उठावा आदिवासी पाड्यात पाणीटंचाई
खर्डी, ता. १८ (बातमीदार) : शहापूर तालुक्यातील अजनुप ग्रामपंचायत हद्दीतील व मध्य वैतरणा धरणाच्या वर वसलेल्या उठावा आदिवासी पाड्यातील रहिवाशांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. येथील महिलांना पाण्यासाठी डोंगरदऱ्या पार करून तीन किमीवरील मध्य वैतरणा धरणातून डोक्यावरून हंडे आणावे लागत आहेत. त्यामुळे येथील महिलांनी शहापुरात येत माजी आमदार पांडुरंग बरोरा व पाणीपुरवठा अधिकारी यांना उठावा येथे टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी केली.
अजनुप ग्रामपंचायतीमधील उठावा येथे ६० घरांची वस्ती असून, येथे ३५० लोकसंख्या आहे. सद्य:स्थितीत येथील विहिरीचे पाणी आटले आहे. बोअरवेललादेखील पाणी नाही. त्यामुळे येथील रहिवासी पाण्यासाठी वणवण फिरत आहेत. उठाव्याच्या खालच्या बाजूला तीन किमीवर मध्य वैतरणा धरणाचा जलस्रोत आहे. त्यामुळे डोंगरदऱ्यातून पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. अजनुप-उठावा गावासाठी प्रादेशिक नळ योजना होती; मात्र तीन किलोमीटरवरून पाणी उचलणे शक्य न झाल्याने ही योजना तीन वर्षांपूर्वीच बंद पडली आहे.
तालुक्यातील धारणालगत असलेल्या अशा अनेक आदिवासी वाड्या, वस्त्यांवर उन्हाळ्यात कायम पाणीटंचाई असते. यासाठी येथील रहिवाशांची तहान भागविण्यासाठी येथे तत्काळ टॅंकरने पाणीपुरवठा केल्यास येथील रहिवाशांचे हाल थांबतील.
पाणीटंचाई लक्षात घेता पाणीपुरवठा विभागाकडे टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी केली आहे.
- अजय कथोरे, सरपंच, अजनुप ग्रामपंचायत
धरणे खाली व गावे वरती पठारावर असल्याने योजना यशस्वी होत नसल्याने या सर्व गावांसाठी भावली पाणी योजना मंजूर करून घेतली आहे. सध्या येथे टॅंकरने पाणीपुरवठा करण्याच्या सूचना पाणीपुरवठा अधिकारी व गटविकास अधिकाऱ्यांना केल्या आहेत.
-पांडुरंग बरोरा,माजी आमदार, शहापूर
उठावा येथील पाणीटंचाईसंदर्भात पाहणी करण्यासाठी पथक गेले आहे. यासंदर्भात लवकरच टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात येईल.
- विजया पांढरे, उपअभियंता, पाणीपुरवठा विभाग, शहापूर.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

