

नवी मुंबईच्या जलवापर पद्धतीचे जलमंत्री परिषदेत कौतुक
महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदेंचे प्रभावी सादरीकरण
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १९ : राजस्थानमधील उदयपूर येथे संपन्न होत असलेल्या ‘दुसरी अखिल भारतीय राज्य जलमंत्री परिषद २०२५, भारत जलसुरक्षित देश’ या राष्ट्रीय स्तरावरील परिषदेमध्ये नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांस ‘किनारपट्टीवरील शहरातील शाश्वत आणि प्रभावी पाणीवापर : नवी मुंबई महानगरपालिकेचा तपशीलवार अभ्यास’ या विषयावर सादरीकरण करण्यासाठी विशेष निमंत्रित करण्यात आले होते. शिंदे यांनी केलेल्या सादरीकरणाचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले
या अनुषंगाने केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील, देशभरातील विविध राज्यांचे जलमंत्री, केंद्रीय जल मंत्रालयाचे सचिव, अन्य सचिव तसेच मान्यवर प्रतिनिधींसमोर डॉ. कैलास शिंदे यांनी नवी मुंबईतील जलवितरणाची अत्यंत प्रभावी कार्यप्रणाली तसेच पूरपरिस्थिती उद्भवू नये याकरिता होणारा होल्डिंग पाँडचा उपयोग याबाबत माहितीपूर्ण सादरीकरण केले. अशाप्रकारे केंद्रीय स्तरावर नवी मुंबईची जलव्यवस्थापनातील वैशिष्ट्यपूर्णता दर्शविण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर सादरीकरणाचा बहुमान मिळणे हा नवी मुंबई शहराचा गौरव आहे. याप्रसंगी आयुक्तांनी नवी मुंबई शहराच्या निर्मितीपासूनच्या वेगळेपणाची माहिती देत नवी मुंबई शहर नियोजन व भविष्यातील संकल्पना यांची सविस्तर मांडणी केली.
स्काडा प्रणालीचा वापर
स्वत:च्या मालकीच्या मोरबे धरणामुळे जलसमृद्ध असणाऱ्या नवी मुंबई शहरातील जलवितरण प्रणालीची माहिती देत आयुक्तांनी स्काडासारख्या अत्याधुनिक तंत्रप्रणालीचा वापर करून प्रभावी जलनियोजनाविषयी माहितीपूर्ण भाष्य केले. २४ तास पाणीपुरवठ्याची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी बेलापूर विभागापासून प्रायोगिक स्वरूपात सुरुवात करण्यात आल्याचे सांगत त्यांनी जलवितरण प्रणालीत ई गव्हर्नन्सचा प्रभावी वापर केला जात असल्याचे आवर्जून सांगितले. त्यासोबत आयुक्तांनी मलमिश्रित पाणी व वापरानंतरचे पाणी अशा दोन्हींबाबत महापालिका राबवित असलेल्या मलनिस्सारण व्यवस्थापन प्रणालीची माहिती दिली. यामध्येही स्काडा प्रणालीचा वापर करण्यात येत असून नागरिकांनी गरजेपुरताच पाणी वापर करावा, यावर भर दिला जात असल्याचे सांगितले.
पिण्याच्या पाण्याची अशीही बचत
महापालिकेची अत्याधुनिक मलप्रक्रिया केंद्रे तसेच टर्शरी ट्रीटमेंट प्लान्ट यांची माहिती देत उद्योग समूहांना शुद्धीकरण केलेले पाणी पुरविले जात असल्याची माहिती त्यांनी दिली. याशिवाय हे प्रक्रियाकृत पाणी उद्याने, बांधकामे, आरएमसी प्लान्ट, सोसायट्यांना पिण्याव्यतिरिक्त कामांच्या वापरासाठी तसेच एनएमएमटी बसेस धुणे अशा प्रकारे पिण्याव्यतिरिक्त कामांसाठी वापरले जात असून, यामुळे पिण्याच्या पाण्याची बचत होत असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.