

म्हसामध्ये शिवछत्रपतींच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक
मुरबाड, ता. १९ (बातमीदार) : म्हसा येथे शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला माजी व आजी सैनिकांच्या हस्ते दुग्धाभिषेक करण्यात आला. मुरबाड तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतनसिंह पवार यांच्या संकल्पनेतून दरवर्षी विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते शिवछत्रपतींचा दुग्धाभिषेक सोहळा आयोजित करण्यात येतो. यंदा हा मान शिवजयंती महोत्सव समिती, ठाणे जिल्हा यांच्या वतीने मुरबाड तालुक्यातील आजी व निवृत्त सैनिकांना देण्यात आला. या वेळी सैन्य दलातील निवृत्त हवालदार जयवंत तुपे, निवृत्त नाईक गणेश कंटे, हवालदार समीर सय्यद, हवालदार मधुकर घुडे, हवालदार अमोल झुंजारराव, विद्यमान ब्लॅक कमांडो अशोक रगडे तसेच समितीचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह पवार उपस्थित होते. १० वर्षांपासून शिवजयंतीनिमित्त म्हसा गावातील शिव पुतळ्याला दुग्धाभिषेक करण्याचा मान समितीच्या वतीने समाजातील विविध वर्गाला दिला जातो. या कार्यक्रमासाठी जयवंत पवार, संध्या कदम, भारती पष्टे, नेताजी लाटे, गुरुनाथ देशमुख, वसंत कराळे, जयवंत हरड, मगन घागस, रामचंद्र कुरले, संयोजक अरुण कुरले, नरेश कुरले, अनिकेत कुरले आदी उपस्थित होते.
...............
अनाथालयाला जीवनावश्यक वस्तूवाटप
मुरबाड, ता. १९ (वार्ताहर) : शिवजयंतीनिमित्ताने सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने कल्याण तालुक्यातील म्हसकल येथील जीवन संवर्धन फाउंडेशन संचालित बेघर अनाथ मुलांची शाळेत जीवनावश्यक वस्तूवाटप करण्यात आले. या वेळी जिल्हाध्यक्ष चेतनसिंह पवार उपस्थित होते. या वेळी गुरुकुल शाळेतील विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आपले मनोगत व पोवाडे सादर केले. सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने मागील आठ वर्षांपासून लोकोपयोगी व लोकप्रबोधनात्मक कार्यक्रम कल्याण तालुक्यात जिल्हाध्यक्ष चेतनसिंह पवार व तालुका संयोजक अमोल सुरोशी राबवत असल्याचे ॲड. दिनेश सासे यांनी म्हटले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कल्याण तालुका संयोजक अमोल सुरोशी यांनी मेहनत घेतली, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल सुरोशी यांनी केले. आभार प्रदर्शन आकाश पाटील यांनी केले. या वेळी ॲड. दिनेश सासे, कार्यक्रमाचे संयोजक अमोल सुरोशी, योगेश्वर बुटेरे, शनि पवार, नम्रता ठाकरे, सुनील शिर्के, बंडू डोंगरे, नेताजी लाटे, ज्ञानेश्वर ठाकरे, अनिल घरत, नीलेश पवार, आकाश पाटील, गितांजली अहिरे, नंदन कुलकर्णी, अभ्यंकर आदी मान्यवर उपस्थित होते.
.............
विविध कार्यक्रमाने रंगला शिवजयंती सोहळा
खर्डी, ता. १९ (बातमीदार): शहापुरातील सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीमार्फत शिवजयंती सोहळ्यानिमित्ताने मोटार रॅली, हिरकणी स्पर्धा, ऐतिहासिक पोवाडा, शिवजन्मोत्सव सोहळा, दुग्धाभिषेक व पूजन व शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची मिरवणूक ढोल-ताशाच्या गजरात, लेझीम वाजवत व तलवार पट्टा कसरत करत शहापूर बाजारपेठेत काढण्यात आली. या वेळी समितीचे अध्यक्ष संतोष शिंदे, आमदार दौलत दरोडा, तहसीलदार परमेश्वर कासुळे, पोलिस निरीक्षक जितेंद्र ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते. या मिरवणुकीत चित्ररथ, मल्लखांब, संबळ वादन, योगासने व तलावरबाजीची प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. तालुक्यातील सर्वच शाळेत सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. शहापुरातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ घेण्यात आलेल्या हिरकणी स्पर्धेत ६० महिलांनी भाग घेतला होता. यात वनिता बिन्नर, भारती आवर व वैशाली ढोन्नर यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावले. तर या स्पर्धेत ७६ वर्षीय श्वेता शिंदे यांनी उपस्थितांचे मने जिंकली. सर्वच शाळातील विद्यार्थ्यांनी या मिरवणुकीत सहभाग घेतला होता. या वेळी नगराध्यक्षा गायत्री भांगरे, उपाध्यक्ष विजय भगत, मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज गायकवाड, विवेक नार्वेकर, आकाश सावंत, विद्याताई वेखंडे, विजय देशमुख, मिलिंद देशमुख, सुमेध जाधव, उदय शेट्टी, शारदा म्हात्रे व गीता दरोडा यांच्यासह राजकीय पक्ष, मित्र मंडळ, संघटना यांचे पदाधिकारी उपस्थित होते.
.....................
भाकरीवर काढले शिवाजी महाराजांचे चित्र
मुरबाड, ता. १९ (बातमीदार) : चित्रकार सचिन पोतदार यांनी तांदळाच्या पिठाच्या भाकरीवर शिवाजी महाराजांचे चित्र काढून छत्रपती शिवरायांना एक आगळी वेगळी मानवंदना दिली. शिवाजी महाराजांना रयतेचा राजा म्हणून संबोधले जाते. ज्या रयतेला भाकरी मिळण्यासाठी महाराजांनी वेळोवेळी मदत केली. त्याची आठवण म्हणून मी शिवाजी महाराजांचे चित्र भाकरीवर काढल्याचे सचिन पोतदार यांनी सांगितले. त्यांना हे चित्र काढण्यासाठी सहा तास मेहनत घ्यावी लागली. चित्र रंगवण्यासाठी त्यांनी वॉटर कलरचा वापर केला. हिंदवी स्वराज्यातील १८ पगड जातीच्या सर्वसामान्य लोकांच्या भाकरीची चिंता असलेल्या राजाला भाकरीवर त्यांचीच प्रतिमा साकारून अनोखी मानवंदना दिल्यामुळे मुरबाडचे कलाकार सचिन पोद्दार यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
..............
भिवंडीत ''जय शिवाजी जय भारत'' पदयात्रा
भिवंडी, ता. १९ (वार्ताहर) : शिवजयंतीनिमित्त भिवंडी महापालिकेच्या वतीने ''जय शिवाजी जय भारत'' या पदयात्रेचा आयोजन करण्यात आले होते. भिवंडी महापालिका मुख्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला आयुक्त अनमोल सागर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आश्वारुढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला, तर चाचा नेहरु विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात आयुक्त अनमोल सागर यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर सुरू झालेल्या पदयात्रेत अतिरिक्त आयुक्त देविदास पवार, विठ्ठल डाके, शहर अभियंता जमील पटेल, उपायुक्त रोहिदास दोरकुळकर, बाळकृष्ण क्षिरसागर, शैलेश दोंदे, प्रणाली घोंगे, डॉ. अनुराधा बाबर, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप गाडेकर, सहाय्यक पोलिस आयुक्त (पूर्व) सचिन सांगळे, सहाय्यक पोलिस आयुक्त (पश्चिम) दीपक देशमुख, पालिकेचे सर्व सहाय्यक आयुक्त, विभागप्रमुख, कर्मचारी, शालेय विद्यार्थी, शिक्षक, आशा सेविका, एन.सी.सी, एन.एस.एस, स्काऊड गाईड, आर.एस.पीचे विद्यार्थी, खेळाडू आणि शहरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पदयात्रेच्या समारोपप्रसंगी संस्कृती सदानंद म्हात्रे या शालेय विद्यार्थिनीने छपत्रती शिवाजी महाराजांच्या जीवनावर भाषण केले. याप्रसंगी भिवंडी शहरातील राष्ट्रीय व राज्य पातळीवरील पुरस्कार प्राप्त खेळाडूंचा सत्कार आयुक्त अनमोल सागर यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच शिवजयंतीनिमित्त पालिकेच्या वाचनालय विभागाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनवरील पुस्तकांचे शिव गाथा हे प्रदर्शन आयोजित केले होते, तर उद्यान विभागामार्फत वृक्ष लागवड करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.