कर्नाळा पक्षी अभयारण्यात टुरिस्ट गाईडची वाणवा

कर्नाळा पक्षी अभयारण्यात टुरिस्ट गाईडची वाणवा

Published on

कर्नाळा पक्षी अभयारण्यात टुरिस्ट गाईडची वाणवा
पर्यटक, निसर्गप्रेमींची निराशा
कामोठे, ता. १९ (बातमीदार) : कर्नाळा पक्षी अभयारण्य निसर्गप्रेमींचे मुख्य आकर्षण आहे. स्थानिक आदिवासी तरुण-तरुणींना रोजगार मिळावा, यासाठी सरकारने टुरिस्ट गाईडचे प्रशिक्षण दिले होते, मात्र नियमित काम मिळत नसल्याने प्रशिक्षणार्थींनी टुरिस्ट गाईडच्या कामाकडे पाठ फिरवली आहे.
कर्नाळा पक्षी अभयारण्य सुमारे १२ चौरस किलोमीटर परिसरात उभारले आहे. वर्षभरात सुमारे १५० पेक्षा अधिक स्थानिक व स्थलांतरित जातीचे पक्षी येथे आढळतात. अभयारण्यास दरवर्षी शेकडो पर्यटक, पक्षी अभ्यासक व निसर्गप्रेमी भेट देतात. शालेय विद्यार्थ्यांच्या सहली, अभ्यास दौरे यांचे आयोजन केले जाते. पर्यटकांना अभयारण्यातील महत्त्वाच्या स्थळांविषयीची माहिती व अभ्यासपूर्ण मार्गदर्शन मिळावे, यासाठी स्थानिक आदिवासी तरुण-तरुणींना प्राधान्याने रोजगार मिळाला पाहिजे, यासाठी उपक्रम राबवला होता. २०२१ साली रायगड जिल्ह्यातील फणसाड अभयारण्यासह कर्नाळा अभयारण्य परिसरातील ३१ आदिवासी स्थानिक तरुण-तरुणींना केंद्र सरकारच्या ऑनलाइन पर्यटन सुलभ मार्गदर्शन अभ्यासक्रमांतर्गत पर्यटन व वन विभागामार्फत प्रशिक्षण दिले होते. कर्नाळा परिसरातील २० जणांनी प्रशिक्षण घेतले होते, मात्र पर्यटकांकडून मागणी कमी असल्याने बहुसंख्य टुरिस्ट गाईडने या व्यवसायातून हळूहळू काढता पाय घेतला आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी प्रशिक्षणार्थी इतरत्र नोकरी, व्यवसाय करत आहेत.
सद्यस्थितीला कोरलवाडी येथील रमेश वाघे हा एकमेव टुरिस्ट गाईड कार्यरत आहे. रमेश हा खाजगी सुरक्षा रक्षक आहे. नोकरी सांभाळून शनिवारी व रविवारी या सुट्टीच्या दिवशी तो टुरिस्ट गाईडचे काम करत आहे.

अभयारण्यात आढळणारे पक्षी
मलबार, व्हिसलिंग थ्रश, कोकीळ, फ्लाय कॅचर, भोरडया, तांबट, कोतवाल, पांढऱ्या पाठीची गिधाडे, दयाळ शाहीनससाणा, टिटवी, बगळे, निळा फ्लायकॅचर, लाल छाती फ्लायकॅचर, तैगा, काळी डुलकी, गोल्डन फ्रंटेड, निळा कॅप्ड रॉक, पांढरा-रम्पड, रीड वॉरबलर, थिक नी, जंगल ऑवलेट, ऑरेंज हेडेड थ्रश यासारखे अनेक स्थानिक आणि विदेशी प्रजातीच्या स्थलांतरित पक्षांच्या प्रजाती कर्नाळ्या पक्षी अभयारण्यात आढळतात.

पर्यटक व पक्षीप्रेमी यांच्याकडून टुरिस्ट गाईडला मागणी कमी आहे. सुट्टीचे दिवस वगळता फारसे पर्यटक अभयारण्याकडे फिरकत नाहीत. त्यामुळे स्थानिकांनी या व्यवसायाकडे पाठ फिरवली आहे. पर्यटनाला चालना मिळण्यासाठी सरकारने उपाय करण्याची गरज आहे.
- रमेश वाघे, टुरिस्ट गाईड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com