारे अभियंता आणि लिपिक यांच्यावर शिस्तभंग तसेच वार्षिक वेतनवाढ रोखण्याची कारवाईही प्रस्तावित आहे. नागरिकांनी पाणी बिल वेळेत भरावे तसेच थकबाकीदारांनी बिल भरून पालिकेस सहकार्य करावे अन्यथा नळजोडणी खंडित करण्यात येईल.
- विनोद पवार, उपनगर अभियंता, पाणीपुरवठा विभाग
प्रभाग - वसुली खंडित नळजोडण्या
माजिवडा मानपाडा : २१,१२,१३,१३७ १७६
नौपाडा-कोपरी : १३,८३,४६,१०७ ५२९
वर्तकनगर : ११,१६,४६,७९४ २१९
कळवा : १०,९६,८९,७४९ १,३४६
उथळसर : ०९,०३,८१,६७० ४३५
दिवा : ०८,७४,७५,१३९ १,६११
लोकमान्य-सावरकर : ०७,७२,३४,८६६ ७३४
मुंब्रा : ०७,६१,६१,७२६ ३,१३७
वागळे : ०५,८१,४२,७३० १,४१६
मुख्यालय-सीएफसी ०८,०३,९१,३०७ ००००
एकूण : १०६,०६,८३,२२५ ९,६०३
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.