थोडक्‍यात बातम्या रायगड

थोडक्‍यात बातम्या रायगड
Published on

कर्जत रेल्वे स्टेशनलगत रिक्षा स्टँडचे उद्घाटन
कर्जत (बातमीदार) : कर्जत रेल्वे स्टेशनच्या पश्चिमेकडील गुंडगे बाजूस जुन्या एसटी स्टँड परिसरात शहरातील पहिल्या अधिकृत छोट्या रिक्षा स्टँडचे उद्घाटन करण्यात आले. स्टँडअभावी स्थानिक रहिवाशांना आणि प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. आता रिक्षा स्टँड सुरू झाल्याने परिसरातील नव्याने झालेल्या सोसायट्यांमधील रहिवासी तसेच गुंडगे, भिसेगाव, नागुर्ले, तिघर, वर्णे, पळसदरी आदी भागातील नागरिकांची गैरसोय दूर होण्यास मदत होणार आहे. गेल्या काही वर्षांपासून स्थानिक रिक्षाचालकांनी या ठिकाणी रिक्षा चालवण्यास सुरुवात केली होती. मात्र कोणत्याही अधिकृत स्टँडअभावी त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते. अखेर आधार असंघटित जनरल कामगार युनियनच्या माध्यमातून हे रिक्षाचालक संघटित झाले आणि औपचारिकरीत्या या रिक्षा स्टँडची स्थापना करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त १९ फेब्रुवारी रोजी या रिक्षा स्टँडचे उद्घाटन ॲड. कैलास मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. या वेळी युनियनचे अध्यक्ष ॲड. कैलास मोरे यांनी रिक्षाचालकांना प्रामाणिकपणा, शिस्त आणि प्रवाशांशी सौजन्याने वागण्याचे महत्त्व समजावून सांगितले. कर्जत शहरात पूर्वेकडील भागात रेल्वे स्थानकाजवळ मोठ्या प्रमाणात रिक्षा स्‍टँड उपलब्ध आहेत, मात्र पश्चिमेकडील गुंडगे परिसरात छोट्या रिक्षांसाठी कोणतेही अधिकृत स्टँड नव्हते. पनवेल, चौककडे जाणाऱ्या मोठ्या इको रिक्षांसाठी स्टँड अनेक वर्षांपासून होते, परंतु स्थानिक, लहान अंतराच्या प्रवासासाठी प्रवाशांना रिक्षा मिळणे दुरपास्‍त झाले होते. या नव्या रिक्षा स्टँडमुळे आता प्रवाशांची गैरसोय दूर होणार आहे.
........................
लोणेरे श्री स्पर्धेत सचिन फुटाणकरचे सुयश
श्रीवर्धन (वार्ताहर) ः येथील फिटनेस स्टुडिओ लोणेरे आयोजित लोणेरे श्री शरीरसौष्ठव स्पर्धा १८ रोजी सायंकाळी पाच वाजता गोरेगाव येथील रुक्मिणी बेन नथुराम मंगल कार्यालयात पार पडली. या वेळी जीमचे कोच अर्पण डावरे व साहिल गडवले यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा अजिंक्यपद बाॅडीबिल्डिंग स्पर्धेसाठी रायगड जिल्ह्यातील ४८ युवकांनी भाग घेतला होता. या स्पर्धेत लोणेरे येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठात शिक्षण घेत असलेल्या सचिन अनंत फुटाणकर या विद्यार्थ्याने सहभाग घेतला होता. या स्पर्धेत सचिन याचा पाचवा क्रमांक आला. या यशाबद्दल श्रीवर्धन तालुक्यातून त्याचे कौतुक होत आहे.
................
खांदाड येथे अखंड हरिनाम सप्ताह
माणगाव (बातमीदार) : खांदाड येथे २१ ते २७ फेब्रुवारीपर्यंत अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी ग्रंथाचे सामुदायिक पारायण आयोजित करण्यात आले आहे. यंदा हे ४४वे वर्ष असून, माणगाव सोनभैर व ग्रामस्थ मंडळ खांदाड यांनी आयोजन केले आहे. पारायणाचा शुभारंभ व कलश पूजन, वीणा पूजन आजीव पांडुरंग सुतार यांच्या हस्ते शुक्रवार २१ फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजता होणार आहे. तसेच दैनंदिन कार्यक्रम पहाटे पाच वाजता काकड आरती, सकाळी ८ ते १२ व दुपारी ३ ते ५ वाजता ज्ञानेश्वरी ग्रंथाचे पारायण, सायंकाळी ५ ते ६ प्रवचन तसेच सायंकाळी ७ ते ८ हरिपाठ, रात्री ९ ते ११ कीर्तन, रात्री १२ ते ५ हरिजागर तसेच २६ फेब्रुवारी सायंकाळी ४ वाजता ज्ञानेश्वरी पारायणाची सांगता होणार आहे. सद्गुरू सेवा मंडळ, माणगाव यांच्या हस्ते व २७ रोजी सकाळी ८ वाजता दिंडी सोहळा व १० वाजता हभप संतोष पवार महाराज, बामणोली यांचे कीर्तन त्‍यानंतर १ ते ३ महाप्रसाद असे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामस्थ मंडळ खांदाड व समस्त सद्गुरू सेवा परिवार यांच्याकडून भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
.................
तटकरे यांनी घेतली खांडेकर परिवाराची सांत्वनपर भेट
रोहा (बातमीदार) : रोहा तालुका पंचायत समितीचे माजी सभापती व सोनगावचे नेते चिंतामणी शिवराय खांडेकर यांचे ५ फेब्रुवारी रोजी निधन झाले. त्याप्रीत्यर्थ रायगडाचे खासदार सुनील तटकरे यांनी चिंतामणी खांडेकर यांच्या निवासस्थानी नुकतीच सदिच्छा भेट देऊन त्यांच्या परिवाराचे सांत्वन केले. चिंतामणी खांडेकर यांच्या निधनाने सोनगाव, धामणसई विभागासह तालुक्यातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या निधनाने समाजाने एक खंदा कार्यकर्ता गमावला असून, समाजाचे सर्वच बाबतीत मोठे नुकसान झाले असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. खासदार सुनील तटकरे यांना खांडेकर यांच्या निधनाचे वृत्त समजताच त्यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या परिवाराचे सांत्वन केले. या वेळी त्यांच्यासमवेत माजी आमदार अनिकेत तटकरे, रोहा तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष विनोद पाशिलकर, प्रदेश सरचिटणीस विजय मोरे, रोहा तालुका युवक वरसे गण अध्यक्ष अनंत देशमुख, अध्यक्ष जयवंत मुंढे, वरसे ग्रामपंचायत सरपंच अमित मोहिते, मढाली सरपंच हेमंत कडव आदी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
..................
रोहा कुणबी समाजाच्या शिरपेचात मानाचा तुरा
रोहा (बातमीदार) ः तालुक्यातील कुणबी समाजाच्या सामाजिक उपक्रमाबाबत मुंबईतील मुलुंड येथे गौरव करण्यात आला आहे. या गौरवामुळे रोहा कुणबी समाजाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. मुलुंड येथे समाजाच्या वतीने बांधण्यात आलेल्या विद्यार्थी वसतिगृहासाठी रोहा शाखेने तब्बल पाच लाख रुपयांचा निधी देऊन या कामास हातभार लावला आहे. रोहा शाखेने केलेले सहकार्य व समाजात चालू असलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन मुलुंड विद्यार्थी वसतिगृहाचे प्रथम वर्धापन दिन सोहळ्याचे औचित्य साधून रोहा शाखेचा विशेष सन्मान करण्यात आला. समाजाच्या वतीने माजी सरचिटणीस व मुंबई संघाचे उपाध्यक्ष सुनील ठाकूर यांनी हा सन्मान स्वीकारला. या वेळी समाजनेते सुरेश मगर, अनंत थिटे, डॉ. सागर सानप, डॉ. मंगेश सानप, प्रा. माधव आग्री आदी उपस्थित होते. कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई या शाखेच्या मार्गदर्शनाखाली रोहा शाखेचे समाजाच्या प्रबोधन, उन्नतीसाठी गेली अनेक वर्षे काम सुरू आहे. समाजाने एकत्र येऊन रोहा शहरात स्व. नेते पां. रा. सानप यांच्या नावाने कुणबी भवन बांधून समाजाचे वास्तू निर्मितीचे स्वप्न साकार केले आहे. मुंबईतील सन्मान हा समाजाचे आत्मबळ वाढविणारा व नवी प्रेरणा देणारा असल्याची भावनाही समाज नेते व कार्यकर्ते यांच्याकडून व्यक्त केली जाऊ लागली आहे.
...................
श्रीवर्धन उपविभागीय अधिकाऱ्यांची रानवली शाळेला भेट
श्रीवर्धन (वार्ताहर) ः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेला क्षेत्रीय कार्यालयासाठी १०० दिवसांचा कृती आराखडा या उपक्रमाचा भाग म्हणून श्रीवर्धन उपविभागीय अधिकारी महेश पाटील यांनी रानवली येथील रायगड जिल्हा परिषद शाळेला भेट दिली. शालेय परिसर, परसबाग, सजावट, सौरऊर्जा पॅनेल, सीसीटीव्ही कॅमेरा, संगणक कक्ष, उपलब्ध भौतिक सुविधा व विद्यार्थी गुणवत्ता याबाबत आढावा घेतला. शाळेतील उपलब्ध सुविधांबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. या वेळी मंडळ अधिकारी कल्याण देऊळगावकर, रानवली ग्रामपंचायत सरपंच सुरेश मांडवकर उपस्थित होते. उपशिक्षक भिकू पांगारकर यांनी शाळेविषयी माहिती दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com