क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांना अभिवादन

क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांना अभिवादन

Published on

क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांना अभिवादन
कल्याण, ता. १८ (वार्ताहर) : क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके आणि त्यांचे शस्त्र गुरू लहुजी वस्ताद साळवे या दोघांची पुण्यतिथी १७ फेब्रुवारी या दिवशी येते. यानिमित्त भारतीय इतिहास संकलन समिती कल्याण, जिल्हा श्रीरामसेवा मंडळ कचोरे गाव, हुतात्मा स्मारक मंडळ, क्रीडाभारती या संस्थांनी दरवर्षीप्रमाणे अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगरसेविका रेखा चौधरी या होत्या; तर प्रमुख वक्ता म्हणून श्री गणपती मंदिर डोंबिवलीचे विश्वस्त व पूर्वांचल विकास परिषदचे कार्यकर्ते शिरीष आपटे होते.

वासुदेव बळवंत फडके यांना आद्य क्रांतिकारक म्हणून का म्हटले जाते, याचे विवेचन शिरीष आपटे यांनी केले. त्याचबरोबर क्रांतिकारक फडके यांच्याबाबत माहिती अतिशय रोचक शब्दात विद्यार्थ्यांसमोर मांडली. १८७९ ते १८८३ काळात वासुदेव बळवंत फडके डोंबिवली-कल्याणच्या सीमेवर असलेल्या नेतिवली टेकडीच्या वरील गुहेत राहिले होते. त्या काळात कचोरेगांव आणि परिसरातील लोकांनी आगरी कोळी बांधवांनी या क्रांतिकारकांना भाकऱ्या पुरवल्या होत्या, असे सांगितले. छत्रपती शिवरायांच्या चरित्रातून प्रेरणा घेतलेले वासुदेवराव आपल्या भिल्ल आणि रामोशी सहकाऱ्यांना सतत छत्रपती शिवरायांची आठवण करून देत असत त्यांच्या नीतीप्रमाणेच आपल्याला चालायचे आहे, हे आग्रहाने सांगत असत.

कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात रेखा चौधरी यांनी नेतीवलीवरील गुहेचे वासुदेव बळवंत फडके यांच्या स्मरणार्थ हे स्थान सुशोभित करावे, पुढील पिढीसाठी क्रांतिकारकांचा आदर्श जतन करावा, असे म्हटले. तसा ठरावही कल्याण-डोंबिवली महापालिकेने पारित केला आहे, असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सायली फणसे यांनी केले, तर विद्यार्थ्यांच्या एका गटासमोर वासुदेवराव कोल्हटकर यांनी फडके यांचे चरित्र मांडले. या कार्यक्रमाला तीन शाळांमधील मुले-मुली आल्या होत्या. त्यांनी प्रत्यक्ष गुहेच्या जागी जाऊन लहुजी साळवे, वासुदेव फडके यांच्या प्रतिमांचे पुष्प वाहून पूजन केले. या सर्वांचा राजन चौधरी यांच्या श्रीराम सेवा मंडळातर्फे अध्यक्षांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com