मालमत्ता कर भरण्याकडे नागरिकांचा कल वाढला

मालमत्ता कर भरण्याकडे नागरिकांचा कल वाढला

Published on

मालमत्ता कर भरण्याकडे नागरिकांचा कल वाढला
पनवेल महापालिकेच्या तिजोरीत दररोज एक कोटींहून अधिक भरणा.
पनवेल, ता. १९ (बातमीदार) ः पनवेल महापालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभागाच्या वतीने नागरिकांच्या मनातील शंकांचे निरसन प्रसिद्धी माध्यमातून करण्यात आल्यानंतर कर भरण्यास नागरिकांचा प्रतिसाद वाढला आहे. गेल्या काही दिवसांपासून कळंबोली, कामोठे, खारघर, पनवेल प्रभागातून एक कोटींहून अधिक थकीत कर वसूल होत आहे. दरम्यान, आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे यांच्या सूचनेनंतर उपायुक्त स्वरूप खारगे यांनी जप्तीपूर्व नोटिशीनंतर सात दिवसांचा कालावधी पूर्ण होऊनही मालमत्ता कर न भरलेल्या थकबाकीदारांना वॉरंट नोटिसा बजावण्यास सुरुवात केली आहे.
आतापर्यंत पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रातील विविध नोडमध्ये सुमारे ४४७ जप्तीपूर्वीच्या नोटिसा व २७ वॉरंट नोटिसांचे वाटप थकबाकीदार मालमत्ताधारकांना दिल्याने थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहेत. आयुक्त मंगेश चितळे यांच्या सूचनेनूसार जप्ती मोहीम अधिक तीव्र करण्याचा इशारा महापालिकेच्या वतीने देण्यात आला आहे. उपायुक्त स्वरूप खारगे, कर अधीक्षक महेश गायकवाड, कर अधीक्षक सुनील भोईर यांच्या नेतृत्वाखाली वसुली पथकाच्या माध्यमातून पनवेल, कामोठे, खारघर, कळंबोलीतील थकबाकीदारांवर जप्ती व अटकावणीची कारवाई करण्यात येत आहेत. त्‍याचाच चारही प्रभागांमधून आजपर्यंत ३२८ कोटींचा भरणा झाला आहे.
मालमत्ता कर न भरल्यास त्यांच्या शास्तीमध्ये प्रतिमहा दोन टक्क्यांची वाढ होत असल्याने तसेच महापालिकेने प्रसिद्धी माध्यमांद्वारे केलेल्या आवाहनामुळे नागरिकांच्या मनातील शंकांचे निरसन झाल्याने कर भरण्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे.


चौकट
पनवेल महापालिका क्षेत्रात तीन लाख ५० हजार निवासी, बिगर निवासी, व्यावसायिक, औद्योगिक आदी नोंदणीकृत मालमत्ता आहेत. या मालमत्ताधारकांकडून करवसुलीसाठी महापालिकेचे विविध झोन तयार केले आहेत. ऑनलाइन आणि विविध ॲपच्या माध्यमातून कर भरण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. ऑनलाइन पद्धतीने कर भरता यावा, यासाठी महापालिकेने ‘सिटीझन प्रॉपर्टी टॅक्स पेमेंट गाईड’ तयार केले आहे.

महापालिकेने मालमत्ता कर ऑनलाइन भरण्यासाठी ‘PMC TAX APP’ मोबाईल ॲप विकसित केले आहे. तसेचwww. panvelmc.org या वेबसाईटवरती जाऊनही आपला मालमत्ता कर नागरिकांना भरता येणार आहे. मालमत्ताधारकांना काही शंका असल्यास 1800-5320-340 या टोल फ्री क्रमांकावरती संपर्क साधावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com