कोळसा भट्टीतील तंदूर रोटी होणार बंद

कोळसा भट्टीतील तंदूर रोटी होणार बंद

Published on

कोळसा भट्टीतील तंदूर रोटी होणार बंद
पनवेलमधील १५१ बेकरी तसेच हॉटेल्सना पालिकेची नोटीस
पनवेल, ता. १८ (बातमीदार) ः हवा प्रदूषण नियंत्रणाच्या अनुषंगाने बेकरी, हॉटेल्स, रेस्टॉरंट, ढाबा, खाद्यपदार्थविक्री केंद्रांमध्ये तंदूरसाठी स्वच्छ व पर्यावरणपूरक इंधनाचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. त्‍यामुळे पनवेल महापालिकेने आतापर्यंत १५१ आस्थापनांना नोटीस दिल्याची माहिती उपायुक्त डॉ. वैभव विधाते यांनी दिली आहे. त्यामुळे पनवेल महापालिका हद्दीतही तंदूर भट्टीतून निघणारे पदार्थ पनवेलकरांना दुरापास्त होणार आहेत.
हॉटेलमध्ये भाकरी, रोटी, चपाती यासोबतच सर्वाधिक मागणी असते ती तंदूर रोटीला. आता या रोटीबाबत पनवेल महापालिकेने हॉटेल्सना एक नोटीस बजावली आहे. उच्च न्यायालयाने एमएमआरडी विभागात वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी स्वतः जनहित याचिका दाखल करून प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याबाबत महापालिकांना आदेश दिले आहेत. त्या आदेशानुसार महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनात हवा प्रदूषणसंदर्भात प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यासाठी जोरदार मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत पनवेल महापालिका कार्यक्षेत्रातील प्रदूषण निर्माण करणाऱ्या, कोळशाचा वापर करणाऱ्या हॉटेल्स, रेस्टारंट, ढाबा, बेकरी, खाद्यपदार्थविक्री करणाऱ्या १५१ आस्थापनांना महापालिकेने नोटीस बजावली आहे. हॉटेल व बेकरीमधील भट्ट्यांसाठी यापुढे इलेक्ट्रिक आणि सीएनजीवर चालणाऱ्या शेगड्यांचा वापर करावा लागणार आहे. बेकरी व तंदूरसाठी स्वच्छ व पर्यावरणपरक इंधन जसे की सीएनजी, एलपीजी किंवा विद्युत, असे इंधन पर्याय वापरावेत, असे सूचित करण्यात आले आहे. इंधन म्हणून कोळसा किंवा लाकडाचा वापर करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
.............................
१५१ आस्थापनांकडून लाकूड, कोळशाचा वापर
धोकादायक वायू उत्सर्जन कमी करण्यासाठी योग्य वायू प्रदूषण नियंत्रण उपकरणे (स्क्रबर, आधुनिक चिमणी) बसविणे आवश्यक आहे. तसेच वायू प्रदूषणाचे उत्सर्जन रोखण्यासाठी तंदूर उपकरणांची नियमित देखभाल व दुरुस्ती करणे आवश्यक आहे. महापालिका हद्दीतील १५१ हॉटेल्स, रेस्टारंट, ढाबा, बेकरी, खाद्यपदार्थविक्री करणाऱ्या आस्थापनांपैकी ३५९ आस्थापना विद्युत व गॅसचा वापर करत आहेत, तर १५१ आस्थापना या कोळसा व लाकडाचा वापर करत आहेत. या आस्थापनांना नोटीस देण्यात आल्या आहेत. या सर्व उपाययोजनांची अंमलबजावणी केल्याबाबत महापालिकेला तातडीने कळवण्याच्या सूचना संबंधित बेकरी व हॉटेल्सना देण्यात आल्या आहेत.
.............................
पनवेलमधील एकाही बेकरी किंवा रेस्टॉरंट, हॉटेल्समध्ये जळाऊ लाकूड वापरता येणार नाही. लाकडाऐवजी इलेक्ट्रिक उपकरणे, सीएनजी, पीएनजी गॅस वापरण्याचे आदेश दिले आहेत. या सर्व उपाययोजनांची अंमलबजावणी केल्याबाबत महापालिकेला तातडीने कळवण्याच्या सूचना संबंधित बेकरी व हॉटेल्सना देण्यात आल्या आहेत. कोळसा तंदूर भट्टी किंवा लाकूड वापरल्याचे निदर्शनास आले, तर अशा आस्थापनांवर पनवेल महापालिकेकडून कठोर कारवाई केली जाणार आहे.
-डाॅ. वैभव विधाते, उपायुक्त पनवेल पालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com