

नवी मुंबईत ‘जय भवानी, जय शिवाजी’चा गजर
वाशी, ता. १९ (बातामीदार) ः नवी मुंबई शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी नवी मुंबई ढोल ताशांच्या गजरात, फटक्यांच्या आतषबाजीत ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणा देत परिसर दणाणून सोडला होता. या वेळी नवी मुंबईतील वातावरण भगवेमय झाले होते. आबालवृद्धापासून बच्चेकंपनीपर्यंत सर्वांनी रॅलीत तसेच पांरपरिक वेषात महिलांनीही सहभाग घेतला होता. तर शहरात आकर्षक रोषणाई, भगव्या झेंड्यांनी परिसर शिवमय झाले होते. छत्रपती शिवजी महाराजांचे पोवडे व अन्य गीतांनी नवी मुंबई परिसर दणाणून गेला होता. या वेळी शिवजयंतीचे औचित्य साधून नवी मुंबईत विविध सामाजिक संघटना, रिक्षा-टॅक्सी युनियन आणि नवी मुंबई महापालिकेच्या वतीने शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. ऐरोली, घणसोली, कोपरखैरणे, वाशी, नेरूळ, बेलापूर येथे शिवभक्तांनी शिवरायांच्या जयंतीचा उत्सव साजरा केला. पनवेलमध्ये अनेक ठिकाणी बाईक रॅली काढून छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करून परिसर दणाणून सोडला. पनवेल परिसरातील विविध सोसायट्यांमध्येदेखील यानिमित्ताने विविध सामाजिक उपक्रम करण्यात आले. या वेळी सोशल मीडियावर शिवजयंतीच्या शुभेच्छा देण्यात तरुणाई आघाडीवर होती. तसेच पारंपरिक वेशभूषेसह भगवा फेटा परिधान केलेले शिवभक्त मिरवणुकांचे आकर्षण होते.
नवी मुंबई महापालिकेच्या वतीने वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवयारांच्या अश्वारूढ पुतळ्याला राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते पुष्पमालिका अर्पण करण्यात आली. नवी मुंबई महापालिकेच्या मुख्यालयातील अॅम्फिथिएटर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला तसेच पाचव्या मजल्यावरील राजमाता जिजाऊ सभागृहाच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्याला पुष्पमालिका अर्पण करून अभिवादन करण्यात आले. ऐरोलीतील रिक्षाचालक युनियन, वाशीतील एकता रिक्षा-टॅक्सी युनियन, कोपरखैरणे, घणसोलीतही रिक्षाचालक-मालक संघटनेतर्फे शिवजयंती साजरी करण्यात आली. नवी मुंबईत काही भागांमध्ये बाईक रॅली काढून छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करून परिसर दणाणून सोडला. नवी मुंबई परिसरातील विविध सोसायट्यांमध्ये शिवजयंती साजरी करण्यात आली. या वेळी विविध सामाजिक उपक्रमदेखील राबवण्यात आले. दिघा येथील पुण्यनगरी सामाजिक संस्थेच्या वतीने चित्रकला स्पर्धा, आरोग्य शिबिर तसेच शिवव्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी मुलांना बक्षीस वितरण करण्यात आले. शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला फटक्यांची आतषबाजीदेखील करण्यात आली. घणसोली येथील मेघमल्हार सोसायटीमध्ये मशाल रॅली काढण्यात आली. ऐरोली सेक्टर चार येथे मावळा प्रतिष्ठानच्या वतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. येथील जुना चिंचपाडा या ठिकाणी युवा क्रीडा मित्रमंडळाचे अध्यक्ष अतूल आवरी पाटील यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन केले होते. याशिवाय सोशल मीडियावरदेखील शिवजयंतीच्या शुभेच्छा देण्यात येत होत्या.
......................
कामोठ्यात एक शहर एक शोभायात्रा
कामोठे (बातमीदार) : छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती कामोठे येथे उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त एक शहर एक शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. पोलिस स्टेशनसमोरील चौकात विपुल गोवारी याने साकारलेल्या अयोध्या येथील राम मंदिराच्या प्रतिकृतीने सर्वांचे लक्ष वेधले.
सामाजिक ऐक्य टिकवण्यासाठी कामोठे येथील सर्व शिवप्रेमी एकत्रित येऊन मागील नऊ वर्षांपासून एक शहर एक शोभायात्रेचे आयोजन करीत आहेत. कामोठे पोलिस स्टेशनसमोरील चौकातून शोभायात्रेची सुरुवात व सांगता होते. या शोभायात्रेत शेकडो शिवप्रेमी सहभागी झाले होते. या वेळी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावांचा जयघोष करण्यात आला. पारंपरिक वस्त्र परिधान करून, ढोलताशाच्या गजरात, लेझीमच्या तालावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची भव्य मिरवणूक काढली जाते. या मिरवणुकीत कामोठेमधील विविध क्षेत्रांतील मान्यवर व्यक्ती, नागरिक सहभागी झाले होते. शिवजयंतीनिमित्त कामोठे गावातील विपुल गोवारी यांनी पोलिस स्टेशनसमोरील चौकात आयोध्येतील राम मंदिराची सात फूट उंच व १३ फूट प्रतिकृती साकारली आहे. हे मंदिर पाहण्यासाठी कामोठेमधील नागरिकांची प्रचंड गर्दी झाली आहे.
..........................
वाशीमध्ये साहसी मर्दानी खेळाचे आयोजन
वाशी (वार्ताहर) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त नवी मुंबईत उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आबालवृद्धांनी शिवरायांच्या नावाचा जयघोष करीत पारंपरिक नृत्य आणि साहसी मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक सादर करीत अतिशय उत्साहात शिवजयंती साजरी केली. दरवर्षीप्रमाणे नवी मुंबईत यंदाही मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली. नवी मुंबईतील विविध सामाजिक संस्था, शाळा आणि महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी पारंपरिक मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी लाठीकाठी, तलवारबाजी, द्वंद्व युद्ध यासारख्या साहसी युद्धकला सादर केल्या. तसेच आईएस शाळेच्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक ढोलताशांच्या गजरात लेझीम नृत्य सादर केले. यात मॉडर्न स्कूलच्या विद्यार्थ्यांचादेखील समावेश होता. यासोबतच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेलदेखील पाहायला मिळाली. या शिवजयंती सोहळ्याचे आयोजन नवी मुंबई महपालिकेच्या वतीने करण्यात आले होते. शिवजयंतीच्या निमित्ताने पालिकेकडून महाराष्ट्र शासनाकडून राबविण्यात आलेल्या ‘जय शिवाजी, जय भारत’ उपक्रमांतर्गत पदयात्रा काढण्यात आली. वाशीतील पदयात्रेत पालिका शाळा व महाविद्यालयांतील १,५०० हून अधिक विद्यार्थ्यांचा समावेश होता. बेलापूर पालिका मुख्यालयातील पदयात्रेत ५०० हून अधिक विद्यार्थ्यांचा समावेश पाहायला मिळाला.
....................
बेलापूर मतदारसंघात युवासेना संपर्क अभियानाचा शुभारंभ
तुर्भे (बातमीदार) ः छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त बेलापूर मतदारसंघात युवासेना संपर्क अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. हे अभियान युवासेना बेलापूर विधानसभा संपर्कप्रमुख भावेश गुरुनाथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आले आहे. या उपक्रमाला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या अभियानाची सुरुवात बुधवार (ता. १९) पासून वाशी येथून करण्यात आली आहे. या उपक्रमाद्वारे साईनाथ कॉलेज व कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज युवकांनी युवासेनेत प्रवेश केला. महाविद्यालयीन युवकांना सामाजिक कार्य करण्याची प्रेरणा देण्यात आली. तसेच शिवसेनेच्या विचारधारेचा प्रसार करण्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिकवणीनुसार महिला सन्मान, समाजसेवा आणि शिस्तबद्ध वर्तन यांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले. या उपक्रमाला युवासेना ठाणे लोकसभा प्रमुख ममित चौघुले, युवासेना बेलापूर विधानसभा अध्यक्ष महेश कुलकर्णी, युवासेना शहरप्रमुख नयन रोहिदास पाटील, शहरप्रमुख विजय माने यांची महत्त्वपूर्ण उपस्थिती लाभली. या वेळी युवासेना संपर्कप्रमुख भावेश पाटील यांनी सांगितले, की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या सामाजिक कार्यातील समर्पणाची प्रेरणा घेऊन सर्व युवकांनी समाजातील गरजूंच्या मदतीसाठी तसेच तरुणांना योग्य दिशेने मार्गदर्शन करण्यासाठी शपथ घेतली.
..............
बेलापूर येथील सत्र न्यायालयात रक्तदान शिबिर
नवी मुंबई (वार्ताहर) : बेलापूर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. नवी मुंबई कोर्ट बार असोसिएशन व तालुका विधी सेवा समिती, बेलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबिरात जवळपास ५५ वकील सभासदांनी रक्तदान केले. या रक्तदान शिबिरात अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश मांडवगडे, न्या. साने, न्या. देशपांडे व फटांगरे तसेच वकील संघटनेचे अध्यक्ष सुनील मोकल यांच्यासह संदीप रामकर, विकास म्हात्रे, तुषार राऊत, संजय म्हात्रे, हेमांगी पाटील आदी पदाधिकारी तसेच इतर सदस्य सहभागी झाले होते. डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलमधील डॉ. प्राची नायर व त्यांच्या सहकारी डॉक्टरांनी या रक्तदान शिबिराचे यशस्वीपणे नियोजन केले.
.....................
विद्या प्रसारक हायस्कूलमध्ये शिवजयंती साजरी
नेरूळ (बातमीदार) ः छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त विद्या प्रसारक हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय बेलापूर येथे पदयात्रा आयोजित करण्यात आली होती. या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार व श्रीफळ अर्पण करून शाळेपासून बेलापूर गावापर्यंत पदयात्रा काढण्यात आली. यामध्ये लेझीम पथक, आरएसपी पथक विद्यार्थी सहभागी झाले होते. या कार्यक्रमासाठी विद्या उत्कर्ष मंडळाचे सचिव संदेश पंढरीनाथ पाटील, विद्या प्रसारक हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक दीपक दिवेकर, सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
................
कळंबोलीत एक शहर एक शोभायात्रा
कळंबोली येथे छत्रपती शिवरायांची जयंती मोठ्या उत्साहात आणि विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. शिवरायांच्या जयघोषात आणि ढोलताशांच्या आवाजात कळंबोलीतील वातावरण शिवमय झाले होते. सकल मराठा समाज कळंबोलीतर्फे एक शहर एक शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. कळंबोली येथील पोलिस निवारा चौकात शिवाजी महाराजांची प्रतिमा ठेवून मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी केली. सायंकाळी ढोल-ताशाच्या गजरात कळंबोली शहरातून शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. यामध्ये आबालवृद्ध व शेकडो महिला-भगिनींनी हजेरी लावली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.