मोठागाव ते दुर्गाडी रस्त्याच्या कामाला सुरुवात

मोठागाव ते दुर्गाडी रस्त्याच्या कामाला सुरुवात

Published on

मोठागाव ते दुर्गाडी रस्त्याच्या कामाला सुरुवात
डोंबिवलीतील कोंडी फोडण्यासाठी महत्त्वाचा मार्ग

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १९ : डोंबिवली पश्चिमेतील मोठागाव ते दुर्गाडी या बाह्यवळण रस्त्याच्या कामाला मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने सुरुवात केली आहे. रिंगरूट प्रकल्पातील टिटवाळा-कल्याण-डोंबिवली ते शिळफाटा हेदुटणे या ३० किलोमीटर लांबीच्या रस्ते मार्गातील ठाकुर्लीतील चोळे पाॅवर हाउस ते गोविंदवाडी हा महत्त्वाचा टप्पा आहे. या मार्गाचे काम झाल्यास कल्याणमधील वाहने या मार्गे प्रवास करून ठाणे गाठू शकतील, यामुळे डोंबिवली शहराअंतर्गत वाहनांच्या कोंडीचा भार हलका होईल.

कल्याण, डोंबिवलीकरांना मोठागाव माणकोली उड्डाणपुलाच्या उभारणीमुळे कल्याण-शिळवरील कोंडीत न अडकता ठाणे गाठणे सोपे झाले आहे; मात्र या उड्डाणपुलाला पोहोच असलेल्या रस्त्यांची कामे, मोठागाव फाटकावरील पुलाची कामे झाली नसल्याने वाहतूक कोंडीची समस्या शहरात कायम आहे.

डोंबिवली पश्चिमेतील रिंगरूट प्रकल्पातील गणेशनगरमधील चोळे पाॅवर हाउस (बंद पडलेले), खंबाळपाडा खाडीकिनारा ते कल्याणमधील गोविंदवाडी या खाडीकिनारा भागातील बाह्यवळण रस्ते कामाला मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने सुरुवात केली आहे. माणकोली पुलाजवळील मोठागाव, देवीचापाडा, गरिबाचापाडा, कुंभारखाणपाडा, गणेशनगर, चोळे पाॅवर हाउस, खंबाळपाडा ते गोविंदवाडी, दुर्गाडी किल्ला हा सात किलोमीटर लांबीचा रस्ता उल्हास खाडीकिनारा भागातून जात आहे. या रस्ते मार्गामुळे कल्याण ते डोंबिवली या रस्ते मार्गाने जोडली जाणार आहे. यापूर्वी शिळफाटा, घरडा सर्कल, त्यानंतर पत्रीपूल ते ९० फिट मार्गाने वाहने डोंबिवलीत येत आहेत. मोठागाव दुर्गाडी या रस्त्याचे काम झाल्यास कल्याणमधील दुर्गाडी किल्ला, गोविंदवाडी येथून वाहने खाडीकिनारा भागातून गणेशनगर, मोठागाव रस्त्याने डोंबिवलीत येऊ शकणार आहे. मोठागाव-दुर्गाडी रस्ते कामासाठी सरकारने दोन वर्षांपूर्वी ५६१ कोटी रुपये मंजूर केले आहेत.

गणेशनगर चोळे पाॅवर हाउस (बंद) ते गोविंदवाडी रस्ता दरम्यानच्या खाडीकिनारी भागात मातीचे भराव टाकण्याचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या ठेकेदाराने सुरू केले आहे. ४५ मीटर रुंदीचा हा रस्ता आहे. पुढील वर्षापर्यंत हा रस्ते मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे. गोविंदवाडी, मोठागाव डोंबिवली रस्त्यामुळे कल्याणमधील वाहने थेट माणकोलीपुलापर्यंत येऊ शकणार आहे. डोंबिवलीतील वाहने या रस्त्याने थेट दुर्गाडी किल्ला भागात जाऊ शकणार आहेत. या रस्ते मार्गातील टिटवाळा, गांधारी, वाडेघर, आधारवाडी कचराभूमीपर्यंतचे रस्ते काम पूर्ण झाले आहे.

वाहतूक भार कमी होणार
रस्त्यामुळे डोंबिवली पश्चिमेतील बहुतांशी वाहने वळण रस्त्याने शहराबाहेरून कल्याण, डोंबिवली यादरम्यान प्रवास करणार आहेत. त्यामुळे डोंबिवली पूर्व भागातील रस्ते, पुलांवर येणारा वाहतूक भार कमी होऊन शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे, असे पालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. कल्याण-डोंबिवली शहराबाहेरून येणारी वाहने शहराबाहेरून निघून जावीत, या दूरगामी विचारातून एमएमआरडीएच्या पुढाकाराने कल्याण डोंबिवली महापालिका टिटवाळा, कल्याण ते डोंबिवली, शिळफाटा या ३० किलोमीटर लांबीच्या वळण रस्ते मार्गाची उभारणी करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com