

आंबा मोहरला, पळसही बहरला
जव्हारमध्ये होळीपूर्वीच वसंत ऋतूची चाहूल
जव्हार, ता. १९ (बातमीदार) : निसर्गाने मुक्त हस्ताने रंगांचे उधळण करून जव्हारचे सौंदर्य खुलविले आहे. या भागात प्रत्येक ऋतू आपाल्या अस्तित्वाची जाणीव करून देतो. मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या भागात वसंत ऋतूची चाहूल लागल्याने आंबा मोहरल्याची आणि पळसही बहरल्याची निसर्गाची किमया येथे अलौकिक सौंदर्यातून जाणवू लागली आहे. रात्रीची थंड हवा, सकाळचा गारवा तर दुपारी जीवघेणा उकाडा त्रस्त करीत असताना यंदा पर्जन्यमान बऱ्यापैकी झाले. त्यामुळे होळीपूर्वीच वसंत (ग्रीष्म) ऋतूची चाहूल लागल्याचे दृश्य आहे.
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात केसरी रंगाच्या फुलांची झालर हिरव्या पळसाला लागडली आहे. आम्रवृक्ष मोहराने बहरले आहेत. यामुळे या वर्षी काही प्रमाणात का होईना आमरस गोड होणार, असे सध्याचे चित्र आहे. निसर्ग वेलीच्या झाडांमध्ये बदल होत असल्याने निसर्ग सर्वसामान्यांना मोहित करीत आहे. निसर्गाने नटलेल्या रानावनात, डोंगरकिनारी व रस्त्याकडेला असलेले हिरव्यागार पानांच्या पळस वृक्षावर केसरी रंगाची फुले उमलली आहेत. तर आमराईतील आम्रवृक्षाला चोहोबाजूने मोहोर लागल्याने पिवळसर फुलांचे गुच्छ शेतकऱ्यांना दिलासा देत आहेत.
आच्छादली हिरवी चादर
तालुक्यात डोंगरावर तसेच डोंगरदऱ्यातून जाणाऱ्या रस्त्याकडेला अनेक ठिकाणी पळसाची झाडे केसरी फुलांनी नटलेली आहेत. शेतशिवारात आम्रवृक्ष फुलांनी बहरले आहेत. वसंत (ग्रीष्म) ऋतूत येणाऱ्या होळीनंतरच्या रंगपंचमीला आजही ग्रामीण भागातील गुराखी व शेतकरी पळसाच्या या फुलांचा रंगासाठी वापर करतात. पळसाची वाळलेली फुले गोळा करून ती पाण्यात भिजवून दगडाने ठेचून (कुटून) पातळ वस्त्रातून गाळण केल्यानंतर नैसर्गिक रंग तयार होतो, जो शरीराला अपायकारक वा हानिकारक नसतो. गेल्या पावसाळ्यात परतीचे पर्जन्यमान चांगले झाल्याने जलसाठे, छोट्या नद्या, नाले, तलाव यासह विहिरीत चांगले पाणी असल्याने डोंगरासह शेतशिवाराने हिरवा शालू परिधान केल्याचे चित्र डोळ्याचे पारणे फेडत आहे.
फोटो कॅप्शन : जव्हार तालुक्यात आंबा फुलला तर पळस बहरला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.