प्रदुषणकारी १५ कंपन्या सील, २०० कंपन्यांना नोटीस

प्रदुषणकारी १५ कंपन्या सील, २०० कंपन्यांना नोटीस

Published on

प्रदूषणकारी १५ कंपन्या सील, २०० कंपन्यांना नोटीस
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सूचनेनंतर कारवाई
खारघर, ता. १९ (बातमीदार) : तळोजा औद्योगिक परिसरात प्रदूषण करणाऱ्या १५ कंपन्या सील करण्यात आल्‍या आहेत. तसेच प्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्या २०० कंपन्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना यासंदर्भात सूचना केल्‍या होत्‍या.
प्रदूषणाविरोधात लढा देणाऱ्या तळोजा, खारघर, रोडपाली, कळंबोली परिसरातील दीपक सिंग, लतीश शाह, डॉ. बासुतकर, भावना गुप्ता आदी कार्यकर्त्यांनी शुक्रवारी (ता. १२) आमदार प्रशांत ठाकूर यांची भेट घेऊन वाढत्‍या प्रदूषणाची समस्या निदर्शनास आणून दिली. त्‍यानंतर आमदार ठाकूर यांनी तत्काळ प्रदूषण नियंत्रण अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि सोमवारी (ता. १७) बैठकीचे आयोजन करावे, अशी सूचना केली होती. दरम्यान, सोमवारी तळोजा औद्योगिक क्षेत्रात झालेल्या बैठकीत पनवेल महापालिका क्षेत्रातील वाढत्‍या प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडून काय उपाययोजना केली जात आहे, याविषयी आमदार ठाकूर यांनी आढावा घेतला.
वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून १५ कंपन्या थेट सील करण्यात आल्‍या असून, २०० कंपन्यांना नोटीस बजावण्यात आल्याचे तळोजा औद्योगिक क्षेत्राचे विभागीय अधिकारी सतीश पडवळ यांनी सांगितले. फक्‍त नोटीस न देता अशा कंपन्यांवर कठोर कारवाई करावी, अशी सूचना आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली. रात्रीच्या वेळी नाल्यात केमिकलयुक्त सांडपाणी सोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, प्रदूषणाविरोधात लढा देणाऱ्या कार्यकर्त्यांसमवेत रात्रीच्या वेळी गस्त घालावी, प्रत्येक महिन्यात प्रदूषण महामंडळकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजनांविषयी आढावा बैठक घ्‍यावी, अशा सूचना आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली.
या बैठकीला भाजपा उत्तर रायगड सचिव कीर्ती नवघरे, युवा नेते अमर उपाध्याय, हॅप्पी सिंग, प्रदूषणाविरोधात लढा देणारे सामाजिक कार्यकते दीपक सिंग, भावना गुप्ता, लतिश शहा, दीपक कस्तुरी, नवीन भट्ट, ज्योत्स्ना शामला आदी उपस्थित होते.

आमदार ठाकूर यांच्या सूचनेमुळे रात्री आठ ते सकाळी सहा या वेळेत फिशिंग कंपन्यांवर बंदी घालण्याची तसेच परिसरात प्रदूषण करणाऱ्या विकसकांवर काम बंद करण्याची नोटीस देण्याची मागणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाने मान्य केली आहे.
- कीर्ती नवघरे,
जिल्हा सचिव, भाजपा

दूषित सांडपाणी सोडणाऱ्यांवर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात यावा. औद्योगिक क्षेत्रातील सांडपाणी वाहून नेणाऱ्या वाहिनीचे बंद असलेले काम तातडीने सुरू करण्याचे आश्वासन प्रदूषण महामंडळाने दिले आहे.
- दीपक सिंग, सामाजिक कार्यकर्ते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com