

‘चला सिनेमावर बोलू काही’ साहित्यिक कट्ट्याला प्रतिसाद
दादासाहेब फाळके यांच्या स्मृतिदिनानिमित्त कार्याला उजाळा
तुर्भे, ता. १८ (बातमीदार) ः नेरूळ येथील ज्येष्ठ नागरिक सार्वजनिक ग्रंथालयाच्या सभागृहात दादासाहेब फाळके यांच्या स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला साहित्यिक कट्ट्याचा कार्यक्रम नुकताच आयोजित करण्यात आला होता. ''चला सिनेमावर बोलू काही'' हा कार्यक्रमाचा विषय ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमास अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नवी मुंबई शाखेचे उपाध्यक्ष दिनेश जोशी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. आयस्कॉनचे माजी अध्यक्ष दिगंबर चापके, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अरविंद वाळवेकर, ग्रंथालयाचे कार्याध्यक्ष प्रभाकरराव गुमास्ते, उपाध्यक्ष रणजीत दीक्षित, निर्मला शिंदे, सचिव सुनील आचरेकर, उत्कर्ष महिला मंडळाच्या अध्यक्षा स्वाती फडके आदी मान्यवर तसेच ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रभाकरराव गुमास्ते यांनी उपस्थित ज्येष्ठांशी संवाद साधत ग्रंथालयात साहित्यिक कट्टा सुरू करण्याचे प्रयोजन सांगितले. तसेच ग्रंथालयात आठ हजारांपेक्षा अधिक पुस्तके असतानाही वाचक फार कमी येतात, अशी खंत व्यक्त केली. आपल्या सर्व सभासदांसह परिसरातील नागरिकांना वाचनाची गोडी लागावी, त्यांना वाचनासाठी उद्युक्त करावे यासाठी संस्थेने हा साहित्यिक कट्टा सुरू केला असून, आजचे हे दुसरे पुष्प सादर होते आहे, हे स्पष्ट करत चर्चगेट ते बोरिवली, तसेच बोरिवली ते कल्याण आदी परिसरात असलेल्या छोट्या मोठ्या चित्रपटगृहांचे चलतचित्र सभागृहासमोर उभे केले. या रंजक प्रवासात खुमासदार पद्धतीने गुमास्ते यांनी या संपूर्ण परिस्थितीतील अनेक चित्रपटगृहांची वैशिष्ट्ये सादर केली. रसिकांनीही त्यास चांगली दाद दिली. प्रमुख पाहुणे दिनेश जोशी यांनी मराठी चित्रपट आशयाच्या दृष्टीने हिंदी पेक्षा अधिक श्रीमंत आहेत, अशी माहिती उपस्थितांना देत उंबरठा चित्रपटाचा गौरवाने उल्लेख केला. या चित्रपटातील नायिकेला स्वत्वाची जाणीव होते व ती बंड करून उंबऱ्याच्या बाहेर पडते. या चित्रपटाने महिलांना अन्याय, अत्याचाराविरोधात पेटून उठण्याची दिशा दाखवली, असे त्यांनी सांगितले. चित्रपटसृष्टीचा प्रारंभीचा काळ आणि आताचा काळ याची माहिती देऊन व्ही. शांताराम यांच्यासारख्या निर्माता दिग्दर्शकांनी भारतीय सिनेमा तंत्रदृष्ट्या कसा प्रगत केला. निळू फुले आणि डॉ. श्रीराम लागू हे कलाकार अभिनय सम्राट तर होतेच, शिवाय त्यांना माणुसकीचा गहीवर होता, हे सांगितले. प्रसंगी दिगंबर चापके, अरविंद वाळवेकर यांनीही उपस्थितांशी संवाद साधून आपले अनुभव विशद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपलक्ष्मी परुळेकर यांनी केले, तर दत्ताराम आंब्रे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
-
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.